गंगाबाई रुग्णालयात रुग्णांची लूट : बाहेरून औषध आणण्याचा सल्ला
गोंदिया. जिल्ह्यातील एकमेव स्त्री रुग्णालय असलेल्या बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात (Gangabai Women’s Hospital ) रुग्ण आणि त्यांच्या नातलगांची लूट थांबता थांबेना अशी गत झाली. पैसे दिल्याशिवाय प्रसूती होत नसल्याची (No delivery without payment ) आत्तापर्यंत ओरड होती. आता मात्र सारीच औषधे आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य देखील (materials required for surgery ) बाहेरून आणण्यासाठी चिठ्ठी दिली जात आहे. सिझेरिअन करण्यासाठी सुई, हातमोजे, इंजेक्सन, धागा, ब्लेड आणि बेटाडिन औषध सारेच बाहेरून आणण्यात सांगण्यात येत आहे. कोट्यवधी रुपयांचा औषधसाठा येत असताना बाहेरून खरेदी करण्याचा सल्ला का दिला जातो हे कळायला मार्ग नाही. गोंदियासह भंडारा, गडचिरोली तसेच मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील नजीकच्या जिल्ह्यांतून महिला रुग्ण गंगाबाई स्त्री रुग्णालयात महिला प्रसूतीकरिता येतात.
जिल्ह्यातील हे एकमेव महिला रुग्णालय आहे. त्यामुळे येथे नेहमीच रुग्णांची गर्दी असते. हे रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे देण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयाकडे गेल्यामुळे या रुग्णालयातील सेवा अधिक चांगली होऊन त्याचा लाभ येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना होवून लूटमार थांबेल, असा समज होता. मात्र तो गैरसमज ठरला. या रुग्णालयातहलगर्जीपणाने कळस गाठला. माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी होत नाही. रुग्णालयात महिला रुग्णांसोबत होणारी हेळसांड हा नवीन प्रकार नाही. येथे दलालराज मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. आधीच जिल्ह्यात रोजगाराची वाणवा असल्याने महिला येथे उपचाराकरिता येतात. अशातही त्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप रुग्णांचे नातलग करत आहेत. पैसे दिल्याशिवाय सिझेरिअन प्रसूती होत नाही. गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयात औषध नसल्याचे सांगून बाहेरून औषध खरेदीसाठी चिठ्ठी लिहून दिली जाते. शस्त्रक्रियेसाठी लागणारी सुई, धागा ब्लेड, बेटाडिन, हातमोजे, इंजेक्शन असे सर्वच साहित्य खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. यात मोठ्या प्रमाणात रुग्णांची लूट होत आहे. हा प्रकार खुलेआम सुरू असताना कुणाच्याच लक्षात कसे येत नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. रुग्णालयात येणारा औषधसाठा जातो कुठे हा देखील प्रश्नच आहे.
वॉर्डातील परिचारिका प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात रुग्णांच्या नातलगांना औषधे आणण्यासाठी चिठ्ठी लिहून देतात. वॉर्डाच्या बाहेर दारालगत एक व्यक्ती उभा असतो. तो चिठ्ठी घेऊन लगेच तिथेच औषधे उपलब्ध करून देतो. ती औषधे रुग्णालयात कशी विक्री केली जातात हा संशोधनाचा विषय आहे. बाहेरील औषध दुकानातून खरेदी करून आणलेली औषधे परत करण्यात येतात. दलालांकडूनच खरेदी करण्याचा अट्टाहास केला जातो, हे विशेष.
औषध साठा जातो कुठे?
रुग्णालयाला कोट्यवधी रुपयांचा औषधसाठा देण्यात येतो. असे असतानाही नेहमीच येथे औषधांचा तुटवडा असल्याचे कारण पुढे करून बाहेरून औषध खरेदीचा सल्ला दिला जातो. केटीएस रुग्णालयात देखील हाच प्रकार आहे. शासकीय रुग्णालयाच्या नावावर लुटमार बंद करावी, अशी मागणी केली जात आहे.