बुलढाणा : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार प्रतापराव जाधव यांना भाजपच्या तिकिटावर लढणार नाही, असे जाहीर करण्याचे आव्हान दिले होते. आता त्यावर खासदार प्रतापराव जाधव यांनीही ठाकरे यांना प्रत्युत्तर (Buldana MP Jadhav Challenges Uddhav Thackeray) दिले आहे. भाजपमधून निवडणूक लढण्याचा प्रश्न येतोच कुठे? उद्धव ठाकरेंमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी बुलढाण्यात येऊन त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानही खासदार जाधव यांनी ठाकरेंना दिले आहे. चिखली येथील जाहीरसभेत ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका केली. याच सभेत बोलताना ठाकरेंनी शिंदे गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर तोंडसुख घेतले. आता त्यांच्या याच टीकेला आता खासदार जाधव यांनी उत्तर दिले आहे.
खासदार जाधव म्हणाले की, भाजप आमचा जुना मित्रपक्ष आहे. जुन्या मित्रपक्षाला सोबत घेऊन आम्ही याआधीच्या सर्व निवडणुका लढवल्या आहेत. येथून पुढेगी आगामी सर्व निवडणुका आम्ही भाजपसोबतच लढणार आहोत. पण भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढण्याचा प्रश्न येतो कुठे? उद्धव ठाकरेंमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी माझ्याविरोधात बुलढाण्यात येऊन निवडणूक लढवावी, असे खुले आव्हानच प्रतापराव जाधव यांनी दिले आहे. मी पुढची लोकसभा निवडणूक शिवसेनेतूनच लढणार आहे. भाजपकडून लढण्याचा विषय येतो कुठे? आम्ही शिवसेनेतच आहोत. बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालतो आहोत. इथून पुढेही त्यांचे विचार घेऊनच पुढे जाऊ, असे खासदार जाधव म्हणाले.
काय म्हणाले होते ठाकरे
बुलढाण्यातील गद्दार खासदार आणि गद्दार आमदारांमध्ये मर्दांनगी शिल्लक असेल तर त्यांनी भाजपकडून लढणार नाही, हे त्यांनी स्पष्ट करावे असे आव्हान देताना उद्धव ठाकरे यांनी ह्यांना नाव आणि चेहरा बाळासाहेबांचा पाहिजे, पक्ष शिवसेना पाहिजे आणि आशीर्वाद मोदींचा पाहिजे, अशी टीका केली होती.