सुप्रिया सुळेंबाबतच्या विधानावरून अजित पवारांचा विरोधकांना टोमणा
अब्दुल सत्तारांवर निशाणा; नाव न घेता टीका

0


पुणे. काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सुप्रिया सुळेंबाबत (Supriya Sule) आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule ) यांनीही शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका करताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला होता, असे विधान केले होते. दरम्यान, यावरून आता अजित पवारांनी (Ajit Pawar) विरोधकांवर निशाणा साधला आहे. राजकीय पक्षाचे नेते जाणीवपूर्वक काहीना काही वक्तव्य करून राजकीय वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदविली आहे. तसेच यासह इतर विषयांवरही मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडेन, अशी माहिती त्यांनी दिली. आज बारामतीत असताना ते पत्रकारांशी बोलत होते. आता मंगळवारी होणाऱ्या पत्रकारपरिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


कोण काय बोलतं? कोण कोणाबरोबर जातं? कोण काय करतं? हे सर्व महाराष्ट्रातील जनता बघत असते. काही राजकीय पक्षाचे नेते जाणीवपूर्वक काहीना काही वक्तव्य करत आहेत आणि त्यातून राजकीय वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही आपली परंपरा नाही. अशा गोष्टी महाराष्ट्रात घडता कामा नये. कोणत्याच पक्षाच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून अशी विधाने व्हायला नको, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.


यावेळी भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासंदर्भात त्यांनी विचारण्यात आले असता, ते म्हणाले “मी चार तारखेला विदेशात गेलो होतो आणि १० तारखेला रात्री उशीरा परत आलो. ११ ताखरेला मी दिवसभर मावळमध्ये होतो. १२ तारखेला मी नगरमध्ये होतो आणि आज बारामतीत आहे. त्यासंदर्भात मी मंगळवारी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन बोलेन. मात्र, भारत जोडो यात्रेत पक्षाच्यावतीने शरद पवार जाणार होते. पण प्रकृती ठीक नसल्याने त्यांना जाणे शक्य झाले नाही. परंतु आमचे नेते जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेही सहभागी झाले होते.
दरम्यान, संजय राऊतांनी मध्यावधी निवडणुकांची शक्यता वर्तवली आहे. त्यावरही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. त्यांना जे वाटले, त्यानुसार ते बोलले. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत व्यक्त करणयाचा अधिकार आहे, असे ते म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा