पोलिस- नक्षल्यांमध्ये धुमश्चक्री

0

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर चकमक: नक्षलवादी ठार, संख्या अस्पष्ट

गडचिरोली. दीर्घ काळापासून शांत भासणारी नक्षल चळवळ (Naxal movement ) पुन्हा सक्रीय होत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातील गडचिरोलीसह छत्तीसगढच्या सीमेवर (Gadchiroli in Maharashtra with Chhattisgarh) नक्षलवाद्यांच्या हालचाली सुरू आहेत. त्यातच भामरागड तालुक्यातील कियरकोटी अबुझमाड जंगल परिसरात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये शुमश्चक्री (Clashes between police and Naxalites ) सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. प्राप्त माहितीनुसार आज सकाळी १० वाजतापासून पोलिस नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यात नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आल्याचेही वृत्त आहे. मात्र संख्येबाबत कोणतीही स्पष्टता नाही. सोबतच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य व शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. चकमक सुरू आहे तो परिसर घनदाट जंगलाने वेढलेला आहे. यामुळे त्याठिकाणी संपर्क साधण्यात अडचण निर्माण होत आहेत.

महाराष्ट्र – छत्तीसगडच्या सीमेवरील भामरागड तालुक्यातील अबुझमाड परिसरात नक्षलवाद्यांच्या हालचाली सुरू असल्याची गुप्त माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सी-६० या नक्षलविरोधी पथकाने शनिवारी सकाळपासून परिसरात नक्षलविरोधी अभियान आरंभले होते. पथक दृष्टीपथात येताच नक्षलवाद्यांकडून अचानक गोळीबार सुरू करण्यात आला. जवानांनीसुद्धा प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यात एक नक्षलवादी ठार झाला. मात्र मृत नक्षल्यांची तसेच जखमींची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. नक्षल्यांच्या संख्येबाबतही अद्याप स्पष्टता नाही.

अजूनही चकमक सुरू असल्याचे कळते. नक्षल्यांची कोंडी करण्याचे पुरेपूर प्रयत्न केला जात आहेत. पहिली चकमक झाली त्या ठिकाणावरील मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. मुख्यालयातून सत्त लक्ष ठेवले जात आहे. मात्र संपर्कात अडचणी येत असल्याचे वृत्त आहे. घटनेबाबत सविस्तर माहितीसाठी थोडा आणखी वेळ वाट बघावी लागणार आहे. घनदाट जंगलात ही चकमक सुरू असल्याने पथकाकडून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.

महाराष्ट्र आणि छत्तीसगड पोलिसांकडून सातत्याने अभियान राबविले जात असल्याने नक्षलवाद्यांचे कंबरडेच मोडले गेले आहे. यामुळेच दीर्घकाळापासून नक्षल चळवळ लयाला गेल्याचे भासत होते. अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणही केले. नक्षली चळवळीचा पुरता विमोड झाल्याची चर्चा सुरू झाली असतानाच आता पुन्हा ही चळवळ डोके वर काढू लागली आहे. त्यामुळे स्थानिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.