प्रेरणादायी! शेतकरी कन्या झाली अग्निवीर

0

भारतीय नौदलात निवड

वाशिम. मुलींसाठी सैनिकी सेवा (Military service ) हे कठीण क्षेत्र मानले जाते. म्हणूनच भारतीय सैन्यात महिलांची संख्या फारच कमी आहे. अलिकडे मात्र मुलींमध्ये देखील सैन्यात जाण्याची चढाओढ सुरू असल्याचे सकारात्मक चित्र दिसते आहे. सर्वसामान्य कुटुंबातील अगदी शेतकऱ्यांच्या घरातील कन्यांना देखील क्षेत्र खुणावते आहे. या क्षेत्राकडे तरुणींचा ओढा वाढतो आहे. वाशिमच्या काजळांबा (Kajalamba of Washim) येथील शेतकरी कुटुंबातील मनीषा राजकुमार उगले या २० वर्षीय तरुणीची सैनिकी सेवेत निवड झाली (Selection of a farmer’s daughter in the army ) आहे. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात तिने अपेक्षित यश गाठले आहे. इंडियन नेव्हीमध्ये तिची निवड झाली आहे. ती जिल्ह्यातील पहिली महिला अग्निविर ठरली आहे. या यशासाठी तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिचे हे यश अन्य मुलींसाठी देखील प्रेरणादायी ठरणारे आहे.

अभ्यासात हुशार असणारी मनीषाचे वडील शेतकरी आहेत. मनीषाला इतर मुलींपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. आपण मोठे होऊन देश सेवेत जाण्याचा तिने निर्णय घेतला आणि अथक परिश्रम घेतले. मुंबई येथे तिने अर्ज केला. परीक्षा पास झाली. मैदानी चाचणी परीक्षेत यश संपादन केले. सर्व पात्रता पूर्ण करून ४ महिन्यांचे प्रशिक्षणही पूर्ण केले. लवकरच ती तिच्या गावी येत आहे. वडील शेतकरी कुटुंबातील असूनही त्यांनी केवळ मनीषालाच नव्हे, तर मनीषाची मोठी बहीण आणि भावाला शिकविले. मनीषा ही ग्रामीण भागातील तरुणी आज देश सेवा करणार आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने सैनिक सेवेत यश संपादन करून मुलीही कुठेच मागे नसल्याचे तिने हे सिद्ध करून दाखविले आहे. तिने गाठलेल्या यशामुळे सर्वच क्षेत्रांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव आहे. मनीषाने समस्त महिला वर्गाची मना गौरवाने उंचावली असल्याची भावना महिलांमधून व्यक्त होते आहे. मनीषासुद्धा या यशामुळे उत्साही आहे. मुलींनी कुठेच स्वतः ला कमी न लेखता जिद्दीने प्रयत्न करावेत, असा तिचा संदेश आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा