– ‘ऐसी अक्षरे रसिके’ साहित्य संमेलनात डॉ प्रभा गणोरकर यांचे परखड मत
नागपूर :लेखकांनी ज्यांना व्यक्त व्हायचे आहे पण व्यक्त होता येत नाही त्यांचे माध्यम व्हायला हवे. हल्लीच्या काळात लेखक- कवींनी बोलणे, व्यक्त होणे हा गुन्हा ठरत आहे. शासनाला देखील तो राष्ट्रद्रोह वाटतो. मात्र लेखक कवींनी समाजाचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या हितासाठी हा गुन्हा केलाच पाहिजे असे परखड मत ज्येष्ठ लेखिका डॉ श्रीमती प्रभा गणोरकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबई अनुदानित अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था नागपूर आयोजित श्रीमती सुगंधाबाई शेंडे व प्राचार्य राम शेवाळकर स्मृती पाचवे सर्व समावेशक साहित्य संमेलन ‘ऐसी अक्षरे रसिके’ कवी कुलगुरू कालिदास सभागृह पर्सिस्टंट सिस्टीम आयटी पार्क येथे आजपासून सुरू झाले. या द्विदिवसीय साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या. यावेळी स्वागताध्यक्षा श्रीमती कांचन गडकरी, उद्घाटक डॉ गिरीश गांधी तर प्रमुख अतिथी डॉ श्रीमती भारती सुदामे, श्रीमती चेतना मोटघरे अभिव्यक्तीच्या अध्यक्षा सुप्रिया अय्यर, उपाध्यक्षा हेमा नागपूरकर, सचिव नलिनी खेडेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सकाळी भारतीय संविधान आणि ज्ञानेश्वरी ठेवून ग्रंथदिंडी करण्यात आली. या साहित्य संमेलनातील विविध सत्रात विविध विषयांवर मान्यवरांचे साहित्य चिंतन, कवी संमेलन होणार आहे. यावेळी अक्षरवेल या स्मरणिकेचे प्रकाशन व डॉ छाया नाईक यांच्या नेतृत्वात संपादकीय मंडळाचा सत्कार करण्यात आला. यासोबतच न्या विकास सिरपूरकर, आशुतोष शेवाळकर, प्रतिभा लोखंडे, डॉ वैशाली उपाध्ये, अवनी काशीकर आदींचाही अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ प्रभा गणोरकर यांनी राज्यकर्त्यांना सर्वाधिक भीती लेखकांची वाटते, अस्वस्थ झालेले व्यक्त झाले की तुरुंगात जातात हे अनुभवतोच आहे .
या वास्तवाकडे लक्ष वेधले. महिलांनी काय करावे, करू नये हे पुरुष ठरवित असल्याची खंत व्यक्त केली. महिलांच्या अंतरीचे दुःख, वेदना त्यांच्या लेखनातून व्यक्त होताना समाज त्यांची दखल घेत नाही यावर भर दिला. नवोदितांना संधी मिळण्यासाठी अशा राजकारण विरहित छोट्या साहित्य संमेलनाची गरज प्रस्ताविकातून सुप्रिया अययर यांनी बोलून दाखविली. संवेदनशील माणूस घडविणे, विवेकी समाज घडविणे हे साहित्याचे काम असल्याची भावना स्वागताध्यक्षा कांचन गडकरी यांनी बोलून दाखविली. -साहित्यिक बारीक राजकारणी – डॉ. गिरीश गांधी दरम्यान, आम्ही राजकारणी असलो तरी तुमच्यासारखे बारीक राजकारण करीत नाही असा टोला उदघाटक डॉ गिरीश गांधी यांनी लगावला.
सौहार्द नसेल तर संवाद कसा, अभिव्यक्ती कशी जपता येईल, सर्वसमावेशक नसल्यास साहित्य कसे टिकेल असा प्रश्न उपस्थित केला. यशवंतराव चव्हाण, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, विनोबा भावे यांनाही साहित्यिक मानण्यास नकार देण्यात आल्याची खंत बोलून दाखविली. आपल्या विचारशील लेखनात समाजाचे हित जोपासणारी मूल्य हवी, विवेकाची जोड हवी यावर डॉ भारती सुदामे यांनी भर दिला. संचालन सुषमा मूलमुले यांनी केले आभार हेमा नागपूरकर यांनी मानले.