चंद्रपूर :दक्षिण भारतातील अनेक शहरांना जोडणाऱ्या बल्लारशा (बल्लारपूर) रेल्वे स्थानकावरील प्लेटफॉर्मला जोडणाऱ्या पादचारी एफओबी पुलाचा काही भाग रविवारी कोसळला. सध्या या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असले तरी स्ट्रक्चरल ऑडिटशिवाय अपघातग्रस्त पुलाची दुरुस्ती कशी असे अनेक प्रश्न या घटनेनंतरही अनुत्तरित आहेत. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कोसळलेला पूल त्वरित सुरू व्हावा यासाठी बल्लारशा रेल्वे स्थानकावर तळ ठोकला. डीआरएम ऋचा खरे, एडीआरएम जयसिंग व सिनियर डिसीएम कृष्णांत पाटील तातडीने घटनास्थळी पोहचले. मात्र,वरिष्ठ अधिकारी असताना रेल्वेच्या झेडआरसीसी कमिटीचे सदस्य श्रीनिवास सुंचुवार यांनी अधिकाऱ्यासमोर जो प्रश्न विचारला ज्याचे उत्तर कुणीही देऊ शकले नाही. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट न करताच पुन्हा पुलाची दुरुस्ती कशी काय करण्यात येत आहे, हा तो प्रश्न होता. यावरून पुन्हा एकदा मध्यरेल्वेच्या कार्य प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेल्वे विभागाने सद्या हा पूल पूर्णतः बंद केला असून सर्व प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रेल्वेच्या अप (चंद्रपूरकडे) दिशेने प्लॅटफॉर्म संपतो तेथे पाथ-वे तयार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार किमान ५० वर्षांपूर्वी प्लॅटफॉर्म क्र १ व २ साठी पुलाची निर्मिती झाली. या पुलास जोडून किमान २५ वर्षांपूर्वी प्लॅटफॉर्म क्र.३,४,व५ साठी नवीन पूल उभारण्यात आला.
रविवारी याच जुन्या पुलाचा काही भाग कोसळला व यात १४ प्रवासी जखमी झाले आणि एका महिलेला जीव गमवावा लागला. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. ३ वर्षांपूर्वी काझीपेठ-बल्लारशा-पुणे ही नवीन साप्तहिक गाडी सुरू झाली. रविवारी ही गाडी आणि लगेचच केरला एक्सप्रेस, बल्लारपूर-गोंदिया एक्सप्रेस अशा अनेक गाड्याचे आगमन काही अंतराने होते. त्यामुळे प्रवाश्यांची गर्दी या स्थानकावर होती. काझीपेठ- पुणे गाड़ी विषयी अनिश्चितता रहात असल्याने प्रवाश्यांनी या पुलावरच गर्दी केली आणि यातच पुलाचा भाग खाली कोसळला. असे आता बोलले जात आहे. रेल्वे प्रशासन गुड्स ट्रेन चे कारण सांगून प्लॅटफॉर्म निश्चितीचा विषय टाळतात. त्यामुळे प्रवाश्यांना पुलावरच उभे राहण्याशिवाय पर्याय नाही. आता या गाडीसाठी प्लॅटफॉर्म निश्चित करा अशी मागणी चंद्रपूर जिल्हा रेल्वेयात्री संघाने केली आहे. रेल्वेचे एडीआरएम जयसिंग चंद्रपुरात रविवारी रात्री दाखल झाल्यावर त्यांनी उपचाराचा खर्च रेल्वे देणार अशी घोषणा केली. त्यामुळे बहुतांश लोकांनी आपल्या अपघातग्रस्त स्वकीयांना खाजगी इस्पितळात भरती केले. सद्यस्थितीत ९ अपघातग्रस्तांवर डॉ. मानवटकर हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहे. यातील रंजना खरतड यांची प्रकृती गंभीर आहे.