२६/११ स्मृतीदिन : शहीदानां सलाम

0

26 नोव्हेंबर 2008… मुंबईला हादरवणारा दिवस. आजही मागे वळून पाहिलं तर अंगावर काटा येतो. आज या हल्ल्याला तेरा वर्ष पूर्ण झाली आहे. तरिदेखील या हल्ल्याच्या आठवणी मात्र प्रत्येक मुंबईकराच्या मनात ताज्याच आहेत. दहशतवाद्यांनी मुंबई वेठीस धरली होती. 26/11 मुंबई हल्ल्याच्या थरारक, वेदनादायी, कटू आठवणी आजही प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयांच्या मनात कायम आहेत.

स्वातंत्र्यानंतर देश अनेक दहशतवादी हल्ल्यांचा साक्षीदार बनला आहे. याच हल्ल्यांमध्ये मुंबईतील दहशदवादी हल्ल्याचाही समावेश आहे . 26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईसाठी काळा दिवस ठरला होता. समुद्रमार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं होतं. आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात त्या दिवसाच्या जखमा ओल्या आहेत. या घटनेला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज संपूर्ण देश दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करत आहे. या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 166 लोक मृत्यूमुखी पडले होते, तर 300 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते.

26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा परिणाम संपूर्ण जगभरात पाहायला मिळाले. या हल्ल्यात भारतीयांसह अनेक परदेशी नारिकांचाही मृत्यू झाला होता. मुंबई हल्ल्याने संपूर्ण जग हादरलं होतं. 2008 मध्ये पाकिस्तानमधून दहा दहशतवादी समुद्राच्या मार्गे मुंबईत घुसले होते. लष्कर ए तोयबाच्या या अतिरेक्यांनी मुंबईची शान म्हणून ओळख असेलल्या ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला होता, ज्यात 160 हून अधिक निरपराधांचे प्राण गेले होते.

छत्रपती शिवाजी टर्मिनस

छत्रपती शिवाजी टर्मिनस हे रेल्वे स्थानक नेहमीच लोकांनी गजबजलेलं असतं. ते देशातील सर्वांत व्यग्र रेल्वे स्थानकांपैकी एक स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावर त्यादिवशी अत्यंत क्रूर पद्धतीने दहशत पसरवण्यात आली. 

या स्थानकावर त्या दिवशी या मोठ्या संख्येने प्रवासी हजर होते. दहशतवाद्यांनी तिथंही अंदाधुंद गोळीबार केला. इथं जो गोळीबार झाला त्यात अजमल अमीर कसाब आणि इस्माईल खान यांचा सहभाग असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.

त्यानंतर पोलिसांनी अजमल अमीर कसाबला पकडलं, पण त्याचा दुसरा साथीदार इस्माईल खान मारला गेला. या गोळीबारात 58 लोक मृत्युमुखी पडले होते.

ओबेरॉय हॉटेल

ओबेरॉय हॉटेल

ओबेरॉय हॉटेल बिझनेस क्लासमध्ये खूप फेमस आहे. दहशवादी या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर दारूगोळा घेऊन घुसले.

असं म्हटलं जातं की, त्यावेळी हॉटेलमध्ये जवळपास 350 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. आत घुसल्यानंतर दहशतवाद्यांनी अनेकांना ओलीस ठेवलं होतं.

नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या जवानांनी या हॉटेलमध्ये दोन्ही दहशतवाद्यांना ठार केलं.

ताजमहाल हॉटेल

मुंबई
फोटो कॅप्शन,ताजमहाल हॉटेल

26/11 च्या दहशतवादी हल्ल्याची एक ओळख जी कधीच विसरता येणार नाही ती म्हणजे, ताजमहाल हॉटेलच्या घुमटावर लागलेली आग. आजही हा हल्ला आठवायचा म्हटलं तर त्या जळत्या घुमटाचा फोटो आपल्याला डोळ्यांपुढं दिसतो.

हे हॉटेल जवळपास 105 वर्षं जुनं आहे. गेटवे ऑफ इंडियाजवळ असलेलं हे ताजमहाल हॉटेल परदेशी पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. इथूनच समोर पसरलेला अरबी समुद्र दिसतो.

त्या रात्री हॉटेलमध्ये जेवणं सुरू होती आणि बरेच लोक हॉटेलमध्ये जमले होते, अचानक दशतवादी आत घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

सरकारी आकडेवारीनुसार, हॉटेल ताजमध्ये एकूण 31 लोक मृत्यमुखी पडले. आणि इथंच चार दशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं.

कामा हॉस्पिटल

कामा रुग्णालय

कामा हॉस्पिटल हे एक चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल 1880 साली बांधण्यात आलं असून एका श्रीमंत व्यापाऱ्याने याची बांधणी केली होती.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण आलेल्या दशतवाद्यांपैकी चार जणांनी पोलिस व्हॅन चोरली आणि त्यानंतर गोळीबार सुरू ठेवला.

याच कारने ते कामा हॉस्पिटलमध्ये घुसले. कामा हॉस्पिटलबाहेर झालेल्या चकमकीत दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर शहीद झाले.

नरिमन हाऊस

या सगळ्यात दहशतवाद्यांनी नरिमन हाऊसलाही टार्गेट केलं. नरिमन हाऊसची ओळख चबाड लुबाविच सेंटर अशी देखील आहे. नरिमन हाऊसमध्ये घुसून दहशतवाद्यांनी अनेकांना ओलीस ठेवलं.

ज्या इमारतीत दहशतवादी घुसले ती इमारत ज्यू लोकांच्या मदतीसाठी बांधलेलं एक सेंटर आहे. याठिकाणी ज्यू पर्यटक थांबलेले असतात.

या सेंटरमध्ये ज्यू धर्मग्रंथांची एक मोठी लायब्ररी आहे. या ठिकाणी कारवाई करण्यासाठी एनएसजी कमांडो हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पलीकडे लागून असलेल्या इमारतीवर उतरले.

या कारवाईत दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं, पण दहशतवाद्यांनी ज्या लोकांना ओलीस ठेवलं होतं त्यातलं मात्र कोणीच वाचलं नाही. इथं सात लोक मृत्युमुखी पडले तर दोन दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं.

चबाड हाऊसची देखरेख करणारे गॅवरिल आणि त्यांची पत्नी रिवका यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांचा दोन वर्षांचा मुलगा मोशे वाचला. इथं झालेल्या हल्ल्यात सहा ज्यू लोक मारले गेले.

अनेक पोलीस शहीद, एका अतिरेक्याला जिवंत पकडण्यात यश

या हल्ल्यादरम्यान हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस कर्मचारी शहीद झाले. दहा दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याला जिंवत पकडण्यात पोलिसांना यश आलं. हा दहशतवादी म्हणजे अजमल आमीर कसाब. तुकाराम ओंबळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या अंगावर गोळ्या झेलून कसाबला जिवंत पकडलं. परंतु तुकाराम ओंबळे शहीद झाले. त्यांच्यामुळेच अजमल कसाबला जिवंत पकडता आलं आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणण्यास मदत झाली.

कसाबला फाशी

मुंबईवरील हल्ल्यातील जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबला तातडीने फासावर लटकवण्याची मागणी केली जात होती. त्याने गुन्ह्याची कबुली देत हल्ल्यातील भूमिका स्वीकारली होती. कसाबला मुंबईतील आर्थर रोड जेलमधील अंडासेलमध्ये ठेवण्यात आलं. खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची निवड करण्यात आली. कसाबला मे 2010 मध्ये विशेष कोर्टाने दोषी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्यानंतर हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं. तिथेही फाशीची शिक्षा कायम राहिल्यानंतर कसाबने राष्ट्रपतींकडे दया अर्ज केला. राष्ट्रपतींनीही त्याचा अर्ज फेटाळला. परंतु कसाबला फाशी देण्यास उशीर होत असल्याने नागरिकांमध्ये रोष होता. 2012 मध्ये नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारला कसाबच्या फाशीाबाबतची फाईल मिळाली आणि राज्य सरकारने 21 नोव्हेंबरला फाशी देण्याचं निश्चित केलं. अखेर 21 नोव्हेंबर 2012 रोजी सकाळी साडेसात वाजता कसाबला पुण्यातील येरवडा कारागृहात फासावर लटकवण्यात आलं.

हेमंत करकरे
२६/११च्या त्या रात्री मुंबईचे एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांना क्राइम ब्रांचनं मुंबईवर हल्ला झाल्याचं सांगण्यात आले. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्याचे कळताच हेमंत करकरे लगेचच घरातून निघाले. अजमल कसाब आणि इस्माईल कामा रुग्णालयाबाहेर अंधाधुंद गोळीबार करत होते. या गोळीबाराची माहिती मिळताच विजय साळसकर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे तिथे पोहचले. दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंची गाडी समोरुन दिसताच त्यांनी गाडीवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात हेमंत करकरे शहीद झाले. हेमंत करकरे यांना मरणोत्तर अशोक चक्रानं सन्मानित केलं आहे.

तुकाराम ओंबळे
मुंबई पोलिस दलातील एएसआय तुकाराम ओंबळे यांनी आपल्या प्राणाची आहुती देत दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडून दिले होते.
विजय साळसकर
एनकाउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले विजय साळसकर २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. कामा रुग्णालयाच्या बाहेर झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.
अशोक कामटे
अशोक कामटे मुंबई पोलीस दलात ऍडिशनल पोलिस कमिशनर म्हणून कार्यरत होते. ज्या वेळेस मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा अशोक कामटे हेमंत करकरे यांच्यासोबत होते. इस्माइल खाननं केलेल्या गोळीबारात एक गोळी त्यांच्या डोक्याला लागली होती.
मेजर संदीप उन्नीकृष्णन
मेजर संदीप उन्नीकृष्णन एनएसजीचे जवान होते. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ते ऑपरेशन ब्लॅक टारनेडोचं नेतृत्व करत होते. ताज पॅलेस हॉटेलमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करताना मेजर संदीप उन्नीकृष्णन हे शहीद झाले.
    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा