
तुळशीबाग-नंदनवन उपविभागातर्फे १४ एप्रिलला रक्तदान शिबिर
नागपूर(Nagpur) दि. १२ एप्रिक २०२६:
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक बांधीलकी जपत, महावितरणच्या तुळशीबाग-नंदनवन उपविभागातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘विद्युत सेवेसोबतच आता जीवनदान’ असा संकल्प करून येत्या मंगळवारी, १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर तुळशीबाग उपविभागात पार पडणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर मानवतावादी मूल्यांचा पुरस्कार केला. त्यांच्या याच विचारांना अभिवादन करण्यासाठी उपविभागातील अधिकारी व कर्मचारी दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. यंदा ‘रक्ताचा एक थेंब, कोणाच्या तरी घरात आनंदाचा दिवा लावू शकतो’ हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी या रक्तदान शिबिराचे यायोजन करण्यात आले आहे.
महावितरणचे कर्मचारी रात्रंदिवस विद्युत सेवा पुरवून लोकांचे आयुष्य प्रकाशमान करत असतात, परंतु रक्ताच्या तुटवड्यामुळे कोणाचे आयुष्य अंधकारमय होऊ नये, यासाठी हा छोटासा प्रयत्न करत असल्याची माहिती आयोजक कर्मचाऱ्यांनी दिली आहे. विद्युत कर्मचारी आणि नागरिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
—-
















