सोयाबीनसह कापूस, संत्रा उत्पादकांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी आक्रमक, रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात मोर्शीत आक्रोश मोर्चा

0

अमरावती : सोयाबीन, कापूस, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari sanghatana) वतीने अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मोर्शी येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते. शेतीला दिवसा 10 तास वीज मिळावी, सोयाबीनला (Soybean) किमान आठ हजार रुपये तर कापसाला (Cotton) किमान 12 हजार रुपयांचा दर मिळावा, संत्रा पिकासाठी प्रकिया उद्योग उभा राहावे यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.


यावेळी बोलताना रविकांत तुपकरांनी लोकप्रतिनिधीवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणाही बोलायला तयार नसल्याचे तुपकर म्हणाले. अतिवृष्टी आणि परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली पाहिजे अशी मागणी यावेळी रविकांत तुपकर यांनी केली. विदर्भात संत्रा प्रक्रिया उद्योग झाले पाहिजेत अशी आमची भूमिका आहे. संत्र्याच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळाले पाहिजे. विद्युत ट्रान्सफर शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत अशा विविध मागण्या यावेळी तुपकरांनी केल्या. सोयाबीनला किमान आठ हजार रुपये तर कापसाला किमान 12 हजार रुपयांचा दर मिळावा अशी मागणीही त्यांनी केली.


अतिवृष्टीनं शेती पिकांचं मोठं नुकसान


अतिवृष्टीच्या तडाख्याने कापसासह सोयाबीन, संत्रा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राहिलेल्या पिकावर रोगराई झाली.फवारणीचा खर्च वाढला. मात्र, अपेक्षीत उत्पन्न न मिळाल्याने लागवड खर्च निघणेही अवघड झालं आहे. कारण कापसाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. यावर्षी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, परतीच्या पावसाचा फटका शेती पिकांना बसला आहे. सोयाबीन, उडीद, मूग, तूर ही पीक वाया गेली आहेत. यामुळं शेतकरी अगोदरच हवालदिल झाला आहे. अशातच आता कापूस आणि सोयाबीनचे दर कमी होत असल्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.