रमाकांत दाणी
नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील ( swatantra veer savarkar ) टिकेच्या मुद्यावरून कात्रीत सापडलेला ठाकरे गट या मुद्यावर अस्वस्थ झाला आहे. सावरकर मुद्यावर ‘इकडे आड- तिकडे विहीर’ अशी अवस्था झाली असून आता त्याचे परिणाम दिसायला लागले आहेत. राहुल गांधी यांनी स्वा. सावरकरांबद्धल मांडलेल्या विचारांशी आम्ही ‘सहमत नाही’ अशी गुळगुळीत आणि बोथट तसेच स्वभावाला विपरित प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. ( uddhav thackeray ) आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( SANJAY RAUT ) यांनी त्यापुढे जाऊन ‘या मुद्यावर महाविकास आघाडीतही फूट पडू शकते’ असे आश्चर्याचा धक्का देणारे वक्तव्य केले आहे. राऊत यांचे वक्तव्य पाहता ठाकरे गट सध्याच्या मानोवस्थेतून जात आहे, हे लक्षात येते.
शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी या मुद्यावर भूमिका मांडली व ती पुरेशी बोलकी आहे. राऊत म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्धल राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या वक्तव्याशी शिवसेना सहमत नाही. सावरकरांविषयी करण्यात आलेले चुकीचे वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही. शिवसेना ते सहन करणार नाही. राहुल गांधी यांच्या यात्रेला महाराष्ट्रात जास्त प्रतिसाद मिळाला. मात्र, या यात्रेत त्यांनी वीर सावरकर यांचा विषय काढण्याची काहीच गरज नव्हती. हा विषय काढल्याने केवळ शिवसेनेलाच नव्हे तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. यामुळे महाविकास आघाडीतही फूट पडू शकते…” असे मोठे विधान राऊत यांनी केले आहे.
“सावरकर हे आणि भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्रद्धास्थान कधीच नव्हते, असे इतिहास सांगतो. पण आता राजकारणासाठी त्यांनी सावरकरांचा विषय घेतला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांच्या विचारांचा कायमच पुरस्कार केला आहे. तो आम्ही कायम करत राहू. महाराष्ट्रात येऊन सावरकरांची बदनामी करणे हे ना महाराष्ट्राला मंजूर आहे ना, शिवसनेला मंजूर आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते देखील राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाहीत” असा दावाही राऊत यांनी यावेळी केला आहे. आता संजय राऊत आणि ठाकरे गटाला ही भूमिका का मांडावी लागली? कारण स्पष्टच आहे. सावरकरांवरील टीकेच्या मुद्यावर ठाकरे गटाची मोठीच अडचण होत आहे. ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी या गटाची अवस्था झाली आहे. त्यामुळे ‘आम्ही अद्यापही हिंदुत्ववादीच आहोत’ हे भासविण्याचे ठाकरे गटाचे केवीलवाणे दिसावे, असे प्रयत्न सुरु आहेत. या मुद्यावर महाविकास आघाडीत फूट पडण्याची ‘सार्वजनिक’ शक्यता राऊत यांनी बोलून दाखविली असली तरी प्रत्यक्षात तसे होण्याची शक्यता तुर्तास तरी दिसत नाही.
महाविकास आघाडी ही आता काँग्रेसची नव्हे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीही गरज बनलेली आहे. त्यामुळे सावरकरांच्या मुद्यावर ठाकरे गट आणखी काही कठोर भूमिका घेईल, हे सध्यातरी शक्य वाटत नाही. त्यामुळे या मुद्यावर ठाकरे गटाची कोंडी होत राहणार व भाजप-शिंदे गटाकडून त्यासाठीचे प्रयत्न होत राहणार, हे स्पष्ट आहे.