सानिया मिर्झा, शोएब मलिक घेणार घटस्फोट!

0

इस्लामाबाद : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा
१२ वर्षे चाललेला संसार संपुष्टात येणार आहे. दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयाने दिली आहे. विशेष म्हणजे सानिया मिर्झाने देखील तसे संकेत देणारी सोशल मिडिया पोस्ट अलिकडेच केली आहे. (Sania Mirza and Shoaib Malik). सध्या शोएब मलिक पाकिस्तानात तर सानिया दुबईत आहे. शोएब सध्या एका क्रीडा वाहिनीसाठी टी-२० वर्ल्डचे समालोचन करतोय. १२ एप्रिल २०१० रोजी हैदराबादमध्ये पारंपरिकरित्या शोएब आणि सानिया विवाहबंधनात अडकले होते. सानियाने नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. सानियाच्या पोस्टवरुनही ते दोघे विभक्त होत असल्याची चर्चा होती. शुक्रवारी सानियाने आपला मुलगा इजहानसह एक फोटो शेअर केला होता. फोटोच्या कॅप्शनवरुन दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या.
लग्नाच्या दहा वर्षांनंतर सानियाने मुलगा इजहानला जन्म दिला. सानिया आणि शोएबने नुकताच मुलाचा वाढदिवस साजरा केला. शोएबने हे फोटो सोशल मीडियावर शेअरही केले होते. पाकिस्तानी मिडियानुसार, शोएबच्या आयुष्यात दुसरीच व्यक्ती आली असल्याने या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच सानिया आणि शोएब घटस्फोट घेत असल्याची माहिती आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी घटस्फोटाच्या चर्चांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, त्यांच्या काही निकटवर्तीयांनी दोघांमध्ये घटस्फोट यापूर्वीच झाल्याचे दावे सुरु केले आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा