मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केलेले आक्षेपार्ह वक्तव्य संजय राऊत यांना चांगलेच भोवणार असे दिसते. राऊत यांना आता 100 कोटींची मानहानीची नोटीस पाठवण्यात आली (Defamation case against Sanjay Raut) आहे. ही नोटीस लोकनेते एकनाथ संभाजी शिंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष अमर विनायक लोखंडे यांनी पाठवली असून राऊत यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बदनामीकारक आणि आक्षेपार्ह असे वक्तव्य केल्याचा दावा त्यात करण्यात आलाय.
राज्यातील झालेल्या सत्तांतरानंतर दोन्ही गटांकडून रोजच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून रोज शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला जातो. यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तर खोचक शब्दात टीकाही अनेकदा केली आहे. दरम्यान याच टिकेवरून संजय राऊत यांना छत्रपती संभाजीनगरचे अमर विनायक लोखंडे यांनी 100 कोटींच्या मानहानीची नोटिस आपल्या वकिलामार्फत पाठवली आहे. ज्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत संजय राऊत यांनी वेळोवेळी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून संजय राऊत त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. खोके, मिंधे गट अशा खोचक शब्दांमध्ये संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचले. त्याचबरोबर वेळोवेळी राऊत यांनी शिंदेंवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. शिंदे यांचा समाजात अवमान होईल, बदनामी होईल असे वक्तव्य संजय राऊत यांच्याकडून करण्यात आले आहेत. तसेच संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे समाज माध्यमांवरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी होत असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आलाय.