Home Top News डॉ दंदे फाउंडेशन नागपुरात करणार वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन

डॉ दंदे फाउंडेशन नागपुरात करणार वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन

0
ना. गडकरींनी केला शुभारंभ : राबवणार, ‘एक पेड नाती के नाम’ अभियान
ना. गडकरींच्या वाढदिवशी अनोखी पर्यावरण भेट

नागपूर (Nagpur):- नागपुरातील असह्य आणि जीवघेणं तापमान लक्षात घेता, वृक्षारोपणासह वृक्ष संवर्धन-जतन करण्याकरिता डॉ. दंदे फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाचा आरंभ ना. नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे यावेळी उपस्थित होते.

या उपक्रमाला शुभेच्छा देतांना ना. गडकरी या उपक्रमाचे कौतुक केले. शहरात वृक्ष लावले आणि संवर्धित केले जातील, असे ते म्हणाले. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांच्या सहकार्याने फाउंडेशनच्यावतीने ‘एक पेड नाती के नाम’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. नागपूर शहरातील किमान १० नगरांमधील बगिच्यांमध्ये स्थानिकांच्या सहकार्याने भारतीय वंशाच्या वृक्षांचे रोपण आणि स्थानिकांच्या सहकार्याने संवर्धन केले जाईल. या दोन्ही उपक्रमांची सुरुवात पावसाळ्यात दोन – तीन पावसानंतर केली जाईल. ना. गडकरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रातिनिधिक स्वरुपात लागवडीकरिता वृक्षांचं वितरण पर्यावरणप्रेमी नागरिकांना करण्यात आलं.

डॉ. दंदे म्हणाले, की या उपक्रमाअंतर्गत दुर्मिळ होत चाललेल्या वृक्षांचं जतन, संवर्धन आणि नंतर या वृक्षांचं मल्टिप्लिकेशन करण्याकरिता फाउंडेशन काम करीत आहे. एक-दोन वर्षात या कामाची फलश्रृती समोर येईल. यावेळी ना. गडकरी यांना ‘कृष्णवड’ अर्थात ‘माखनकटोरी’ हा दुर्मिळ वृक्ष भेट देण्यात आला आणि नंतर या वृक्षाचे रोपण करण्यात आलं.

नागपूर-विदर्भातील तापमान लक्षात घेता, केवळ वृक्षारोपण हा उपाय नाही. वृक्ष संवर्धन झाले पाहिजे. याकरिताच डॉ. दंदे फाउंडेशनने यथाशक्य पुढाकार घेतला असून, ‘एक पेड नाती के नाम’ याकरिता ज्येष्ठ नागरिकांना पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ पिनाक दंदे यांनी केले. या उपक्रमात सहभागी होण्याकरिता नागरिकांनी – सामाजिक संस्थांनी डॉ. दंदे फाउंडेशनच्या रवीनगर चौक कार्यालयात (मोबाईल – 8767929607) संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे.

‘कृष्णवड’ अर्थात ‘माखनकटोरी’ या वृक्षाविषयी संक्षेपाने

डॉ. दंदे फाउंडेशनच्यावतीने नितान गडकरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘दुर्मिळ भारतीय वृक्ष प्रजाती रोपण, संवर्धन आणि या वृक्षांचे मल्टिप्लिकेशन’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी गडकरींना कृष्णवड हा वृक्ष भेट देण्यात आला, आणि नंतर या वृक्षाचे रोपण करण्यात आले. हा वृक्ष मराठीत कृष्णवड , हिंदीत माखन कटोरी, इंग्रजीत कृष्णा बटरकप ट्री या नावाने परिचित आहे. हा वृक्ष Ficus krishnae या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. मोरेसी (Moraceae) कुळातील एक अतिशय दुर्मिळ आणि पवित्र झाड आहे. या झाडाची पाने नैसर्गिकरीत्या कपासारखी किंवा द्रोणासारखी दुमडलेली असतात.

या वृक्षाला पौराणिक पार्श्वभूमी आहे. ही पार्श्वभूमी भगवान कृष्णाच्या काळापर्यंत मागे जाते. या झाडाच्या नावामागे एक प्रसिद्ध हिंदू पौराणिक कथा आहे. बाळकृष्णाला लोणी (माखन) खूप आवडायचे. तो ते चोरून खायचा. एकदा यशोदा मातेने त्याला लोणी चोरताना पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कृष्णाने या झाडाच्या पानात लोणा लपवले. तेव्हापासून या झाडाची पाने कायमची कपासारखी किंवा द्रोणासारखी दुमडलेली राहतात, अशी श्रद्धा आहे, म्हणून हा कृष्णवड, किंवा माखन कटोरी वृक्ष.

झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्याची पाने तळाशी गोलाकार दुमडून एका नैसर्गिक कपाचा किंवा थैलीचा आकार घेतात. हा सदाहरित आणि वेगाने वाढणारा मोठा वृक्ष असून, याला वडाच्या झाडासारख्या पारंब्या फुटतात. वैज्ञानिकदृष्ट्या हे झाड भारताच्या राष्ट्रीय वृक्षाशी म्हणजेच वडाच्या झाडाशी (Ficus benghalensis) जवळून संबंधित आहे.

औषधी गुणधर्म आणि धार्मिक महत्त्व सांगायचं झाल्यास आयुर्वेदात या झाडाचा उपयोग पोटाचे विकार, अल्सर, ताप, सूज आणि यकृताच्या आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. हे झाड भगवान कृष्णाच्या बाललीलांशी जोडलेले असल्याने पवित्र मानले गेले आहे.

हे झाड सध्या एक दुर्मिळ प्रजाती बनत चालले आहे, कारण ते नवीन वातावरणात सहज जुळवून घेऊ शकत नाही. त्यामुळे वनस्पतिशास्त्रज्ञ आणि पर्यावरण संस्था या झाडाच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. डॉ. दंदे फाउंडेशनच्या माध्यमातूनही हा प्रयत्न आहे, की दुर्मिळ होत चाललेली भारतीय वंशाची वृक्षवल्ली वाचवली, जगली आणि संवर्धित झाली पाहिजे.

 

#DrDandeFoundation #EkPedNatiKeNaam #TreePlantation #TreeConservation #Nagpur #NitinGadkari #Environment #GreenNagpur #SaveTrees #ClimateAction #GoGreen #EnvironmentalAwareness #Krishnavad #MakhanKatori #IndianTrees #NatureConservation #EcoFriendly #Vidarbha #GreenInitiative #SustainableFuture