श्रद्धांजलीतून उलगडणारे गुरुजी

0

1

(RSS)राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे(Sarsangchalak Shri. Madhav Sadashiv Golwalkar) सरसंघचालक श्री. माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य (Mr. Madhav Sadashiv Golwalkar epithet) श्री. गुरुजी यांच्या निधनाला ५ जून २०२३ रोजी पन्नास वर्षे पूर्ण होतील. एखाद्या व्यक्तीची सावली भविष्यावर किती दूरवर पडलेली आहे यावरून त्या व्यक्तीच्या श्रेष्ठत्वाचे मोजमाप केले जाते. श्री. गुरुजींच्या व्यक्तित्व, कृतीत्वाची आणि विचारांची सावली त्यांच्यानंतर पन्नास वर्षांनी देखील दिसून येते. ती आणखीन किती दूरवर पसरली आहे हे येणारा भविष्यकाळ सांगेल.

भविष्यावर आपली एवढी छाप सोडणाऱ्या या व्यक्तिमत्वाची, त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या विचारांची खरीखुरी जाणीव मात्र त्यांच्या निधनानंतरच सगळ्यांना झाली. त्यांच्यानंतर सरसंघचालक झालेले श्री. बाळासाहेब देवरस यांनी तर प्रकटपणे ही भावना बोलून दाखवली होती. एका भाषणात ते म्हणाले होते – ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचे सरसंघचालक श्री. गुरुजी यांच्याविषयी समाजाच्या सर्व थरात श्रद्धा आणि आदराची इतकी भावना वसत असेल याची आम्हा मंडळींना कल्पना नव्हती. इतकेच नव्हे तर ज्यांची आम्हाला अपेक्षाही नव्हती अशा लोकांनीही श्री. गुरुजींच्या व्यक्तिमत्वाबद्दल गौरवोद्गार प्रकट केले आहेत.’

गुरुजींच्या निधनानंतर त्यांना मोठ्या प्रमाणावर श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यात संघ व संघाचे कार्यकर्ते यांच्यासोबतच; संघाशी संबंधित नसलेले सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक गणमान्य लोक; तसेच वृत्तपत्रांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. अनेकांनी वाहिलेल्या या श्रद्धांजलीतून गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचे एक अनोखे दर्शन घडते.

श्री. गुरुजी कधीही राजकीय जीवनात नव्हते. कोणत्याही विधिमंडळाचे अथवा देशाच्या संसदेचे सदस्य तर ते नव्हतेच, पण त्यांनी कधीही कोणतीही निवडणूक लढवली देखील नाही. परंतु त्यांच्या निधनानंतर भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहात आणि काही राज्यांच्या विधिमंडळात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या लोकप्रतिनिधीगृहात श्री. गुरुजींना श्रद्धांजली वाहणाऱ्यांमध्ये फक्त तत्कालीन जनसंघाचे किंवा हिंदू विचारधारेच्या अन्य पक्षांचे सदस्यच होते असे नाही; तर काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी, द्रमुक, रिपब्लिकन, मुस्लिम आणि अपक्ष सदस्य सुद्धा होते.

देशाचे तेव्हाचे राष्ट्रपती श्री. व्ही. व्ही. गिरी, देशाच्या तेव्हाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनीदेखील स्व. गोळवलकर गुरुजींना श्रद्धांजली वाहिली होती. राष्ट्रपती श्री. गिरी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले होते की, ‘श्री. गोळवलकर हे गंभीर असे धार्मिक प्रवृत्तीचे पुरुष होते. त्यांच्या मृत्यूने त्यांच्या असंख्य चाहत्यांना व अनुयायांना अतिशय दुःख झाले आहे. त्यांच्याविषयी मी हार्दिक संवेदना आणि सहानुभूती व्यक्त करतो.’

तत्कालीन लोकसभा अध्यक्ष श्री. गुरूदयालसिंग धिल्लो यांनी सभागृहात ठेवलेल्या श्रद्धांजली ठरावात म्हटले होते की, ‘श्री. गोळवलकर हे श्रेष्ठ संघटनक्षमता असलेले नेते होते. आपले व्यक्तित्व, विद्वत्ता आणि उद्दिष्टांबद्दल अथांग निष्ठा यांच्यामुळे ते लोकजीवनात व विचारवंतात प्रमुख समजले जात. त्यांचे विचार आणि राजकीय दर्शन याबाबत काही लोकांचा मतभेद असू शकतो. परंतु त्यांनी आपल्या पद्धतीने देशसेवेसाठी अथक प्रयत्न केले हे सत्य आहे. त्यांच्या निधनाने देशाच्या सार्वजनिक जीवनाची फार मोठी हानी झाली आहे.’

त्यावेळी राज्यसभेचे अध्यक्ष असलेले देशाचे उपराष्ट्रपती श्री. गोपालस्वरूप पाठक यांनी सभागृहाला सादर केलेल्या श्रद्धांजली ठरावात म्हटले होते – ‘श्रेष्ठ संघटन क्षमता असलेले ते एक पुरुष होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेत अर्पण केले. ते अतिशय धार्मिक होते आणि हिंदू संस्कृती व सभ्यता यात सुधारणा व्हावी म्हणून त्यांनी एकरूप होऊन कार्य केले. आपल्या राष्ट्रजीवनात त्यांनी आदरपूर्ण स्थान प्राप्त केले होते. त्यांच्या निधनामुळे एक सन्माननीय व्यक्ती आपण गमावून बसलो आहोत.’

देशाच्या त्यावेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी गुरुजींना श्रद्धांजली वाहताना म्हणाल्या होत्या – ‘या सभागृहाचे सदस्य नसलेली एक प्रतिष्ठित व्यक्ती श्री. गोळवलकरजी हेही आज आपल्यात राहिलेले नाहीत. ते विद्वान होते आणि समर्थ अशा कळकळीचे पुरुष होते. आमच्यापैकी अनेक जण त्यांच्या मूलभूत विचारांशी सहमत नव्हतो. परंतु त्यांनी आपल्या अनुयायांवर खोल असा प्रभाव निर्माण केला आहे.’

द्रमुक पक्षाचे इरा सेजियन, जनसंघाचे जगन्नाथराव जोशी, संघटन काँग्रेसचे श्यामनंदन मिश्रा, स्वतंत्र पक्षाचे पी. के. देव, समाजवादी पक्षाचे समर गुहा, अपक्ष डॉ. कर्णसिंह, अपक्ष पुरुषोत्तम मावळंकर या खासदारांनीही लोकसभेत श्री. गुरुजींना श्रद्धांजली वाहिली होती.

त्यावेळी श्री. श्यामनंदन मिश्रा म्हणाले होते की, ‘गुरू गोळवलकर हे कित्येक प्रकारांनी एक विशेष पुरुष होते. त्यांचे आमचे तात्विक मतभेद होते. पण इतके मात्र मी अवश्य म्हणेन की, ते एक फार श्रेष्ठ मनिषी होते. चिंतक होते. तप:पूत पुरुष होते. भारतीय वाङ्मयाचे मोठे जाणकार होते आणि मला तर असे वाटते की, ते एक मोठे कर्मयोगी आणि आत्मज्ञानीही होते. म्हणूनच कॅन्सरसारखा रोग झाला असतानाही जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. त्यांच्यात अद्भुत संघटन शक्ती होती. त्यांचे जीवन आणि त्यांचे व्यक्तित्व प्रेरणास्रोत होता. म्हणूनच त्यांनी लाखो कार्यकर्त्यांना प्रेरित केले आणि एवढ्या मोठ्या संख्येत लोकांना पुढे नेले.’

श्री. समर गुहा आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले होते – ‘श्री. गुरुजी गोळवलकर यांच्या बाबतीत ते केवळ विद्वान होते एवढीच बाब नाही. कारण अशा विद्वानांप्रमाणे त्यांनी एकांत जीवन घालवले नाही. ते देशभक्त होते आणि त्यांनी राष्ट्रीय कार्यात देशभक्ती, समर्पण आणि सेवाभाव देशाच्या हजारो तरुणांत गेली चाळीस वर्षे सतत संचारित केला.’

महाराष्ट्र विधानसभेत त्यावेळचे मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांनी स्वतः गुरुजींच्या श्रद्धांजलीचा प्रस्ताव सादर केला होता. गुरुजींच्या जीवनाची धावती ओळख करून दिल्यावर श्री. नाईक आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले होते – ‘हिंदू विचारांच्या आधारे आधुनिक भारतीय जीवनाचे पुनरुत्थान कसे करता येईल हा त्यांच्या सखोल चिंतनाचा विषय होता. त्यांच्यात विद्वत्ता व कर्तृत्व यांचा अपूर्व संगम होता. त्यांना अनेक भाषा अवगत होत्या.’ यानंतर आपल्या व्यक्तिगत संबंधांचा उल्लेख करताना ते म्हणाले – ‘इ.स. १९७० पासून ते कर्करोगाने आजारी होते. त्या दिवसात त्यांची भेट होण्याचे भाग्य मला लाभले. त्यांच्याशी माझे घरगुती संबंध होते. त्यांच्या भेटीला गेलो तेव्हा त्यांचा उत्साह आणि आनंद पाहून असे वाटले की ते या रोगातून बरे होतील. परंतु तसे झाले नाही. हा महान नेता ५ जून १९७३ रोजी रात्री नऊ वाजता, वयाच्या ६७ व्या वर्षी हे जग सोडून गेला.’

श्री. कारखानीस, श्री. रामभाऊ म्हाळगी, श्री. अ. तु. पाटील, श्रीमती मृणाल गोरे, बॅरि. वानखेडे यांनीही महाराष्ट्र विधानसभेत गुरुजींना श्रद्धांजली वाहणारी भाषणे केली होती. समाजवादी पक्षाच्या श्रीमती मृणाल गोरे गुरुजींना श्रद्धांजली वाहताना म्हणाल्या – ‘प्रकाशझोतात न राहता जीवनभर एखाद्या संघटनेचे काम करत राहणे हे सोपे काम नाही. गोळवलकर गुरुजी यांनी ते करून दाखवले. आपल्या जीवनादर्शांनी त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर तरुणांना भारून टाकून, त्यांना ध्येयवादी बनवले आहे. गोळवलकर गुरुजींनी चारित्र्यसंपन्न नवीन पिढी तयार करण्यासाठी जीवनभर कष्ट केले. त्यांच्या विचारांशी सहमत नसलो तरीही, त्यांच्याबद्दल अभिमान बाळगल्याविना राहणे शक्य नाही.’

विधानसभेचे तेव्हाचे अध्यक्ष बॅरि. शेषराव वानखेडे यांनी नागपूरच्या लॉ कॉलेजमध्ये आपण गुरुजींच्या सोबत होतो अशी आठवण सांगितली होती. तेव्हापासूनच आमचे कधीही जमले नाही तरीही आमची मैत्री मात्र होती, असेही ते म्हणाले. मुंबईत आले की फोन करून ते विचारपूस करीत, असे सांगून ते म्हणाले की, गुरुजी ध्येयवादी होते.

महाराष्ट्र विधान परिषदेतही गुरुजींना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. श्री. वसंतदादा पाटील, श्री. उत्तमराव पाटील, श्री. ग. प्र. प्रधान, तेव्हाचे सहकार मंत्री यशवंतराव मोहिते, श्री. मनोहर जोशी, श्री. वि. घ. देशपांडे आदी सदस्यांनीही गोळवलकर गुरुजींना श्रद्धांजली अर्पण केली होती. श्री. ग. प्र. प्रधान त्यावेळी गुरुजींचा गौरव करताना म्हणाले होते – ‘माझ्या पिढीचे अनेक तरुण गुरुजींच्या प्रभावामुळे रा. स्व. संघात त्यागवृत्तीने व समर्पित भावनेने काम करत आहेत. जीवनाच्या अन्य क्षेत्रात आपली कर्तबगारी दाखवणे या तरुणांना शक्य होते. परंतु त्यांनी स्वतःला संघाच्या कामात समर्पित केले. यामागे गुरुजींचीच स्फूर्ती आहे. त्यांचे सगळेच विचार मान्य होतील असे नव्हते, पण त्यांनी समर्थ रामदास स्वामींची परंपरा पुढे चालवली होती. तरुणांमध्ये बलोपासना, देश व धर्माबद्दल श्रद्धा, तसेच संकुचित जीवनात न रमता समाजासाठी जीवन अर्पण करण्याची प्रेरणा; हे सारेच श्री. गुरुजींनी समर्थ रामदास यांच्याप्रमाणेच केले. त्यांच्या निधनाने देशाची हानी झाली आहे.’

गुरुजींना भारतीय संस्कृतीबद्दल नितांत श्रद्धा होती. आपल्या संस्कृतीचे रक्षण व्हावे व समाजमनातील भारतीयतेचे प्रमाण वाढत राहावे यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, असे भावपूर्ण उद्गार श्री. यशवंतराव मोहिते यांनी काढले होते.

राजस्थान आणि बिहार विधानसभेतही श्री. गुरुजींना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. श्री. बरकतुल्ला खान हे त्यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री होते. ३ ऑक्टोबर १९७३ रोजी विधानसभेत बोलताना ते म्हणाले, ‘गोळवलकरजी विद्वान व समजदार व्यक्ती होते. त्यांचे स्वतःचे आयुष्य शिस्तशीर होते आणि त्यांनी बाकीच्यांच्या आयुष्यात शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ते बोलले कमी आणि त्यांनी काम जास्त केले. त्यांच्या निधनावर मी शोक व्यक्त करतो.’ याशिवाय लक्ष्मणसिंह डुंगरपुर, गुमानमल लोढा, निरंजननाथ आचार्य आदी सदस्यांनीही राजस्थान विधानसभेत गुरुजींना श्रद्धांजली वाहिली होती.

बिहार विधानसभेत अब्दुल गफुर, कुंवर वसंत नारायण सिंह, कर्पूरी ठाकूर या लोकप्रतिनिधींनी गोळवलकर गुरुजींना श्रद्धांजली वाहिली होती. कर्पूरी ठाकूर गुरुजींचा गौरव करताना म्हणाले, ‘देशात सगळीकडे दिखावा आणि झगमगाट यांचे जे वातावरण आहे त्यात गुरुजींनी एक अनुकरणीय उदाहरण प्रस्तुत केले. साधेपणा, संयम आणि अनुशासन त्यांच्या जीवनात ओतप्रोत होते. त्यांच्या जीवनात केवळ विचार नव्हते तसे आचारही होते. आमचे त्यांच्याशी अनेक बाबतीत गंभीर मतभेद होते परंतु त्यांनी आपल्या विचारांपेक्षा आपल्या आचरणाने देशभर लाखो लाखो लोकांना प्रभावित केले. अशी व्यक्ती सामान्य असूच शकत नाही. ते महानच होते. मी आपल्या पक्षातर्फे त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करतो.’

संसद आणि विधिमंडळ याबाहेर सुद्धा सार्वजनिक आणि राजकीय जीवनातील अनेकांनी गुरुजींच्या निधनावर शोक व्यक्त करून त्यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आचार्य विनोबा भावे, अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण, संरक्षण मंत्री जगजीवनराम, काँग्रेस पक्षाचे तेव्हाचे अध्यक्ष डॉ. शंकरदयाल शर्मा, समाजवादी नेते एस. एम. जोशी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आदी मान्यवरांचाही त्यात समावेश होता.

आचार्य विनोबा भावे गुरुजींना श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले होते – ‘माझ्या मनात त्यांच्यासाठी खूप आदर आहे. त्यांचा दृष्टिकोन व्यापक, उदार आणि राष्ट्रीय होता. प्रत्येक गोष्टीचा ते राष्ट्रीय दृष्टिकोनातून विचार करीत असत. अध्यात्मावर त्यांचा अतूट विश्वास होता आणि सगळ्या धर्मांविषयी त्यांच्या हृदयात आदराचा भाव होता. त्यांच्यात कणभरही संकुचितता नव्हती. ते नेहमीच उच्च राष्ट्रीय विचारांनी कार्य करत. अध्यात्मप्रेमी असलेले श्री. गोळवलकर इस्लाम, ख्रिश्चन धर्मांकडेही आदराच्या दृष्टीने पाहत आणि भारतात कोणीही वेगळे राहू नये अशी अपेक्षा करीत असत.’

श्री. गोळवलकर यांच्या निधनाने सार्वजनिक जीवनातील एक अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व हरपले आहे. ते विद्वान आणि चारित्र्यवान व्यक्ती होते, अशा शब्दात तेव्हाचे केंद्रीय अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. संरक्षण मंत्री जगजीवनराम गुरुजींना श्रद्धांजली वाहताना म्हणाले होते; गुरुजींच्या निधनाने, संघटना उभारण्याची योग्यता आणि राष्ट्रहितासाठी कष्ट करण्याची क्षमता असलेला नेता भारताने गमावला आहे.

श्री. गोळवलकर यांच्या निधनाने एका तपस्वी जीवनाची ज्योत विझली आहे, असे भावपूर्ण उद्गार समाजवादी नेते एस. एम. जोशी यांनी काढले होते. गोळवलकर गुरुजींनी एखाद्या जहाजाच्या कप्तानाप्रमाणे संघाला अनेक संकटातून पुढे नेले, असे उद्गार बाळासाहेब ठाकरे यांनी काढले होते. माकपचे कॉम्रेड तकी रहीम म्हणाले होते, आपण त्यांना पाहिले नाही पण त्यांच्या प्रेरणाशक्तीचा अनुभव मात्र घेतलेला आहे. स्वतंत्र पक्षाचे मधू मेहता यांनी, महान देशभक्त असे गुरुजींचे वर्णन केले होते. पाटण्याचे काँग्रेस नेता हाफिझुद्दिन कुरेशी म्हणाले, ‘ते महापुरुष होते. त्यांच्याबद्दल अनेकांचे गैरसमज होते. मात्र ते सांप्रदायिक नव्हते. मुस्लिमविरोधी देखील नव्हते. श्री गुरुजी समान अधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते.’

त्यांच्यापुढे उभे झाले की, हिंदू शीख हा भेद संपून जात असे, अशा भावना अकाली दलाचे जत्थेदार संतोष सिंह यांनी व्यक्त केल्या होत्या. सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभेचे ओमप्रकाश त्यागी, हिंदू महासभेचे प्रो. राम सिंह या राजकीय नेत्यांनीही गुरुजींबद्दल आदरभावना व्यक्त केल्या होत्या.

श्री. गुरुजींच्या निधनानंतर पाटणा येथे झालेल्या श्रद्धांजली सभेत लोकनायक जयप्रकाश नारायण उपस्थित होते. त्यावेळी ते आजारी होते. त्यांचा श्वास लागत होता. ते कुठेही जात येत नसत. परंतु गुरुजींच्या श्रद्धांजली सभेला ते आले आणि आपल्या शारीरिक अस्वस्थतेचा उल्लेख करून, गुरुजींबद्दल आपल्या मनात असलेल्या उत्कट भावनांमुळेच आपण सभेला आल्याचे ते म्हणाले. विविध पक्षांचे लोक सभेला आहेत हे पाहून आपल्याला बरे वाटले असे नमूद करतानाच; राष्ट्रपती गिरी व पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही गुरुजींना श्रद्धांजली वाहिली असताना, स्थानिक काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षाचे कोणी सभेला नाही याबद्दल त्यांनी खेदही व्यक्त केला. मार्क्सवादी मित्राचे भाषण ऐकून मात्र आनंद झाल्याचे ते म्हणाले. ‘श्री. गुरुजी तपस्वी होते. त्याग हा त्यांचा सगळ्यात मोठा आदर्श होता. महात्मा गांधी आणि त्यापूर्वी भारतात जन्मलेल्या महापुरुषांच्या परंपरेतील श्री. गुरुजी होते’; असे भावपूर्ण उद्गार काढून ते म्हणाले; ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या मोठ्या संघटनेचे प्रमुख असूनही त्यांनी साधेपणाने जीवन व्यतीत केले. संघाच्या स्वयंसेवकांशी आपला अनेकदा संबंध आल्याचे नमूद करून, दुष्काळाच्या वेळी स्वयंसेवकांनी केलेले कार्य अपूर्व होते; असेही ते म्हणाले. श्री. गुरुजी आध्यात्मिक विभूती होते आणि भारताचे निर्माण भारतीय आधारावरच होऊ शकते हा बोध त्यांनी तरुणांच्या मनात जागवला, असे गौरवपूर्ण उद्गारही जयप्रकाश नारायण यांनी त्या सभेत काढले होते.

____________________________________________________________________________________

2

५ जून १९७३ रोजी गोळवलकर गुरुजी यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर अनेक मान्यवरांनी विविध नियतकालिकात लेख लिहून त्यांच्याबद्दलच्या आपल्या आठवणी आणि भावना व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. यात संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह संघाबाह्य मान्यवरांचाही समावेश होता.

पुण्याच्या केसरी दैनिकाचे संपादक राहिलेले श्री. ग. वि. केतकर यांनी १७ जून १९७३ च्या ‘साप्ताहिक विवेक’मध्ये लिहिलेल्या लेखात; १९४८ मध्ये संघावर घालण्यात आलेल्या बंदीच्या काळावर आणि बंदी उठवण्याचा प्रयत्नातील त्यांच्या स्वतःच्या भूमिकेवर विस्तृत प्रकाश टाकला होता. संघावरील त्या बंदीच्या विरोधात श्री. केतकर यांनी ‘केसरी’मध्ये ‘पहिले फाशी, मग चौकशी’ या शीर्षकाने लेखमाला लिहिली होती. कदाचित म्हणूनच आपल्याला बंदी उठवण्याच्या चर्चेत केंद्र सरकारने सहभागी करून घेतले असावे, असे केतकर त्या लेखात म्हणतात. कोणतीही ओळख वा संबंध नसताना आलेली पं. मौलिचंद्र शर्मा यांची तार, सरदार पटेल यांच्याशी झालेली भेट, गुरुजींशी शिवनी कारागृहात झालेली भेट; इत्यादी घटनांचा सविस्तर उल्लेख श्री. केतकर यांनी या लेखात केलेला आहे.

संघावरील बंदी सरदार पटेल यांना मान्य नव्हती आणि याबाबतीत ते दिल्लीत एकटे पडले होते, ही अधिकृत माहिती श्री. केतकर या लेखातून सांगतात. संघाने बंदीविरुद्ध सुरू केलेला देशव्यापी सत्याग्रह थांबवण्यासाठी संघ व सरकार यांच्यात मध्यस्थ म्हणून काम केलेले ग. वि. केतकर लिहितात, ‘आपण कारागृहात आहोत याचा विषाद गुरुजींच्या वृत्तीत कुठेही नव्हता. ते आनंदी होते. मात्र संघाला कमीपणा येऊ नये यासाठी ते अतिशय दक्ष होते. सत्याग्रह स्थगित करणारे निवेदन स्वयंसेवकांसाठी तयार करताना त्यांनी ते विलक्षण सावधपणे तयार केले. चार वेळा मसुदा तयार केला आणि बाजूला ठेवला. प्रत्येक शब्दावर ते चिंतन करीत होते. प्रत्येक शब्द त्यांच्यासाठी मोलाचा होता. अखेर पाचवा मसुदा मान्य झाला. केतकर यांची शिवनी कारागृहातील ही दुसरी भेट पाच तास चालली होती. सत्याग्रह स्थगित झाल्यानंतर चार महिन्यांनी संघावरील बंदी उठली. तोवर गुरुजी, आपण स्वतः आणि सरदार तिघेही अधांतरी होतो; असा उल्लेख करून श्री. केतकर लिहितात की; त्या मधल्या चार महिन्यात, गुरुजींना अकारण सत्याग्रह वापस घ्यायला लावला असे आरोपही माझ्यावर झाले होते. संघावरील बंदी उठल्यानंतर, त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या श्री. व्यंकटराम शास्त्री व पंडित मौलिचंद्र शर्मा यांच्यासोबत, गुरुजींनी आपल्या नावाचाही उल्लेख केला होता आणि आपल्याला धन्यवाद देणारे पत्रही पाठवले होते; अशी आठवणही केतकर लेखात सांगतात.

‘दैनिक हिंदुस्थान’ या हिंदी वृत्तपत्राचे संपादक श्री. क्षितिश वेदालंकार यांनी, ८ जुलै १९७३ च्या ‘साप्ताहिक पांचजन्य’मध्ये विस्तृत लेख लिहून गुरुजींच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला होता. १९७१ सालचा आपला अनुभव सांगताना श्री. वेदालंकार लिहितात, ‘आर्य विशेष गाडीने ४०० प्रवाशांसह दक्षिण भारत यात्रा करून परतताना आम्ही नागपूरला थांबलो आणि संघाच्या कार्यालयात गेलो होतो. त्यावेळी गुरुजींशी आमची ओझरती भेट झाली. ते बाहेर जाण्याला निघत होते. परंतु सगळ्या लोकांनी वारंवार आग्रह केल्यावर ते आमच्याशी थोडा वेळ बोलले. त्यांच्या त्या बोलण्याला भाषणही म्हणता येणार नाही आणि गप्पाही म्हणता येणार नाही. हृदयाच्या खोल तळातून आलेली ती आत्माभिव्यक्ती होती. त्यात अहंकार, सरसंघचालकत्वाचा नेतृत्वबोध, स्वतःला बाकीच्यांवर थोपण्याचा प्रयत्न, उपदेश असे काहीही नव्हते. होती फक्त – त्यांच्या मनात सतत तेवणारी राष्ट्रासाठी स्वतःला पूर्ण समर्पित करणारी धूरविहीन ज्योती, उपस्थितांच्या मनात पेटवण्याची एक इच्छा.’

आपल्या या लेखात श्री. वेदालंकार आणखीन एका विषयावर फार मोलाचे विवेचन करतात. ते नागपूरला संघ कार्यालयात श्री. गुरुजींना भेटले त्यावेळी, त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानात अराजक सुरू झाले होते. टिक्का खान यांची हत्या झाल्याची माहितीही आली होती. नागपूरच्या या भेटीपूर्वी श्री. वेदालंकार त्रिपुराला गेले होते. तिथे संघाचे स्वयंसेवक असलेल्या आणि हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेसाठी प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या केशवचंद्र सुर यांच्याशी त्यांची भेट झाली होती. त्यावेळी बोलताना श्री. सुर यांनी त्यांना सांगितले होते की, पूर्व पाकिस्तानातील बातम्याही आपण हिंदुस्थान समाचारला पाठवत असतो. या बातम्या तुम्हाला कशा मिळतात? या प्रश्नावर श्री. सुर यांनी उत्तर दिले होते की, ते पूर्व बंगालचे मूळ निवासी आहेत. संघाचे स्वयंसेवक आहेत आणि संघाचे अनेक स्वयंसेवक त्यावेळीही पूर्व पाकिस्तानात राहत आहेत. त्या परिचित स्वयंसेवकांकडून आपल्याला तिथली माहिती मिळते. श्री. सुर प्रामाणिक आहेत आणि खरं तेच सांगताहेत की नाही याची श्री. वेदालंकार यांना स्वाभाविकच शंका आली. त्यावेळीच त्यांना माहिती कळली की, १९६५ च्या भारत पाक युद्धाच्या वेळी त्रिपुराचे मुख्यमंत्री स्वतः श्री. सुर यांच्या घरी काही माहितीची खातरजमा करण्यासाठी गेले होते.

या प्रत्यक्ष माहितीच्या आधारावर त्यांनी नागपूर भेटीत श्री. गुरुजींना प्रश्न विचारला की, ‘पूर्व पाकिस्तानात संघाचे काही कार्य आहे का?’ त्यावर गुरुजींनी उत्तर दिले होते की, ‘तिथे संघाचे काय काम असू शकते? पाकिस्तान सरकारची संघाबद्दल काय भूमिका असेल? ते संघाला सहन तरी करतील का? त्यामुळे तिथे संघाचे काम असण्याचा प्रश्नच नाही.’ गुरुजींच्या या उत्तराची माहिती देऊन पांचजन्यमधील लेखात श्री. वेदालंकार लिहितात, ‘गुरुजींनी माझ्या प्रश्नाला सावध आणि सुरक्षित उत्तर का दिले असावे?’ आपणच उपस्थित केलेल्या या प्रश्नाचे लगेचच उत्तर देताना ते लिहितात, ‘गुरुजींनी ते उत्तर देऊन अतिशय उच्च दर्जाचा राजकीय दूरदर्शीपणा तर दाखवलाच पण सोबतच संघाचे व्यक्तित्व राष्ट्रापेक्षा वेगळे नाही हेही दाखवून दिले. दुसरे कोणी असते तर याबद्दल शेखी मिरवली असती. परंतु गुरुजींना त्याची गरज नव्हती कारण ते या राष्ट्राशी संपूर्ण एकरूप झाले होते.’

नागपूरचे योगाभ्यासी मंडळ जगभरात प्रसिद्ध आहे. जनार्दन स्वामींच्या अथक प्रयत्नातून ते साकार झालेले आहे. या जनार्दन स्वामींनी गुरुजींच्या निधनानंतर नागपूरच्या दैनिक तरुण भारतच्या श्रद्धांजली विशेषांकात लेख लिहिला होता. इ. स. १९५१ साली त्यांची गुरुजींशी प्रथम भेट झाली होती. जनार्दन स्वामींनी या लेखात त्यांच्या त्या भेटीचे आणि नंतरच्या स्नेहसंबंधांचे वर्णन केले आहे. आपल्या पुस्तकांचे वाचन गुरुजींनी कसे आस्थापूर्वक केले आणि त्या पुस्तकांसाठी कसे सहकार्य केले हेही त्या लेखात त्यांनी सांगितले आहे. गुरुजींचे स्वभाववैशिष्ट्य सांगताना त्यांनी एक आठवण लेखात नमूद केली आहे. रा. स्व. संघाच्या शाखांमध्ये योगासने शिकवावीत. त्यामुळे देशभर सर्वदूर त्यांचा प्रसार होईल, अशी इच्छा आणि सूचना जनार्दन स्वामी यांनी गुरुजींना केली होती. त्यावेळी गुरुजी त्यांना म्हणाले – ‘तुमची सूचना चांगली आहे. संघाचे कार्यकर्ते त्यांना जे शक्य वाटतं ते करतात. अमुक केलं पाहिजे हे मी विशेष आग्रहाने सांगत नाही. तुमची इच्छा त्यांना सांगेन. बाकी ईश्वरी प्रेरणेने जसे होईल ते.’ या उत्तराबद्दल जनार्दन स्वामी लिहितात – ‘बुद्धीचा हा केवढा समतोल. एका अखिल भारतीय संघटनेच्या सर्वोच्च प्रमुखांचे ते उत्तर होते हे लक्षात घेतले पाहिजे.’

इ. स. १९६५ च्या विश्व हिंदू परिषदेच्या पहिल्या प्रयाग संमेलनाचीही एक आठवण जनार्दन स्वामी यांनी लेखात सांगितली आहे. धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदू करून घेण्याच्या मुद्यावरून एका सत्रात गोवर्धन पीठाचे शंकराचार्य आणि तुकडोजी महाराज यांच्यात मतभेद झाले. बराच वेळ चर्चा सुरू होती. अखेर जेवणाची वेळ झाल्याने चर्चा थांबवावी लागली. त्यामुळे तणावही निर्माण झाला. भोजनाच्या त्या वेळात गुरुजींनी संबंधित मंडळींशी संवाद साधला आणि त्यानंतर बैठक सुरू झाली तेव्हा कार्यक्रम सुरळीत पार पडला. वादाच्या विषयावर समाधानही झाले होते. श्री. गुरुजी हे अलौकिक सामर्थ्य व विशेष पुण्याची अपूर्व ज्योती होते,’ असे भावोद्गारही जनार्दन स्वामींनी लिहिले आहेत.

प्रसिद्ध गांधीवादी विचारक आणि साहित्यिक डॉ. जैनेंद्र यांनीही दिल्लीच्या पांचजन्य या हिंदी साप्ताहिकाच्या ८ जुलै १९७३ च्या अंकात गुरुजींवर लेख लिहून आपली श्रद्धांजली वाहिली आहे. गुरुजींशी आपली भेट हैद्राबादला जात असताना दिल्लीच्या सफदरजंग विमानतळावर पहिल्यांदा झाली होती. श्री. हंसराज गुप्ता यांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली होती, असे सांगून डॉ. जैनेंद्र लिहितात – ‘विमानात बसल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला. ते स्वतः माझ्याजवळ आले आणि म्हणाले, मी तुम्हाला ओळखतो. कसे काय? या माझ्या प्रश्नावर ते म्हणाले, डॉ. हेडगेवार यांच्या डायरीत मी तुमचे नाव वाचले आहे. त्या डायरीत अनेक ठिकाणी तुमचा उल्लेख आहे. आपण नागपूरला होतो आणि आपल्याला डॉ. हेडगेवार यांचा भरपूर स्नेह लाभला होता असे नमूद करून डॉ. जैनेंद्र पुढे लिहितात, त्यानंतर आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या.’ त्यांनी गुरुजींना प्रश्न विचारला – ‘तुमच्या समोरून इस्लाम आणि मुस्लिम बाजूला झाले तर तुमच्या कामाचा आधारच संपून जाईल.’ त्यावर गुरुजींचे उत्तर होते – ‘आमचे कार्य घृणेवर आधारले आहे असे आपण का समजता? हिंदू शब्दात कोणाचे खंडन कुठे आहे? आम्ही विरोधाच्या आधारावर काम करत नाही.’

याच प्रवासात त्यांनी मला नागपूरला येण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार मी एकदा नागपूरला गेलो व हेडगेवार भवनात त्यांना भेटलो. त्यांचा निवास पाहून मला खूप छान वाटले. एकही अनावश्यक व अधिकची वस्तू तिथे नव्हती. केवळ आवश्यक तेवढेच सामान. गुरुजी स्वतः अतिशय सरळ आणि सहज. माझ्या स्वागत सन्मानाकडे स्वतः लक्ष देत होते. गुरुपणा अनुभवायला मिळाला असता तरीही मला वावगे वाटले नसते पण तसे काहीच तिथे नव्हते. मला आश्चर्य वाटले. गुरुजी एखाद्या कार्यकर्त्यासारखे सगळी कामे करत होते.

त्यानंतर एखाद्या वर्षाने मी पुन्हा नागपूरला गेलो. त्यावेळी मी नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष सेठ पूनमचंद रांका यांच्या घरी राहिलो होतो. गुरुजी स्वतः मला भेटायला रांका यांच्या घरी आले होते. त्यांच्या सहज व्यवहारात किंचितही बदल नव्हता.

नंतरही कधी कधी भेट होत असे. दोनदा तर रेल्वे प्रवासात भेट झाली. आमच्यात मनमोकळी चर्चा होत असे. प्रत्येक मुद्यावर सहमती होतच असे असे नाही. मुख्य म्हणजे सहमती व्हायलाच हवी हे त्यांना आवश्यक वाटत नव्हते. एका संघटनेचे प्रमुख आणि विचारधारेचे प्रवर्तक असूनही त्यांची ही उदारता मला अतिशय प्रिय होती.

एकदा दिल्लीतील रामलीला मैदानावरील त्यांच्या एका सभेचे अध्यक्ष म्हणून मला बोलावण्यात आले होते. मला निमंत्रण मिळाले तेव्हा एक काँग्रेसी व्यक्ती जवळ बसली होती. त्यांनी विचारले, ‘तुम्ही संघाच्या कार्यक्रमाला जाणार?’ मी त्यांना म्हटले, ‘तुम्हाला माझ्याविषयी संशय का वाटतो? गुरुजींना तर नाही वाटत.’ सांगा कोणाला उदार म्हणू आणि कोणाला संकुचित?

आपल्या लेखाचा समारोप करताना डॉ. जैनेंद्र फार मार्मिक टिप्पणी करतात. ते लिहितात – ‘राजकारण फूट पाडतं. राष्ट्राला एक करण्याचं काम ते करू शकत नाही. गुरुजींचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनसंघात हरवला नाही ही मी गोळवलकरांची मौलिक विशेषता मानतो. त्यांचा संघ रचनात्मक आहे, राजकीय नाही.’

आर्य समाजाचे ज्येष्ठ नेते व खासदार राहिलेले प्रकाशवीर शास्त्री पांचजन्यच्या ८ जुलै १९७३ च्या अंकात लिहिलेल्या लेखात गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनोखे दर्शन घडवतात. ते लिहितात – ‘गुरुजींच्या ऋषीसदृश व्यक्तिमत्त्वात एक गूढ आकर्षण होते. त्यांना पाहताच मान श्रद्धेने झुकत असे. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्यापासून अनेक मोठ्या नेत्यांना त्यांच्यासमोर श्रद्धेने नतमस्तक होताना मी स्वतः पाहिलेले आहे. १९६५ च्या पाकिस्तानी आक्रमणाच्या वेळी बोलावलेल्या बैठकीत गुरुजींना आमंत्रित केल्याबद्दल कम्युनिस्टांनी गोंधळ करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सगळ्यांची राष्ट्रभक्ती निर्विवाद असल्याचे सांगून, लालबहादूर शास्त्री यांनी त्यांची तोंडे बंद केली होती. विनोदी स्वभाव हे त्यांच्या स्वास्थ्याचे आणि सफलतेचे रहस्य आहे. ते मोठ्यांशी मोठ्यांप्रमाणे आणि लहानांशी लहानांप्रमाणे बोलत असत. ते अत्यंत हजरजबाबी होते.’

___________________________________________________________________________________

3

गुरुजींच्या कर्करोगावर उपचार करणारे मुंबईचे डॉ. प्रफुल्ल देसाई यांनीही एका लेखाद्वारे गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला आहे. गुरुजींच्या कर्करोगाची तपासणी करण्यासाठी जेव्हा आपल्याला विचारले तेव्हा, ते कट्टरपंथी आणि संकुचित असल्याचा आपला समज होता. त्यांची तपासणी हे एक आव्हान आहे असे आपल्याला वाटत होते. परंतु तपासणीसाठी प्रत्यक्ष त्यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा आपला गैरसमज पूर्ण दूर झाला, असे डॉ. देसाई लिहितात.

ते लिहितात – ‘पहिल्याच भेटीत ते गंभीर प्रकृतीचे ज्ञानेच्छु असल्याचे; तसेच तर्कशील, विनम्र, प्रबुद्ध व दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून व समजून घेणारे असल्याचे माझ्या लक्षात आले. तपासणी झाल्यावर मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की, हा कर्करोग वाटतो आहे. निश्चित निदान आणि उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागेल. मी हे सांगितल्यावर ते किंचितही भयभीत झाले नाहीत. शस्त्रक्रिया न करता कर्करोगाला तसेच राहू द्यावे, असे त्यांचे मत होते. मी मात्र शस्त्रक्रिया करावी या मतावर ठाम होतो. थोडा वेळ विचार करून त्यांनी संमती दिली. ३० जून १९७० रोजी ते रुग्णालयात दाखल झाले आणि १ जुलै १९७० रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी वय ६५ वर्षे असूनही शस्त्रक्रियेला त्यांनी अनुकूल प्रतिसाद दिला. शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी ते उठून बसले व चालू फिरू लागले. रुग्णालयातील तीन आठवड्यांचे त्यांचे वास्तव्य माझ्यासाठी ज्ञानवर्धक होते. त्यांनी आपल्या आयुष्याविषयी विचारले आणि मी त्यांना न लपवता स्पष्ट सांगून टाकले. त्यावर ते म्हणाले, एवढे दिवस कामे उरकायला भरपूर झाले. शस्त्रक्रियेनंतर सात दिवसांनी ते उपनगरातील एका कार्यक्रमाला गेले होते. जेवढे दिवस ते रुग्णालयात होते तेवढे दिवस रुग्णालयात खुशी आणि हास्यविनोदाचे वातावरण होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पूर्ण वर्णन करण्यासाठी कोणतेही विशेषण योग्य आणि पुरेसे नाही. ते एक दार्शनिक व सखोल व्यासंगी होते. त्यांच्या विचारात विज्ञान, धर्म व संस्कृती यांचा समान समावेश होता. ते एक सहज रोगी होते. माझ्या अंदाजापेक्षा त्यांची जीवनयात्रा बरीच जास्त चालली.’

गुरुजींच्या मृत्यूनंतर सुमारे १७ वर्षांनी २४ नोव्हेंबर १९८० रोजी श्री. प्रभुदत्त ब्रम्हचारी यांनी त्यांच्यावर एक लेख लिहिला आहे. त्याची सुरुवातच आहे – ‘असे युगपुरुष कधीकधीच जन्माला येतात. अशा व्यक्ती कोणत्या एका देशाच्या, एका समाजाच्या नसतात; संपूर्ण विश्वाचा तो ठेवा असतो. गोळवलकरजी असे महापुरुष होते.’ या मताचे विवेचन करताना ते पुढे लिहितात – ‘पद, प्रतिष्ठा, पैसा, प्रमदा, कीर्ती; हे जीवाचे धर्म आहेत. गुरुजी त्यापासून सदैव दूर राहिले. आम्ही लोक जे स्वतःला साधुसंत म्हणवून घेतो; ते गृहत्याग करूनही; मठ, मंदिर, आश्रम, पैसा, प्रतिष्ठा यांच्या कचाट्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारे अडकलेले असतो. परंतु ते या साऱ्यापासून दूर होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक असूनही त्याबद्दल त्यांना मोह नव्हता. संघ आर्थिक संकटात असताना एकदा एका दानी माणसाने त्यांना एक लाख रुपये दिले आणि म्हणाला – तुम्हाला योग्य वाटेल त्यासाठी हे खर्च करा. त्यावर गुरुजींचे उत्तर होते – अमुक स्वामींच्या संस्थेला पैशाची गरज आहे त्यांनाच हे पैसे द्यावे. त्यांनी कधी स्वतःजवळ एक पैसा ठेवला नाही. कोणाकडे याचना केली नाही. कसला संग्रह केला नाही. एक कमंडलू आणि एक वस्त्र एवढाच त्यांचा संग्रह. ज्या घरी निवास असेल तिथे जे मिळालं तेच भोजन केलं. एकदा मला म्हणाले – लोकांना वाटतं की राष्ट्रपती होण्यासाठी मी हे संघटन करतो आहे. पण तसे नव्हते. जसे ते संघात आले तसेच निघून गेले. साधू संतांबद्दल विलक्षण आस्था असल्याने एखाद्या नाममात्र साधुलाही ते साष्टांग प्रणाम करीत. आदर करणारा आदर करून घेणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ असतो. गुरुजी कोणाचेही दोष पाहत नसत, ऐकत नसत. मी पंडित नेहरूंच्या विरुद्ध निवडणूक लढवली. नंतर एकदा ते आश्रमात आले होते. त्यावेळी एका पंडिताने एका संस्कृत श्लोकात असे निवेदन केले की, काश्मिरी मुलींचे नारी कवच तयार करून नेहरूंनी विजय मिळवला. हे ऐकून गुरुजी नाराज झाले होते. त्यांच्या अखेरच्या काळात मी त्यांना पाच दिवस भागवत कथा ऐकवली होती. कथा श्रवण करताना ते गद्गद होत. त्यांच्या नेत्रातून उत्कट भक्तीच्या धारा वाहू लागत. आमच्या आश्रमात शंभरेक विद्यार्थी असतात. त्यांच्यापैकी आमचे म्हणणे ऐकणारे क्वचितच असतात. गुरुजींचा शब्द झेलणारे मात्र हजारो स्वयंसेवक होते. हा त्यांच्या त्याग आणि तपस्येचा परिणाम होता. हिंदू समाजाची सेवा हेच त्यांचे जीवन होते.’

रा. स्व. संघावरील गांधी हत्येनंतरची बंदी उठवण्यात ज्यांची मोठी भूमिका होती त्या पंडित मौलिचंद्र शर्मा यांनीही पांचजन्य साप्ताहिकाच्या श्रद्धांजली विशेषांकात लेख लिहून आठवणी आणि भावनांना उजाळा दिला होता. बंदीविरुद्ध संघाने केलेल्या देशव्यापी सत्याग्रहानंतर संघाचे हजारो स्वयंसेवक तुरुंगात होते. संघावरील बंदीही कायमच होती. त्यावेळी एकनाथजी रानडे आणि वसंतराव ओक यांच्याशी चर्चा करून दिल्लीत जनाधिकार समितीची स्थापना करण्यात आली होती आणि पंडित मौलिचांद्र शर्मा त्या जनाधिकार समितीचे अध्यक्ष होते. देशभर फिरून त्यांनी स्वयंसेवकांच्या मुक्तीची आणि बंदी उठवण्याची मागणी केली होती. त्यावेळच्या मध्य प्रांताचे गृहमंत्री द्वारकाप्रसाद मिश्रा यांनी एक दिवस त्यांना नागपूरला बोलावले आणि देशाचे गृहमंत्री सरदार पटेल यांचा निरोप सांगितला. त्यानुसार पंडित शर्मा गुरुजींना शिवनी कारागृहात जाऊन भेटले. त्यावेळचा अनुभव कथन करताना ते लिहितात की, कोठडीत गेल्यानंतर चर्चा सुरू करण्यापूर्वी गुरुजींनी त्यांना थांबवले आणि पहिले तुमचे स्वागत व्हायला हवे असे म्हणून; त्यांच्याजवळ असलेल्या स्टोव्हवर स्वतः चहा करून त्यांना दिला. त्यानंतर कामाची बोलणी झाली तरीही पंडित शर्मा अनेक विषयांवर बोलत बसले. ते लिहितात की, आपण भारावून गेलो होतो. अखेर गुरुजींनी आपल्याला जाण्याची आठवण करून दिली. त्यानंतर बंदी उठली आणि गुरुजी नागपूरला परतले. त्यावेळी पंडित शर्मा उपस्थित होते. त्यावेळी नागपूरने केलेले गुरुजींचे स्वागत अभूतपूर्व होते. ते दृश्य विसरणे अशक्य आहे, असे नमूद करून; आपण गुरुजींसोबत त्यांच्या कच्च्या घरी गेलो होतो आणि त्यांच्या आईने आपल्या हातांनी आम्हाला जेवण वाढले होते; अशी आठवण ते सांगतात. त्यानंतरही त्यांची गुरुजींशी अनेकदा भेट झाली. नंतरच्या राजकीय घडामोडीत भारतीय जनसंघ स्थापन झाला. पंडित मौलिचांद्र शर्मा जनसंघाचे अध्यक्षही झाले होते. अन् काही काळानंतर जनसंघापासून दूरही गेले होते. याचा उल्लेख करून या श्रद्धांजली लेखात ते लिहितात – काहीच दिवसांनी मी जनसंघापासून बाजूला झालो परंतु गुरुजी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून दूर जाणे तर दूरच, त्यांच्याबद्दल माझी श्रद्धा वाढतच गेली.’

मुंबईच्या मराठा साप्ताहिकाने १९७३ च्या जुलै महिन्यात गुरुजी श्रद्धांजली विशेषांक काढला होता. प्रसिद्ध रिपब्लिकन नेते रा. सु. गवई यांनी त्यात श्रद्धांजलीपर लेख लिहिला होता. त्यात ते म्हणतात – ‘गुरुजींनी वर्णाश्रम व्यवस्थेचे समर्थन केले होते. आमच्यासारख्यांना हे कधीच मान्य होऊ शकत नाही. मात्र त्यांनी चातुर्वर्ण्याचे समर्थन दलितांबद्दलच्या दुर्भावनेतून केले नव्हते. किमान मी तरी तसे म्हणायला तयार नाही. गुरुजींचे विचार प्रामाणिक होते. तात्विक मतभेद म्हणूनच आम्ही त्यांच्यावर टीका केली. त्यांच्या विषयी दुर्भावना आमच्या मनाला स्पर्शही करू शकत नव्हती. विचारांबद्दल ते ठाम होते, त्यांची मते आग्रही होती; मात्र प्रत्यक्ष भेट आणि सहवासात ते अत्यंत मृदू, नम्र आणि विनयशील होते. त्यांच्याशी भेटीचा दोनतीनदा योग आला. त्यांच्यासारख्या लोकांना दुसऱ्याशी जमवून घेणे कठीण जाते पण गुरुजी त्याला अपवाद होते. राष्ट्रीय एकात्मतेचे निस्सीम भक्त असेच त्यांचे वर्णन करावे लागेल.’

तत्कालीन काँग्रेस नेते स. का. पाटील यांनीही ‘मराठा’च्या गुरुजी श्रद्धांजली विशेषांकात लेख लिहिला होता. या लेखाची सुरुवात करताना ते म्हणतात, एक महत्त्वाची माहिती आज प्रथमच देतो आहे. नंतर ते लिहितात – ‘गांधीजींच्या हत्येनंतर संघाबद्दल अनेक शंका निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी माझे एक मित्र मला गुरुजींकडे घेऊन गेले. आमची मोकळी चर्चा झाली. त्यानंतर मी गुरुजींना अनेकदा भेटलो. त्यांच्याबद्दल माझे मत अतिशय चांगले झाले. मी गृहमंत्री सरदार पटेल यांना माझे मत सांगितले. सरदार राष्ट्रीय वृत्तीचे होते. हिंदू धर्माबद्दल त्यांना आदर होता. नेहरू आणि सरदार यांची संघाकडे पाहण्याची दृष्टी भिन्न होती. पटेलांनी खूप प्रयत्नपूर्वक नेहरूंच्या मनातील संघाबद्दलचे गैरसमज दूर केले. सरदार आणि गुरुजी यांची भेट मी घडवून आणली होती. त्यांचे जीवन ध्येयसमर्पित होते. बलवान राष्ट्र, बलवान हिंदू धर्म यासाठी त्यांनी जीवन अर्पित केले होते. गुरुजी हिंदू धर्माचे अभिमानी होते पण अन्य धर्मांबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. आपल्या धर्माबद्दल आत्यंतिक निष्ठा याचा अर्थ दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष असा होत नाही. त्यांचे जीवन ऋषीमुनीसारखे होते. त्यांच्या निधनाने राष्ट्राने एक महान व्यक्ती गमावली आहे.’

१९६६ च्या गोरक्षा आंदोलनानंतर केंद्र सरकारने त्यावर विचार करण्यासाठी जी समिती नेमली होती त्यात अर्थतज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या श्री. अशोक मित्र यांनी कोलकात्याच्या ‘आजकाल’ या बंगाली दैनिकात गुरुजींच्या निधनानंतर बरेच वर्षांनी ‘गऊ कथा, गुरू कथा’ या शीर्षकाने एक लेख लिहिला होता. श्री. अशोक मित्र कम्युनिस्ट होते. पश्चिम बंगालच्या कम्युनिस्ट मंत्रिमंडळात मंत्री राहिले होते. एके काळी केंद्र सरकारचे आर्थिक सल्लागार होते. या लेखात त्यांनी गोरक्षेच्या संदर्भात केंद्राने नेमलेल्या समितीच्या कामाचे आणि समितीच्या सदस्यांच्या विचार व्यवहाराचे चित्र रेखाटले आहे. त्यात गुरुजींच्या विचार व्यवहारावर देखील त्यांनी प्रकाश टाकला आहे. गुरुजींच्या विचार व्यवहाराने समितीतील आम्हा सगळ्यांना अचंभित केले असा स्पष्ट अभिप्राय व्यक्त करून अशोक मित्र लिहितात, ‘गुरुजी म्हणजे अंधभक्ती व आतंक यांचे प्रतिनिधी असाच आमचा समज होता. परंतु समितीच्या या सर्वाधिक अबोल सदस्याने आमच्या सगळ्या समजुती मोडीत काढल्या. अतिशय आवश्यक असेल तेव्हाच ते बोलत. आपले मत नम्रपणे मांडत आणि कोणाचे म्हणणे त्यांना आवडले व पटले नाही तरी त्या व्यक्तीशी त्यांचा व्यवहार बदलत नसे. त्यांना भारतातील बहुतेक भाषा येत असत. माझ्याशी ते बांगला भाषेत बोलत. त्यांना माझी मते पटणे शक्यच नव्हते पण माझ्याशी त्यांचा व्यवहार अजिबात बदलला नाही. त्यांचा व्यवहार पुरीच्या शंकराचार्यांच्या पूर्णपणे विपरीत होता. मी हे अमान्य करू शकत नाही की, त्यांनी आपल्या व्यवहाराने मला मोहित केले होते.’ केंद्र सरकारची ही समिती भंग झाल्यानंतर साधारण वर्षभराने दिल्लीहून भोपाळला जाताना रेल्वेगाडीत आपले सहप्रवासी म्हणून गुरुजींची पुन्हा भेट झाली हे सांगून श्री. मित्र यांनी या लेखात त्या भेटीचे वर्णनही केले आहे. गुरुजी हे विनम्रतेची मूर्ती होते असे नमूद करून ते लिहितात, ‘कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीने लहानांशी ज्या स्नेहाने आणि उदारपणाने वागावे असे आपल्याला वाटते त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने स्नेह आणि उदारता मला त्यांच्या व्यवहारात अनुभवता आली. थोड्या गप्पागोष्टींनंतर मी एक पुस्तक वाचू लागलो. गुरुजींनीही पुस्तक काढले व ते वाचू लागले. माझ्यासाठी मोठा धक्का हा होता की, सनातन धर्माची ध्वजा वाहून नेणारे गुरुजी चक्क हेन्री मिलरची एक नवीन कादंबरी वाचत होते. माझ्या मनातील श्रद्धाभाव त्यावेळी आणखीनच वाढला.’

_____________________________________________________________________________________

4

एखादी व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीविषयी बोलते, लिहिते तेव्हा ती व्यक्तिगत दृष्टी, व्यक्तिगत मत, व्यक्तिगत अनुभव असतात. ते असत्य अथवा अवास्तव अथवा अति असतीलच असे नाही. परंतु असतात मात्र व्यक्तिगत. मात्र वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके ज्यावेळी लिहिणाऱ्या व्यक्तीच्या नावाविना संपादकीय टिप्पणी करतात, लेख लिहितात तेव्हा त्यात; लिहिणाऱ्या व्यक्तीचे मत, दृष्टी इत्यादी मिसळलेले असले तरीही, त्याचा एकूण आशय सामाजिक मताचा आणि व्यापक दृष्टीचा असतो. गोळवलकर गुरुजींवर उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, मध्य; अशा भारताच्या सगळ्या क्षेत्रांमधील नियतकालिकांनी, अनेक भाषांच्या नियतकालिकांनी जे लिखाण केले त्याकडे या दृष्टीने पाहिले पाहिजे. आणखीन एका गोष्टीचा उल्लेख आवश्यक ठरतो – गुरुजींचे निधन झाले त्यावेळी संघाचा प्रचार विभाग अस्तित्वातच आलेला नव्हता. त्यामुळे नियतकालिकांशी योजनापूर्वक संबंध वगैरे भाग नव्हता. जे होते ते उत्स्फूर्त. गुरुजींविषयीची नियतकालिकांची मते म्हणूनच महत्त्वाची ठरतात.

गुरुजींच्या निर्वाणानंतर टाइम्स ऑफ इंडिया दैनिकाने लिहिले होते – ‘श्री. गुरुजी हे लाखो अनुयायांमध्ये हिंदुत्वाचे त्राते आणि विवेकानंदांच्या रूपात पूजनीय होते. त्यांच्या टीकाकारांच्या दृष्टीने ते हिंदुत्वाचे हुकूमशहा होते. इतके असले तरी गुरुजी शक्तीचे प्रेरणाकेंद्र होते. आपल्या गौरवशाली इतिहासाविषयी अतिशय जागरूक राहून, आपले ऐतिहासिक व्यक्तित्व कायम राखून वाटचाल करणाऱ्या शक्तिशाली व संघटित भारताचे ते निर्माते होते.’

मुंबईच्या दैनिक ‘नवाकाळ’ने लिहिले होते – ‘मृत्यूची चिठ्ठी आली आहे याची गोळवलकर गुरुजींना जाणीव होती पण मृत्यूपुढे त्यांनी हार पत्करली नाही किंवा आपल्या जीवनाच्या ओघात त्यांनी फरकही केला नाही. राष्ट्रवाद हा जसा काही त्यांचा प्राण होता आणि त्यास पोषक असे सर्व तपाचरण, समर्पित जीवन आणि देशाची एकनिष्ठ सेवा करण्यावर त्यांचा भर होता. कॅन्सरच्या रोगामुळे शारीरिक यातना भोगत असतानाही त्यांनी आपल्या मनाचा समतोल कायम ठेवला. असा आनंद श्रोत्रीय आणि अकामहत अशा वामदेवासारख्या तपस्वी आणि कर्मनिष्ठ पुरुषांनाच प्राप्त होत असतो.’

दैनिक नवशक्तीने लिहिले होते – ‘गोळवलकरांनी मोठ्या तडफेने आणि अविचल मनाने संघकार्य चालू ठेवून ते आसेतुहिमाचल वाढविले. ही कामगिरी तशी सोपी नव्हती. त्यावेळेच्या वातावरणात दुसरी एखादी व्यक्ती राजकीय प्रवाहात वाहून गेली असती पण आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आणि निग्रहाने त्यांनी अंतर्गत विरोधाला तोंड देऊन आपल्या कल्पनेप्रमाणे संघाचे कार्य राजकारणापासून अलिप्त ठेवले. राजकारणापासून अलिप्तता हा त्यांच्या मुत्सद्देगिरीचा खेळ नव्हता तर तो त्यांच्या निष्ठेचाच भाग होता.’

महाराष्ट्र टाइम्स या दैनिकाने गुरुजींच्या वैशिष्ट्याची चर्चा करताना लिहिले होते – ‘स्वातंत्र्यानंतर राजकीय प्रलोभने भरपूर होती. गलितगात्र अशा राजकीय पक्षांनी सत्ताधारी पक्षाशी तडजोडी केल्या आणि भलेभलेही स्वपक्ष सोडून अधिकारपदस्थ झाले. गोळवलकर गुरुजींच्या मागे तर संघाचे संख्याबळ होते. याचा राजकीय सौद्यासाठी वापर करण्याचे त्यांना कधीही सुचले नाही हे त्यांच्याशी मतभेद असणाऱ्यांनाही अतिशय महत्त्वाचे वाटले. काँग्रेसमध्ये सामील होण्याचे सरदार पटेल यांनीच त्यांना आवाहन केले होते. परंतु गोळवलकर गुरुजींनी त्यांना साभार नकार दिला. आपल्या मतांशी प्रामाणिक राहून जन्मभर समाजसेवा करणाऱ्या व्यक्ती आता आहेत किती? या दुर्मिळतेमुळे तर गोळवलकर गुरुजींचे वैशिष्ट्य, कर्मयोगीत्व व त्याग हे सर्व उठावशीर ठरतात.’

मार्मिक या मुंबईच्या साप्ताहिकाने लिहिले होते – ‘आज शिवसेनेच्या सातव्या वर्धापन दिनी हिंदू समाजाच्या या थोर संघटकाला, सर्व सुखाचा त्याग करून राष्ट्रकार्यासाठी तनमन झिजवणाऱ्या या योगी पुरुषाला, शुद्ध सार्वजनिक जीवनाच्या आदर्शाला, आम्ही आदरभावाने आमची श्रद्धांजली अर्पण करीत आहोत.’

मसुराश्रम पत्रिका या मुंबईच्या मासिकाने लिहिले होते – ‘गुरुजींची प्रखर देशभक्ती आणि मातृभूमीच्या सेवेसाठी त्यांच्या ठिकाणी असलेला निस्वार्थ समर्पण भाव यामुळे स्तिमित झालेल्या मत्सरी मनांनी त्यांच्याविषयी सतत गैरसमज पसरविले. त्यांनी स्पष्ट शब्दात असे सांगितले होते की, या देशात आपल्याला पराक्रमवादाचे पुनरुज्जीवन करावयाचे आहे. त्यासाठी आपल्याला असे स्पष्टपणे सांगावे लागेल की, या भूमीत जे अहिंदू राहतात त्यांचा एक राष्ट्रधर्म आहे, एक समाजधर्म आहे आणि एक कुलधर्म आहे. फक्त त्यांचा जो व्यक्तीधर्म असेल त्यानुसार तो आपल्या आध्यात्मिक आशाआकांक्षांच्या पूर्ततेसाठी त्याला योग्य वाटेल तो उपासना पंथ निवडू शकतो. म्हणजेच त्याच्या या व्यक्तीधर्माच्या बाबतीतच त्याला उपासनेविषयी निवड स्वातंत्र्य आहे. मात्र इतर बाबतीत त्याने राष्ट्रीय जीवनप्रवाहात समरस झालेच पाहिजे.’

‘धर्मयुग’ या साप्ताहिकाने म्हटले होते – ‘विचारात मतभेद असूनही निरनिराळ्या पक्षांच्या नेत्यांच्या मनात त्यांच्या तपस्वी व्यक्तिमत्त्वाबद्दल पराकाष्ठेचा आदरभाव सतत वसत आला आहे.’

‘साप्ताहिक ब्लिट्झ’ने म्हटले होते – ‘आपल्या धारणांविषयीची त्यांची श्रद्धा दुबळी नव्हती. आपल्या ध्येयसिद्धीसाठी ते कोणत्याही प्रकारचा त्याग करण्यास सदैव कटिबद्ध असत. आपले ध्येय साध्य करण्यात ते सफल ठरले. त्यांची विचारप्रणाली पुनरुज्जीवनवादी होती की जातीयवादी होती हा विषय विवाद्य आहे; पण ज्या एकनिष्ठ भक्तीने त्यांनी संघाचे संगोपन केले त्याबद्दल कोणीही आक्षेप घेऊ शकणार नाही. त्यांचे वैयक्तिक जीवन संन्यस्त होते आणि त्यांची संघटनक्षमता अद्वितीय होती. त्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे व्यक्तीद्वेष नव्हता. आपल्या ध्येयाच्या वाटचालीत आळस कधी त्यांना शिवला नाही. त्यांच्या शब्दात कधी दुबळेपणा डोकावला नाही आणि कपाळावर कधी थकव्याच्या आठ्या आढळल्या नाहीत. पूर्णपणे समर्पित अशा या जीवनाचे अनुकरण इतर राजकीय नेत्यांनी करावे हे उचित ठरेल. याचमुळे ते आपल्या असंख्य अनुयायात स्वतःविषयी पराकाष्ठेची आदरभावना निर्माण करू शकतील.’

लोकसत्ता दैनिकाने लिहिले होते – ‘गोळवलकर गुरुजी हे एका लढाऊ संघटनेचे सेनानी असल्याने त्यांच्या विरोधकांना ते फॅसिस्ट नेते वाटत. विरोधकांना काय वाटत होते याला महत्व नाही परंतु सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने ते एक त्यागी, जीवनदानी व आदरणीय नेते होते.’

‘मदर इंडिया’ या मासिकाने लिहिले होते – ‘व्यास, वाल्मीकी, रामदास, तुलसीदास, तुकाराम, विवेकानंद आणि हजारो अन्य ऋषींच्या मुशीत ओतलेले हे एक व्यक्तिमत्व होते. अशा व्यक्तीचा कधी तरी मृत्यू होऊ शकतो काय? चर्मचक्षुपलीकडील चिरंतनाच्या प्रदेशात जाऊन अमरत्व प्राप्त करण्याचा तो एक केवळ संस्कार असतो.’

पुण्याच्या दैनिक सकाळने लिहिले होते – ‘त्यांची कार्यनिष्ठा, समाजहिताची तळमळ, देशप्रेम याबद्दल त्यांचे प्रतिस्पर्धी सुद्धा शंका घेऊ शकणार नाहीत. त्यागपूर्ण आणि समर्पित जीवनाचा आदर्श त्यांनी घालून दिला. असाध्य अशा आजाराशी झुंजतानाही आपले कठोर व्रत त्यांनी अखेरपर्यंत सोडले नाही. त्यांच्या विचारांशी सहमत नसलेल्या असंख्य लोकांना त्यांच्याबद्दल आदर वाटत असे तो त्यांच्या निष्ठापूर्ण आणि चारित्र्यपूर्ण जीवनामुळेच होय.’

‘माणूस’ या पुण्याच्या साप्ताहिकाने लिहिले होते – ‘सत्तेपासून अलिप्त असणारा पण सत्तेवर अंकुश ठेवू शकणारा यतीवर्ग ही एक भारतीयांची राजकारणातली, समाजरचनेतली प्राचीन काळापासून चालत आलेली आवडती कल्पना आहे. या कल्पनेचा पुरस्कार अलीकडच्या काळात गांधीजींनी केलेला असला तरी ही कल्पना प्रत्यक्ष व्यवहारात उतरविण्यासाठी कोणी पराकाष्ठेचे प्रयत्न केले असतील तर ते श्री. गोळवलकर गुरुजी यांनी.’

‘साप्ताहिक सोबत’ने लिहिले होते – ‘गोळवलकर या व्यक्तीच्या मोठेपणापेक्षा ते ज्या तत्त्वप्रचारासाठी उभे राहिले तो विचार अधिक मोठा आहे. त्या विचाराच्या रूपाने डॉक्टर हेडगेवार जसे चिरंजीव झाले तसेच गुरुजीही होतील. या देशाला अशा सर्वसंग परित्याग करणाऱ्या फकिरी वृत्तीच्या देशभक्तांची फार गरज आहे.’

नागपूरच्या ‘नागपूर टाइम्स’ या दैनिकाने लिहिले होते – ‘त्यांच्या वागणुकीतील अनौपचारिकता उल्लेखनीय होती. कुणीही आणि कुठेही त्यांना खुशाल भेटावे असे त्यांचे वागणे असे. त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे होते की, लहान मुले आणि वृद्ध यांच्याशी ते विनोद करीत असोत की अत्यंत वादविवादपूर्ण अशा बैठकीत ते बसलेले असोत, त्यांची उपस्थिती किंवा त्यांचे ज्ञान यामुळे वातावरणात कधी अवघडलेपणा येत नसे.’

‘नवभारत’ या दैनिकाने लिहिले होते – ‘देशापुढे ज्या ज्या वेळी निरनिराळ्या प्रकारची संकटे आली त्या त्या वेळी श्री. गुरुजींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या ध्येयानुसार जनतेत जाऊन जनतेची सेवा केली आणि जनतेत आत्मरक्षणाची भावना निर्माण केली.’

‘लोकमत’ या दैनिकाने लिहिले होते – ‘मनुष्याने सत्चारित्र्याने जगले पाहिजे, थोर मानल्या गेलेल्या पुरुषांनी सदाचरणाचा आदेश आणि आदर्श जनतेपुढे ठेवला पाहिजे आणि त्यागाने समाजसेवा केली पाहिजे; हा संदेश केवळ त्यांचे अनुयायी म्हणविणाऱ्यांसाठीच नव्हे तर अखिल भारतातील तरुणांसाठी आणि वृद्धांसाठीही मागे ठेवून गुरुजी परलोकी गेले आहेत.’

नाशिकच्या ‘गावकरी’ने लिहिले होते – ‘संघ स्थापन झाला त्यावेळची व स्वातंत्र्योत्तर काळाची परिस्थिती भिन्न होती. सारखे बदल होत होते पण संघाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून श्री. गुरुजी यांनी तो एका सूत्रात बांधलेला ठेवला व मूळ ध्येयापासून तो विचलित होऊ दिला नाही. संघाचे कार्य श्री. गुरुजी यांनी कोणाची भिडभाड न ठेवता एका उच्च पातळीवर चालविले ही गोष्ट कोणालाही नाकारता येणार नाही. आता या मार्गदर्शनाला संघ मुकणार आहे. अप्रिय असले तरी सत्य सांगणारा एक निधडा आणि स्पष्टवक्ता नेता देशाला आजही हवा होता. श्री. गुरुजींच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी लवकर भरून येणे अशक्य आहे.’

अकोल्याच्या ‘शिवशक्ती’ या दैनिकाने लिहिले होते – ‘त्यांनी देशातील जनतेवर मनापासून प्रेम केले. त्यांना भारतीय जनतेने आपल्या हृदयात कायमचे स्थान दिले आहे. गुरुजी त्यांच्या आदरस्थानीही होते. जनमानसाला नेता प्रिय असू शकतो. त्याच्यावर जनता प्रेमही करील. मात्र तेथे आदर असेलच असे नाही. गुरुजींच्या बाबतीत या दोन्ही गोष्टी होत्या. कार्यकर्त्यांना ते प्रिय तर होतेच शिवाय त्यांच्याविषयी आदरही होता. म्हणूनच त्यांचा आदेश हा देववाणीसारखा मानला जात असे.’

लखनऊच्या दैनिक पायोनियरने लिहिले होते – श्री. गोळवलकर हे कट्टर देशभक्त होते. ते परंपरावादी इतकेच काय पण पुनरुत्थानवादीही म्हटले जात. परंतु त्यांना संकुचित किंवा जातीयवादी म्हणणे हा त्यांच्यावर अन्याय करणे ठरेल. संपूर्ण राष्ट्र एकसूत्रात गुंफले गेले तरच आक्रमकांचा सामना करण्यासाठी समर्थ आणि शक्तिशाली राष्ट्र निर्माण होऊ शकेल हा त्यांचा सिद्धांत होता.

मायावतीच्या ‘प्रबुद्ध भारत’ या मासिकानेही गुरुजींवर लेख लिहून त्यांचा गौरव केला होता. प्रबुद्ध भारतने लिहिले होते – श्री गोळवलकर हे खूप विवादास्पद व्यक्तित्व होते. एकीकडे त्यांचे अनुयायी त्यांच्यावर अलोट प्रेम करीत होते. खूप आदर बाळगून होते तर दुसरीकडे त्यांच्यावर टीका करणारे त्यांच्या संबंधात भयंकर अशी घृणा प्रकट करीत असत. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर आज आपल्याला काय आढळून येते? बहुधा त्यांनाही आश्चर्य वाटत असेल की, देहत्यागानंतर त्यांच्याविषयीचा वाद समाप्त होऊन राखेत मिसळून गेला आणि त्यांचे निर्मळ जीवन त्या राखेतून तेजस्वीपणे चमकून उठले. त्यांच्या स्मृतीला आज जी श्रद्धासुमने अर्पण केली जात आहेत त्यात अनेक श्रद्धासुमने तर अशा लोकांकडून अर्पिली गेली आहेत की ज्यांच्याकडून तशी अपेक्षाही नव्हती. बिनधाग्याच्या या श्रद्धांजली पुष्पहारातील अनेक पुष्पे निरनिराळ्या ठिकाणाहून स्वाभाविकरीत्या उमलून एकत्रित आली आहेत. त्यात सुवासही आहे आणि विविधताही आहे.

गुरुजींच्या कार्याचे आणि व्यक्तित्वाचे मूल्यांकन करताना प्रबुद्ध भारताने पुढे लिहिले की, ‘त्यांचे जीवन हा एक उघडा ग्रंथ आहे. तो कोणीही वाचू शकतो. गुरुजींच्या रूपाने आपण सर्व असे एक जीवन बघतो आहोत जे जीवन निष्कलंक, निस्वार्थी आणि निर्भय आहे. ते स्वतःसाठी जगले नाहीत तर संपूर्णपणे सर्वांसाठी जगले. जगात किती लोकांच्या बाबतीत असे म्हणता येईल?’

दैनिक स्वतंत्र भारत, राष्ट्रधर्म मासिक, दैनिक आज आणि अन्यही अनेक दैनिकांनी, साप्ताहिकांनी आणि मासिकांनीही त्यांच्यावर विशेष लेख लिहिले होते.

__________________________________________________________________________________

5

त्रिवेंद्रमच्या दैनिक मातृभूमीने लिहिले होते – केवळ घोषणाबाजीपेक्षा कितीतरी उच्च पातळीवरून युवकांना विस्तृत अशा उच्चसेवेच्या ध्येयासाठी प्रेरित केले जाऊ शकते याचा साक्षात पुरावा म्हणजे श्री. गुरुजींचे कार्य होय. ज्यांना त्यांचे विचार पटत नाहीत आणि जे त्यांच्यावर टीका करतात त्यांनाही गुरुजींच्या जीवनाची शुद्धता, समर्पण भाव, कळकळ आणि प्रामाणिकपणा यांच्यासमोर नतमस्तक व्हावे लागते.

दैनिक एक्सप्रेसने लिहिले होते – सर्वसंगपरित्याग हीच सिद्धी आणि विनम्रता हेच उत्थान या ध्येयावर अविचल निष्ठा असणारी एक परंपरा आपल्या या देशात विद्यमान आहे. या ऋषी परंपरेचा हाही दृढ संकल्प आहे की, राज्यसत्ता प्राप्त करण्याऐवजी समाजशक्ती संघटित करून देशाला पुढे नेले पाहिजे. आजच्या या आधुनिक युगातही ही परंपरा अबाधित गतीने चालू आहे हे राजा राममोहन राय, श्री रामकृष्ण देव, स्वामी विवेकानंद, गांधीजी आणि श्री गोळवलकर यांच्या जीवनातून स्पष्टपणे सिद्ध होते.

त्रिवेंद्रमचे दैनिक मनोरमा, कालिकतचे साप्ताहिक केसरी यांनीही गुरुजींवर श्रद्धांजलीपर लेख लिहिले होते.

पाटण्याच्या दैनिक आर्यावर्तने लिहिले होते – श्री. गोळवलकर यांच्या ठिकाणी धैर्य, साहस आणि मानसिक संतुलन अपूर्व असे होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर त्यांच्या जीवनकाळात कित्येक संकटे आली पण ते कधी डगमगले नाहीत की त्यांचा मानसिक तोल कधी सुटला नाही. देशातील मोठ्यात मोठ्या नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध निंद्य शब्द उच्चारले परंतु गुरुजींनी परोक्ष किंवा अपरोक्ष कुणाच्या निंदेने आपली वाणी विटाळली नाही.

रांचीच्या साप्ताहिक रांची एक्सप्रेसने लिहिले होते – आपले सर्वस्व राष्ट्र आणि समाज यांच्यासाठी समर्पित करून आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण ज्यांनी राष्ट्रसेवेसाठीच खर्च केला अशी आपल्या देशातील महापुरुषांची जी परंपरा आहे त्या परंपरेतील श्री. गोळवलकर हे एक महापुरुष होते. आधुनिक काळात महात्मा गांधी यांच्यानंतर श्री. गोळवलकर हेच एक असे पुरुष होते की, ज्यांच्या व्यक्तीत्वाने आणि कृतींनी लाखो लोकांना प्रभावित केले.

पाटण्याचा साप्ताहिक नेपाळ संदेश, प्रदीप, दैनिक सर्चलाईट यांनीही गुरुजींवर श्रद्धांजलीपर लेख लिहिले होते.

मद्रासच्या दैनिक दिनमणीने लिहिले होते – श्री. गुरुजींनी संघाचे प्रमुख या नात्याने जी सेवा केली ती अद्वितीयच आहे. ईश्वरभक्ती, राष्ट्रभक्ती, त्यागभावना, अनुशासन, दुःखीतांचे दुःख दूर करणे; तसेच समाजाचे जागृत प्रहरी म्हणून कर्तव्यदक्ष राहणे हे सारे भाव जागृत करण्यासाठी त्यांनी जे कार्य केले ते अतुलनीय आहे. महात्मा गांधींप्रमाणेच त्यांनी तरुणांना प्रेरित केले आहे. त्यांच्यासारखा नेता आढळणे कठीण आहे.

साप्ताहिक कलकंडूने म्हटले होते – श्री. गुरुजी हे दुसरे गांधीच होते. त्यांनी आपल्या अनुयायांना उत्तेजित अशा परिस्थितीतही कधी क्षुब्ध होऊ दिले नाही. हिंसेवर त्यांचा विश्वास नव्हता.

कोलकाताच्या दैनिक सन्मार्ग, मासिक hindu regeneration, साप्ताहिक स्वस्तिक यांनीही गुरुजींना श्रद्धांजली अर्पण केली होती. सन्मार्गने लिहिले होते – ओजस्वी वक्ते आणि तेजस्वी नेते या रुपात सदैव त्यांचे स्मरण केले जाईल. त्यांचा उपदेश आणि कार्य सदैव प्रेरणास्रोत बनून राहील. त्यांची वाणी अमर आहे. त्यांच्या मृत्यूने भारत एका महान नेत्याला, एका उपदेशकाला आणि एका पथप्रदर्शकाला गमावून बसला आहे. हिंदू धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी त्यांच्या सेवेची खूप आवश्यकता होती.

Hindu regeneration ने लिहिले होते – आमच्या संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले नाही तर आपले स्वातंत्र्य निरर्थक ठरेल. श्री. गुरुजींच्या निधनामुळे हिंदुत्व प्रतिपादनाच्या क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. परंतु संघात कुशल कार्यकर्त्यांची एक पिढीची पिढी त्यांनी निर्माण करून ठेवली आहे. ही आशादायी बाब आहे.

साप्ताहिक स्वस्तिकने श्रद्धांजली वाहताना लिहिले होते – श्री. गुरुजी दधिची होते. त्यांनी देशासाठी आपले जीवन समर्पण केले. सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी स्वतःला दिव्याप्रमाणे पेटवून घेतले. अत्यंत कठीण परिस्थितीचा त्यांना सामना करावा लागला. परंतु पराभव स्वीकारण्यासाठी त्यांनी जन्म घेतला नव्हता. म्हणूनच अन्य लोकांना प्रभावित करून ते इतक्या झपाट्याने आपल्या उद्दिष्टाप्रत पोहोचले.

ओरिसातील कटकच्या दैनिक समाजने लिहिले होते – भारताचे अतीव गौरवपूर्ण चित्र आपल्या नजरेपुढे ठेवून, चालू काळात जी दुर्दशा झाली आहे त्याच्या वर उठून, पुन्हा भारताला गौरवपूर्ण स्थान मिळवून देणे हे त्यांचे ध्येय होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणेच ते उच्च प्रतीचे देशभक्त आणि कुशल संघटक होते. त्यांच्या ठिकाणी अभूतपूर्व संघटन शक्ती होती.

आसामची राजधानी गोहाटी येथील साप्ताहिक आलोकने लिहिले होते – भारतवर्ष हा ऋषींचा देश आहे. अंतर्बाह्य ऋषी कसा असतो याचा परिचय श्री. गुरुजींनी स्वतःच्या जीवनातून देशवासीयांना घडवला. आत्मविस्मृत हिंदूंना जागवण्यासाठी त्यांनी जनजागरणाची जी अखंड धारा प्रवाहित केली ती भारतात चिरकाल प्रवाहित होत राहील. ईश्वरप्रेरित श्री. गुरुजींनी सांसारिक मायाजालात न फसता; तसेच धन, मान, यश आदींचा त्याग करून भारतीय सभ्यता आणि संस्कृती यांचा श्रेष्ठ आदर्श आपल्या जीवनात प्रत्यक्ष उतरविला. आज गुरुजी आपल्यात नाहीत परंतु हिंदू समाज जोवर जीवंत राहील तोवर; दलीत, पतीत, आत्मविस्मृत हिंदूंचे पथप्रदर्शक या रुपात त्यांचे सदैव श्रद्धापूर्वक स्मरण होत राहील.

आंध्र प्रदेशातील साप्ताहिक अजंठा, दैनिक आंध्रप्रभा, दैनिक आंध्र पत्रिका, the deccan chronicle, दैनिक मिलाप, साप्ताहिक जागृती इत्यादी नियतकालिकांनी गुरुजींच्या व्यक्तित्वावर प्रकाश टाकला होता.

दैनिक आंध्रप्रभाने लिहिले होते – आपले ध्येय आणि आदर्श यांच्या प्राप्तीसाठी श्री. गोळवलकर यांनी जे प्रयत्न केले ते खरोखरी विचारार्थ आहेत. त्यांची ध्येयसमर्पण वृत्ती अनुकरणीय आहे. त्यांनी भारतीयांना ज्या प्रकारे संघटित केले आहे त्यापासून अन्य राजकीय नेत्यांनी बोध घ्यावयास हवा. विशिष्ट ध्येयासाठी लाखो युवकांना आत्मसर्पित करवून घेणे हे कार्य सोपे नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील तरुण वर्गाने अप्रतिम अशा त्यागासाठी उड्या घेतल्या होत्या त्याच प्रकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी खूप मोठ्या संख्येत युवकांना संघाकडे आकर्षित केले. श्री गोळवलकर यांच्याप्रमाणेच अन्य लोकांनीही देशाच्या तरुणांना आणि त्यांच्या अमर्याद सामर्थ्याला रचनात्मक कार्यासाठी संघटित केले असते तर देशाचे चित्र आज काही वेगळेच दिसले असते.

दैनिक आंध्र पत्रिकेने लिहिले होते की – जे लोक गुरुजींच्या राजकीय सिद्धांताशी सहमत नाहीत तेदेखील त्यांच्या देशभक्तीविषयी शंका घेऊ शकत नाहीत. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पोकळी निर्माण झाली आहे.

हैदराबादच्या डेक्कन क्रोनिकलने लिहिले होते – श्री. गोळवलकर यांच्या रूपाने अनेक आदर्श एकाच स्थानी अभिव्यक्त झालेले आहेत. त्यांच्यात हिंदुत्व श्रेष्ठतम प्रकारे व्यक्त झाले होते. स्वामी विवेकानंदांप्रमाणेच ते भारताच्या आत्म्याचे प्रतीक होते.

हैदराबादच्या दैनिक मिलापने गुरुजींच्या एका वेगळ्या पैलूवर भाष्य केले होते. मिलापने म्हटले होते की – श्री. गोळवलकर यांच्याशी भेटण्याचा कित्येकदा योग आला. त्यांच्या व्यक्तीत्वात आकर्षण आणि वाणीत मोहिनीशक्ती होती. हिंदीत अस्खलित बोलत असत. ज्या लोकांना असे वाटत असे की प्रभावी भाषण फक्त उर्दूतच केले जाऊ शकते त्यांना श्री. गोळवलकरांचे भाषण ऐकल्यावर आपले मत बदलले भाग पडत असे.

कर्नाटकातही बंगलोर, हुबळी, हासन, मंगलूर, मणिपाल इत्यादी ठिकाणच्या नियतकालिकांनी श्री. गुरुजींना श्रद्धांजली अर्पण केली होती.

बंगलोर व हुबळी या दोन ठिकाणांहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक संयुक्त कर्नाटकने लिहिले होते की – आपल्या अनुयायांकडून निष्ठा, भक्ती आणि गौरव यांच्या दैवी संपत्तीची जोड ज्यांनी मिळवली आहे असे एक गांधीजी सोडले तर गोळवलकर यांच्यासारखे विरळा भाग्य इतर कोणाही राजकीय नेत्याच्या वाट्याला आले नाही असे म्हटले तर ती अत्युक्ती ठरू नये. राष्ट्र आणि हिंदू समाज यांच्या कल्याणाचीच ते सदैव चिंता करीत असत.

दैनिक प्रजावाणीने लिहिले होते – गुरुजींनी प्रतिपादन केलेला हिंदू राष्ट्र हा शब्द जातीवाचक नव्हता तर देशवाचक होता. भारताला आपली मातृभूमी मानून त्याची संस्कृती व त्याची परंपरा याविषयी श्रद्धाभाव आणि गौरवाचा भाव बाळगणारे सर्व भारतीय हिंदू आहेत ही त्यांची धारणा होती. भाषावार प्रांतरचनेला प्रारंभापासूनच त्यांचा विरोध होता आणि ते सांगत असत की; भाषा, राज्य, प्रदेश, संप्रदाय आदी नावांनी चालणारी सर्व आंदोलने शेवटी राष्ट्राचे ऐक्य दुबळे बनवतात.

गुरुजींचा आत्मविश्वास आणि त्यांची दूरदृष्टी हा राष्ट्राचा प्रकाशस्तंभ होता या शब्दात हासन येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक जनमित्रने श्री. गुरुजींना श्रद्धांजली अर्पण केली होती.

मणिपाल येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक उदयवाणीने लिहिले होते – राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यासाठी आपले सारे जीवन समर्पण करून, त्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या त्यागाला सदैव तयार असणारी पिढी निर्माण करून, ईश्वराबरोबरच ईश्वर झालेले माधव सदाशिव गोळवलकर ही अनेक शतकातून एखाद्याच वेळी प्रकाशित होणारी दिव्य चेतना होय. अशा महापुरुषांमुळे राष्ट्रजीवन धन्य होते. इतिहास चमकून उठतो.

सरसंघचालक श्री. गुरुजी भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला चिरकालपर्यंत स्फूर्ती, प्रेरणा व मार्गदर्शन करणारे तत्त्वज्ञानी होते. प्रत्येक प्रसंगी कसे वागावे हे सांगणारा व्यवहारकोश बनून चिरंजीव झालेली आपल्या काळातील महान व्यक्ती, देवमानव आणि युगपुरुष ते होते; या शब्दात बंगलोरच्या साप्ताहिक विक्रमने श्री. गुरुजींच्या व्यक्तित्वाचा गौरव केला होता.

अहमदाबादच्या दैनिक जनसत्ताने लिहिले होते – पंडित मालवीय आणि स्वामी विवेकानंद यांनी भारतीयत्वाच्या संबंधात ज्या प्रकारे देशाला उपदेश केला होता, अगदी त्याच धर्तीवर ती परंपरा चालू ठेवणारे आणि स्वदेशी व भारतीयत्व यांच्या संबंधात देशाच्या विद्यमान नेत्यात ते एकटे एक ज्योतीपुरुष होते.

ज्या शालीनतेने आणि विनम्रपणे गुरुजी आपल्या टीकाकारांना उत्तरे देत असत त्यामुळे ऐकणाऱ्यांवर त्यांच्या प्रतिभेची छाप पडल्याशिवाय राहत नसे. श्री. गुरुजी एक प्रभावी व्यक्तित्व असलेले कर्मयोगी ऋषी होते अशा शब्दात जयपूरच्या नवज्योतीने गुरुजींना श्रद्धांजली वाहिली होती.

चंदीगडच्या द ट्रिब्यून या नियतकालिकाने लिहिले होते – व्यक्तित्व हे जर माणसाला फुलाच्या सुगंधाप्रमाणे असेल तर स्वर्गीय श्री गोळवलकर यांचे व्यक्तित्व निश्चितच असामान्य होते. दिसण्यात कृष आणि अत्यंत साधे होते. परंतु ऋषितुल्य वाटत असत. त्यांची विस्तीर्ण दाढी त्यांच्या ऋषीतुल्य आदर्शाचाच परिचय घडवीत असे. वृत्तपत्रे, रेडिओ, वार्तापट वगैरे कोणत्याही साधनांची त्यांना स्वतःची प्रतिमा चित्रित करण्यासाठी गरज वाटली नाही. स्वतःचा डांगोरा पिटण्याचीही त्यांना कधी गरज भासली नाही. मोठेपणा त्यांना स्वतःहूनच मिळालेला होता.

दिल्लीच्या दैनिक इंडियन एक्सप्रेसने लिहिले होते की – श्री. गोळवलकर अत्यंत परिश्रमी होते. देशाचा कोपरान कोपरा त्यांना माहीत होता. ते भारतीय इतिहासाचे गाढे अभ्यासक होते आणि देशाची उत्तर आणि पश्चिम सीमा यांच्या सुरक्षिततेविषयी ते नेहमी चिंतीत राहत असत. भारताच्या फाळणीची कल्पना ज्यांनी कधीच मान्य केली नाही अशा मोजक्या व्यक्तीत ते प्रमुख होते. भारतातील मुसलमानांनी भारतातील मुख्य जीवनधारेशी एकरूप व्हावे असे त्यांना वाटत असे.

दिल्लीच्या दैनिक हिंदुस्थानने लिहिले होते – निराशा, अडचणी आणि नाईलाज यांची परिस्थिती उद्भवली असतानाही त्यांच्या कार्याची गती कधी मंद झाली नाही आणि त्यांचे स्नायू कधी हतोत्साहाने पंगू बनले नाहीत. याउलट ते उत्तरोत्तर वैयक्तिक उत्कर्ष आणि लोककल्याणाचे नित्य नवे वैभव साध्य करीत गेले. साधना आणि सिद्धी यात त्यांनी साधनेवरच भर दिला होता. कारण साधना हीच ध्रुवशक्ती आहे आणि साधनेच्या साच्यातून गेल्यावर सिद्धी अनेक अंगांनी आणि अनेक मुखांनी प्रकट होते अशी त्यांची धारणा होती.

दिल्लीच्या नवभारत टाइम्सने श्री. गुरुजींचा गौरव करताना लिहिले होते – गेल्या दोनशे वर्षात सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या देशात अशा व्यक्तींचा उदय झाला आहे की, ज्यांचे मोठेपण आकळण्यासाठी विराट या शब्दाचाच उपयोग करावा लागतो. गुरु गोळवलकर त्याच विराट व्यक्तींमधील एक होते.

दिल्लीच्या साप्ताहिक दिनमानने एका वेगळ्या विषयाची दखल घेत लिहिले होते – हिंदू समाजातील निरनिराळ्या पंथांच्या आचार्यांनी एकत्र येऊन एक समरस समाज निर्माण करण्यासाठी सर्वसंमतीने मार्ग निश्चित करावा यासाठी श्री. गुरुजींनी आपल्या जीवनात प्रयत्न केला आणि याच संबंधात त्यांनी चारही पीठांच्या शंकराचार्यांना एका व्यासपीठावर एकत्र आणले होते.

___________________________________________________________________________________

6

सामाजिक, राजकीय जीवनातील लोक आणि नियतकालिकांमधून गुरुजींना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच; संघाच्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली. या कार्यकर्त्यांच्या श्रद्धांजलीपर भाषणातून आणि लेखातून देखील गुरुजींच्या व्यक्तित्वाचे अनेक पैलू समोर येतात.

गुरुजींच्या नंतर संघाचे तिसरे सरसंघचालक झालेले श्री. बाळासाहेब देवरस यांनी गुरुजींच्या निधनानंतर तेराव्या दिवशी आणि मासिक श्राद्धदिनाला त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. तसेच नागपूरच्या भारतीय विचार साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘श्री गुरुजी : समग्र दर्शन’ या सात खंडांच्या ग्रंथातील सातव्या खंडाला लिहिलेल्या प्रस्तावनेतही गुरुजींच्या जीवनावर आणि कार्यावर भाष्य केले होते.

गुरुजींच्या निधनानंतर तेराव्या दिवशी केलेल्या श्रद्धांजलीपर भाषणात गुरुजींच्या व्यक्तित्वाच्या निरनिराळ्या पैलूंची चर्चा करताना श्री. बाळासाहेब देवरस म्हणाले होते की – ‘डॉक्टर हेडगेवार हयात होते तेव्हापासूनच माझा गुरुजींशी संबंध आला होता. सिंदी येथील एक प्रदीर्घ बैठक आणि १९४० सालचा संघ शिक्षा वर्ग या काळात गुरुजींशी घनिष्ठ संबंध आला. १९३८ पासून संघाच्या कामाविषयी चिंतित असणारे डॉ. हेडगेवार गुरुजी संघाच्या कामात सक्रिय झाल्यानंतर जरा निश्चिंत झाले होते. इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांत ओघवते विचार मांडण्याची क्षमता असणारी एक व्यक्ती मला आढळली आहे, असे ते गुरुजींबद्दल आमच्याजवळ म्हणत असत. आम्ही पहिल्यांदा गुरुजींचे इंग्रजीतील भाषण ऐकले तेव्हा आम्ही स्तंभित होऊन गेलो होतो. सरसंघचालक झाल्यावर गुरुजींचा स्वभाव बदलून गेला होता. पूर्वीचा तापटपणा त्यांनी टाकून दिला. फाळणीच्या काळात त्यांच्यासोबत प्रवास करण्याची संधी मला लाभली. त्यांच्या सभांना लाखो लोक येत. श्रद्धेने नतमस्तक होत. अन्य कोणी असता तर अहंकाराने फुलून गेला असता पण गुरुजी अतिशय संतुलित असत. गुरुजी वर्षाला दीड ते दोन हजार पत्रे लिहीत असत. हे पत्रलेखन तब्बल ३३ वर्षे चालले. हा एक विश्वविक्रमच ठरावा. अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीतही त्यांचा व्यवहार सारखाच राहत असे. त्यांच्या व्यक्तित्वाचा प्रत्येक पैलू आश्चर्यजनक होता. गुरुजी मल्लखांबचे चॅम्पियन आणि उत्तम संगीतज्ञ होते. त्यांच्या आदर्शामुळे संघकार्याचे एक विशेष वातावरण देशभरात निर्माण झाले. आज संघासंबंधी जे जे काही विलोभनीय आणि प्रशंसनीय दिसते त्याचे सर्व श्रेय गुरुजींना आहे.’

गुरुजींच्या कार्याचे मूल्यमापन कसे करायला हवे याची चर्चा करताना श्री गुरुजी समग्रच्या सातव्या खंडाच्या प्रस्तावनेत, अब्राहम लिंकनच्या एका चरित्राला लिहिलेल्या प्रस्तावनेचा उल्लेख करून बाळासाहेब लिहितात – ‘श्री. गुरुजींनी संघाच्या कामासाठी आवश्यक असलेले कार्यकर्ते आपल्या परिश्रमांनी व व्यक्तिगत संबंधातून उभे केले आणि त्यांना सतत कार्यक्षम ठेवले. प्रतिकूल परिस्थितीत हळूहळू परंतु योग्य दिशेने, समाजात वैचारिक बदल घडवून आणण्यासाठी त्यांना आयुष्यभर प्रयत्न करावा लागला. त्यामुळे त्यांनी समोर ठेवलेले संघटित राष्ट्रजीवनाचे लक्ष्य कितपत साध्य झाले यापेक्षा, त्या दिशेने आपला समाज किती पुढे गेला व त्यांनी केलेले मार्गदर्शन समाजाच्या सर्व थरात किती खोलवर रुजले; असाच विचार श्री. गुरुजींच्या बाबतीत करणे उचित ठरेल असे मला वाटते.’

डॉ. हेडगेवार यांच्या काळापासून संघाचे कार्यकर्ते राहिलेले प्रचारक आणि संघाच्या केंद्रीय कार्यालयाचे आधारस्तंभ राहिलेले श्री. कृष्णराव मोहरील यांनी युगधर्म या हिंदी दैनिकाच्या जुलै १९७३ मधील स्मृती अंकात लिहिलेल्या लेखात एक आठवण नमूद केली आहे. १९३२ च्या नागपूरच्या विजयादशमी उत्सवात डॉ. हेडगेवार यांनी श्री. गुरुजी व श्री. सद्गोपाल यांना पत्र पाठवून निमंत्रित केले होते. शारीरिक प्रात्यक्षिके झाल्यानंतर केलेल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी या दोघांचा परिचय करून दिला आणि अन्य प्रांतात संघाचा प्रचार करणाऱ्या या दोघांना डॉ. हेडगेवार यांनी पुष्पहार घातले होते. संघाच्या कार्यपद्धतीत न बसणारी ही गोष्ट डॉ. हेडगेवार यांनी गुरुजींसाठी केली होती. तेव्हापासूनच संघ संस्थापक गुरुजींकडे कोणत्या दृष्टीने पाहत असत ते दिसून येते.’

श्री. गुरुजींच्या काळात संघाचे केंद्रीय कार्यालय प्रमुख राहिलेले पांडुरंगपंत क्षीरसागर यांनी पुणे तरुण भारतच्या गुरुजी विशेषांकात एक लेख लिहून गुरुजींच्या आठवणींना उजाळा दिला होता. १९५१-१९५२ ची एक घटना त्यात नमूद आहे. ग्वाल्हेरचे एक वयोवृद्ध शास्त्रीय गायक राजाभैय्या पुंछवाले नागपूर विद्यापीठात संगीताची परीक्षा घ्यायला आले होते. ते नागपूर कार्यालयात गुरुजींना भेटायला आले आणि त्यांनी गुरुजींना गाणं ऐकवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचं वय त्यावेळी ७५ वर्षे होतं. व्यवस्था कशी करता येईल, ते गुरुजींच्या निवासापर्यंत जाऊ शकतील का, जिना चढू शकतील का; अशी आमची चर्चा सुरू होती. तेव्हा गुरुजी स्वतःच म्हणाले की, त्यांच्या गाण्याची व्यवस्था करा. त्यानुसार व्यवस्था करण्यात आली आणि गुरुजींचे वडील भाऊजी गोळवलकर, भाऊजी काळीकर, कार्यकर्ते आणि गुरुजी; अशा २०-२५ लोकांसमोर राजाभैय्यांचे गाणे झाले. गायक, कलाकार, लेखक, कवी यांच्याबाबत गुरुजी असे गुणग्राहक होते.

विविध उपासना पंथांच्या लोकांशी गुरुजींचे मधुर संबंध होते त्याविषयी पांडुरंगपंत लिहितात – ‘श्री. गुरुजींचे अन्यधर्मीय मित्रही होते. नागपूरचे वकील शमशाद अली त्यातील एक. गुरुजींना भेटायला ते संघाच्या कार्यालयात आले तेव्हा त्यांना डोळ्यांचा त्रास होत होता. गुरुजींनी सीतापूर येथे त्यांच्या उपचाराची व्यवस्था करून दिली. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले पारशी गृहस्थ श्री. जाल पी. गिमी तर विजयादशमीला गुरुजींना सोने द्यायला येत असत. याशिवाय श्री. डी. पी. आर. कासद, श्री. बैरामजी या लोकांशीही त्यांचे स्नेहमय संबंध होते.’

संघाचे केंद्रीय कार्यालय नागपूरच्या ज्या महाल भागात आहे त्या भागात नारायण चापके नावाचे एक गृहस्थ चांभार काम करीत असत. दिवसभर वस्त्यांमध्ये फिरून चपला, जोडे दुरुस्ती ते करून देत. दुपारच्या वेळी कार्यालयातल्या शमीवृक्षाच्या सावलीत ते येऊन बसत. जेव्हा जेव्हा भेट होई तेव्हा गुरुजी त्यांची विचारपूस केल्याशिवाय राहत नसत. गुरुजींचे अंत्यदर्शन घ्यायला ते आले तेव्हा त्यांचे डोळे डबडबले होते, अशी आठवणही श्री. क्षीरसागर यांनी सांगितली आहे.

श्री. क्षीरसागर यांच्या लेखात आणखीन एक आठवण आहे. कार्यालयात मंगलप्रसाद नावाचे एक हिंदी आचारी होते. त्यांच्याशीही गुरुजींचे आत्मीय संबंध होते. मंगलप्रसाद यांच्या भावाचे निधन झाले त्यावेळी गुरुजींनी त्यांना सांत्वनपर पत्र लिहिले होते. त्याची सुरुवात होती – ‘परममित्र पंडित मंगलप्रसाद मिश्र, सप्रेम नमस्ते…’

डॉ. हेडगेवार यांचे निकटचे सहकारी राहिलेले, प्रांतिक काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी राहिलेले, संघाचे प्रांत संघचालक राहिलेले वर्ध्याचे आप्पाजी जोशी गुरुजींबाबत लिहितात – ‘१९३९ च्या फेब्रुवारी महिन्यात सिंदी येथे आठ दिवसांची एक ऐतिहासिक बैठक झाली होती. त्या बैठकीत एक दिवस एका मुद्यावर मी आणि गुरुजी यांच्यात जोरदार वाद झाला. कोणीच माघार घ्यायला तयार नव्हते. शेवटी डॉ. हेडगेवार यांच्यावर निर्णय सोपवला गेला. त्यांनी माझ्या बाजूने निर्णय दिला. गुरुजींच्या चेहऱ्यावर त्याची किंचितशी छायादेखील दिसली नाही. आधीप्रमाणेच ते नंतरच्या सगळ्या कामकाजात सहभागी झाले. मला राजकीय लोकांच्या मनोवृत्तीचा परिचय होता पण मनावर नियंत्रण मिळवण्याच्या गुरुजींच्या असाधारण क्षमतेने मी प्रभावित झालो. नंतर पाय मोकळे करताना डॉ. हेडगेवार यांनी मला अचानक प्रश्न केला – आप्पाजी, भावी सरसंघचालक म्हणून गुरुजी तुम्हाला कसे वाटतात? त्यावर मी त्यांना लगेच उत्तर दिले – खूपच योग्य. ज्याने आपले मन जिंकले आहे तो जगही जिंकेल.’

श्री. गुरुजींच्या श्रेष्ठ आध्यात्मिकतेचा एक प्रसंगही श्री. आप्पाजी जोशी यांनी सांगितला आहे. गांधीजींच्या हत्येनंतर दोघेही नागपूर कारागृहात एकाच कोठडीत होते. अन्य काही काम नसल्याने गुरुजी ध्यानधारणेत जास्तीत जास्त वेळ घालवत असत. त्यासाठी गजांना कपडे बांधून थोडासा एकांत तयार केला होता. गजाला बांधलेले कपडे एक दिवस वाऱ्याने उडत असताना आप्पाजींना गुरुजींची ध्यानमग्न अवस्था पाहायला मिळाली. त्याचे वर्णन करून आप्पाजी म्हणतात – त्यावेळी ते दैवी साक्षात्काराच्या स्थितीत होते याची मला खात्री वाटते.

बिहार क्षेत्राचे संघचालक राहिलेले श्री. बबुआजी यांनीही श्री. गुरुजींवर लिहिलेले आहे. इ. स. १९३९ मध्ये त्यांचा गुरुजींशी परिचय झाला. ते लिहितात – ‘मोठमोठ्या कार्यक्रमात सहभागी होणारे, भाषणे देणारे, बैठकींमधून मोकळेपणाने बोलणारे गुरुजी नित्याच्या व्यवहारात संकोची होते. १९४२ चा प्रसंग. वीर सावरकर माझ्या घरी मुक्कामाला होते. त्याच मजल्यावर गुरुजीही मुक्कामाला होते. सावरकरांना सकाळच्या मेलने जायचे होते. त्याआधी गुरुजींना त्यांना नमस्कार करायचा होता. सावरकरांच्या खोलीतला दिवा सुरू होता. ते प्रवासाला निघण्याची तयारी करत होते. परंतु गुरुजी त्यांच्या खोलीत गेले नाहीत. सावरकर खोलीबाहेर येईपर्यंत गुरुजी त्यांच्या खोलीबाहेर उभे होते.’

गुरुजींचं मुक्त हसणं सगळ्यांना परिचयाचं आहे. बबुआजीही तसेच मोकळे हसत असत. त्याची एक आठवण त्यांनी सांगितली आहे. ते लिहितात – ‘१९४१ साली हिंदू महासभेच्या अखिल भारतीय अधिवेशनावर बिहार सरकारने बंदी घातली होती. बंदी धुडकावून अधिवेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशभरातील कार्यकर्ते अटक करवून घेत होते. सावरकरांचे भाषण वाचल्याबद्दल मलाही अटक करण्यात आली. गुरुजी मला भेटायला कारागृहात आले. मला पाहताच मोठ्याने हसून म्हणाले, let me have your laugh.’

‘अनावश्यक खर्च त्यांना मान्य नव्हता. रेशिमबागेतील एका प्रतिनिधी सभेची गोष्ट. एक दिवस पहाटे पाच वाजता पाहिले, व्हरांड्यात सुरू असलेले लहान लहान दिवे श्री. गुरुजी स्वतः बंद करत होते. त्यांची राहणी अतिशय साधी होती. जेवणात जे असेल ते जेवत. विशेष कशाचीही त्यांनी कधीही मागणी केली नाही. नागपूरला त्यांच्या बैठकीत सतरंजीशिवाय एखादी गादी कधी पाहायला मिळाली नाही. सुरुवातीला तर त्यांना सायकल चालवताना पाहिले आहे. साधूचे वस्त्र न घालणारे ते खरे साधू होते. म्हणूनच त्यांचा प्रभाव पडत असे.’

गुरुजींशी ३४ वर्ष जवळचे संबंध राहिलेले आणि नागपूर संघचालक राहिलेले श्री. बाबासाहेब घटाटे यांनीही दैनिक युगधर्मच्या गुरुजी विशेषांकात आठवणींचा पेटारा उघडला आहे. डॉ. हेडगेवार आजारी होते आणि देवळाली येथे विश्रांती घेत होते. त्याच दिवसात श्री. घटाटे यांच्याकडे मुलाची मौंज होती. डॉक्टर कसे येऊ शकतील ही त्यांना चिंता होती. त्यावेळी गुरुजींनी देवळाली येथे तार केली. त्याला उत्तर आले की, जबलपूरहून मोटारीची व्यवस्था झाल्यास डॉक्टर वेळेवर येऊ शकतील. हे कळताच गुरुजी स्वतः कारने जबलपूरला गेले आणि हेडगेवार यांना नागपूरला घेऊन आले होते.

कारागृहात एकत्र घालवलेल्या क्षणांच्या आठवणीही श्री. घटाटे यांनी नमूद केल्या आहेत. एक दिवस आंघोळ झाल्यानंतर, पूजा करू आणि मग कपडे धुवू असे म्हणून बाबासाहेबांनी कपडे ठेवून दिले. पूजेनंतर पाहतात तर गुरुजींनी त्यांचे कपडे धुवून वाळत घातले होते. बाबासाहेबांनी केलेल्या विरोधाकडे त्यांनी लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशीपासून बाबासाहेब कपडे धुवून मग पूजा करत असत.

इ. स. १९७२ च्या डिसेंबर महिन्यात डॉ. मुंजे जन्मशताब्दी निमित्त जनरल करिआप्पा नागपूरला आले होते. दुपारचे जेवण बाबासाहेब घटाटे यांच्या बंगल्यावर होते. जेवणात जिलबीचा बेत होता. करिआप्पा यांना जिलबी फार आवडली. जिलबी कशी करतात हेही त्यांनी विचारले. तेव्हा गुरुजी त्यांना स्वयंपाकघरात घेऊन गेले आणि जिलबी कशी करतात हे त्यांनी स्वतः जनरलना सांगितले, अशी आठवण बाबासाहेब घटाटे यांनी नोंदवली आहे.

___________________________________________________________________________________

7

संघाच्या अनेक अखिल भारतीय जबाबदाऱ्या सांभाळलेले; तसेच विश्व हिंदू परिषद, इतिहास संकलन संस्था, संस्कृत भारती, सरस्वती शोध, रामजन्मभूमी आंदोलन; इत्यादी कार्यांमुळे सगळ्यांना परिचित असलेले श्री. मोरोपंत पिंगळे यांनी दैनिक तरुण भारतच्या १९७३ च्या जुलै महिन्यातील श्री. गुरुजी स्मृती विशेषांकात श्रद्धांजलीपर लेख लिहिला होता. त्यात ते म्हणतात – ‘गुरुजींनी आपल्या जीवनात इतकी कामे केली की त्यांची मोजदाद शक्य नाही. त्यांच्या कार्याचा प्रभाव इतका मोठा आहे की; त्याचा भविष्यावर काय परिणाम होईल, कार्याचं फळ किती मोठं असेल याचा अंदाज इतिहासाचे मोठाले अभ्यासक सुद्धा लावू शकणार नाहीत. कार्याची मोजदाद कठीण आणि कार्याची महानता सांगणेही कठीण. त्यांनी केलेल्या अनेक कार्यांपैकी एखादे कार्य केले तरीही त्या त्या व्यक्तीचे जीवन धन्य होऊन जाईल.’

मोरोपंत पुढे लिहितात – ‘आपल्यानंतर आपली कीर्तिध्वजा फडकत राहावी अशी आकांक्षा अनेक कर्तृत्ववान लोकांमध्ये असते. त्यांच्या कर्तृत्वाला साजेशी अशीच त्यांची आकांक्षा असते. परंतु स्वतःचे श्राद्ध स्वतःच्या हातांनी करणारे हे केशधारी संन्यासी, निरहंकारितेच्या अशा उत्तुंग हिमशिखरावर अशा लीनतेने उभे होते की, आजूबाजूला घोंगावणाऱ्या अहंकार समुद्राच्या लाटांच्या कल्लोळातील एखादा थेंबही त्यांच्या चरणांजवळ तर दूरच, पण ते उभे असलेल्या पर्वतालाही स्पर्श करू शकला नाही. निबीड अंधारात आणि धडकी भरवणाऱ्या वादळातही ही ज्योत अखंड जळत राहिली आणि अशी शांत झाली की मागे राखही उरली नाही. जणू कापराची ज्योत. यज्ञ असा केला की, समिधांच्या ज्वालांचा दाह कोणाला झाला नाही. समिधांच्या आहुतीचा आवाज नाही की चरचर नाही.’

‘अहंकाराचा वारा लागू नये हे काही त्यांचं व्रत नव्हतं किंवा ती प्रयत्नपूर्वक केलेली कठोर तपश्चर्या नव्हती. तो तर त्यांचा सहज स्वभाव होता. त्यात कोणताही प्रयत्न नव्हता. ही निरहंकारिता स्वयंभू होती. अखंड होती. दांभिकतेला तिथे प्रवेशासाठी जागाच नव्हती.’

‘महापुरुषाचे घर ही त्याची आठवण असते. पुढील पिढ्यांसाठी ते जपलं जातं. परंतु आपल्या अशा स्मृती राहू नयेत ही त्यांची मनस्वी इच्छा होती आणि ती इच्छा आपोआप पूर्ण होत राहिली. श्री. गुरुजींचा जन्म कोणत्या घरात झाला ते कोणीही दाखवू शकणार नाही. कारण रस्ता रुंद करण्याच्या कामात ते कधीचेच नष्ट झाले आहे. एक यात्रिक बनून ते पुढे पुढे चालत राहिले आणि आपली आठवणही मागे राहू नये ही त्यांची कळकळीची भावना पूर्ण करण्यासाठी नियती त्यांच्या पाऊलखुणा पुसत त्यांच्या मागून चालत राहिली. वडिलांचा पैसाअडका, घर हेदेखील त्यांनी दान करून टाकले. वंशाच्या रुपात आठवण मागे राहते पण त्यांच्या बाबतीत ती शक्यताच नव्हती. एवढेच नाही तर आपल्यानंतर आपल्यावरील प्रेमापोटी स्वयंसेवक आपले स्मारक उभारतील हे ताडून, कधीही आज्ञा न देणाऱ्या त्यांनी तसे न करण्याची आज्ञा दिली. आपली आठवण मागे राहू नये या प्रयत्नात नियतीने त्यांची साथ दिली. परंतु लाखो स्वयंसेवकांच्या मनातील त्यांची स्मृती पुसून टाकणे नियतीलाही शक्य होणार नाही,’ अशा भावपूर्ण शब्दांत मोरोपंत पिंगळे यांनी या लेखाचा समारोप केला आहे.

दक्षिण भारतातील संघाचे काम ज्यांच्या परिश्रमाने रुजले, वाढले ते; संघाचे सहसरकार्यवाह राहिलेले यादवराव जोशी यांनी दैनिक युगधर्मच्या स्मृती विशेषांकात गुरुजींना श्रद्धांजली वाहिली आहे. १९३० च्या दशकात गुरुजींचा काशी विश्वविद्यालयात संघाशी संबंध आला. त्या प्रारंभिक दिवसातली एक आठवण यादवराव जोशी यांनी या लेखात सांगितली आहे. ते लिहितात – ‘काशी हिंदू विश्वविद्यालयात एकदा स्नेहसंमेलन होते. त्याची सगळी व्यवस्था गुरुजींकडे सोपवण्यात आली होती. व्यवस्था उत्तम होती. महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळी दारे होती. परंतु एक प्राध्यापक महिलांच्या दाराने आत जाऊ लागले. त्यांना त्यावेळी अडवण्यात आले. वेगळ्या दारांची व्यवस्था त्यांना समजावून सांगण्यात आली. स्वतः गुरुजींनीही त्यांना समजावले पण ते नाराज होऊन निघून गेले. ते हट्टी प्राध्यापक महामना मालवीय यांच्या जवळचे होते. ही घटना श्री. मालवीय यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी गुरुजींना बोलावले. गुरुजींनी त्यांना आपली भूमिका सांगितली आणि गुरुजी श्री. मालवीय यांना म्हणाले की, माझी काही चूक असेल तर मी माफी मागेन पण माझी काहीही चूक नसताना मी माफी मागणार नाही. डॉ. हेडगेवार यांना ही घटना कळल्यावर त्यांना खूप आनंद झाला होता आणि ही घटना ते अनेकदा स्वयंसेवकांच्या बैठकीत सांगत असत.’

१९४० च्या उन्हाळी संघ शिक्षा वर्गात श्री. गुरुजींचे भाषण झाले होते. शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंह याला लिहिलेले पत्र या विषयावर गुरुजी तीन तास बोलले होते आणि डॉ. हेडगेवार यांनी त्यांच्या या भाषणाची खूप प्रशंसा केली होती. आजारी असताना भेटायला येणाऱ्या लोकांजवळही ते या भाषणाबाबत बोलत असत, अशी आठवण श्री. यादवराव जोशी यांनी लिहिली आहे. नाशिकजवळ देवळाली येथे डॉ. हेडगेवार अस्वस्थ असताना गुरुजींनी त्यांची सेवा केली होती. त्याबद्दल यादवराव जोशी यांना सांगताना डॉ. हेडगेवार यांचे शब्द होते – ‘गुरुजी एखाद्या आईसारखी सेवा करतात.’

डॉ. हेडगेवार यांनी आपल्या मृत्यूच्या तीन दिवस आधी यादवराव जोशी यांना प्रश्न विचारला होता की, संघाच्या सर्वोच्च अधिकाऱ्याचा अंत्यसंस्कार कसा कराल? त्याच वेळी बोलताना ते श्री. जोशी यांना म्हणाले होते – ‘संघ काय आहे याची पूर्ण कल्पना गुरुजींना आहे. संघाबद्दल अनेक लोकांच्या अनेक कल्पना आहेत परंतु गुरुजींचा विचार परिपूर्ण आहे.’ डॉ. हेडगेवार यांच्यावर अग्निसंस्कार व अन्य क्रीयाकर्म गुरुजींनीच केले होते, अशी माहितीही यादवराव जोशी यांनी या श्रद्धांजलीपर लेखात दिली आहे.

संघाचे चौथे सरसंघचालक राहिलेले श्री. रज्जुभैय्या यांनीही गुरुजींच्या व्यक्तित्वाची ओळख करून देणारा लेख लिहिला आहे. श्री. प्रभुदत्त ब्रम्हचारी यांनी यात्रेकरूंसाठी बांधलेल्या धर्मशाळेच्या उद्घाटनासाठी गुरुजींना बद्रीनाथला बोलावले होते. त्या भेटीचा विस्तृत वृत्तान्त श्री. रज्जुभैय्या यांनी लेखात रेखाटला आहे. बद्रीनाथला जाण्यापूर्वी केदारनाथला जाण्याचा कार्यक्रम देखील ठरला. परंतु केदारनाथचा रस्ता त्यावेळी पूर्ण झालेला नव्हता. त्यामुळे पायी, घोड्यावर अथवा कावडीत बसून असे जावे लागणार होते. प्रकृतीला झेपणार नाही म्हणून पायी जाण्याचा पर्याय बाजूला सारण्यात आला. सवय नसलेल्यांना घोड्यावर बसणेही कष्टाचे असते. त्यामुळे गुरुजींनी कावडीत बसून जावे असा सगळ्यांनी विचार केला. परंतु गुरुजींनी त्याला स्पष्ट नकार दिला. माणसांच्या खांद्यावरून फक्त शेवटल्या यात्रेला जाईन असे उत्तर त्यांनी दिले. श्री. प्रभुदत्त ब्रम्हचारी यांनी आग्रह केल्यानंतर ते एवढंच म्हणाले – ‘तिथे पोहोचल्यावर पाहू.’ परंतु पहाड कोसळल्याने मार्ग बंद झाला आणि केदारनाथला जाण्याचा प्रसंगच आला नाही. बद्रीनाथला देखील दोन दिवस रूद्र प्रयागला थांबून मग जाता आले.

पहाडावर थंडी खूप असते त्यामुळे बुट, मोजे आणि सुती घट्ट पायजामे यांची व्यवस्था कार्यकर्त्यांनी केली होती. परंतु गुरुजींनी त्यातील कशाचाही उपयोग केला नाही. नेहमीप्रमाणेच साधे धोतर कुडता घालून ते बद्रीनाथला गेले. त्यांनी आहारदेखील नेहमीप्रमाणेच एकदा भोजन व चहा असाच घेतला. पहाडावर चढण्याचे कष्ट आणि थंडी यासाठी ऊर्जा टिकून राहावी म्हणून सोबत मुगाचे लाडू, सुका मेवा, मनुका वगैरे घेतले होते पण ते सगळे सोबतच्या लोकांनाच खावे लागले.

केदारनाथला जाता न आल्याने बद्रीनाथला पाच दिवस थांबता आले. त्या काळात त्यांनी ब्रम्हकपाल येथे आई वडील, पूर्वज यांच्यासाठी पिंडदान केले आणि स्वतःचे श्राद्धही केले. याच मुक्कामात भारताच्या सीमेवरील शेवटल्या माना गावीही ते जाऊन आले. बद्रीनाथमध्ये जेवढे पुरोहित होते त्या सगळ्यांशी गुरुजींनी एका बैठकीत संवाद साधला. दक्षिणा किती मिळते इत्यादी विचार न करता सगळे विधी शास्त्रसंमत रीतीने करावेत. त्यानेच हिंदू समाजाची श्रद्धा टिकून राहील असा विचार गुरुजींनी त्यावेळी त्यांच्यासमोर मांडला.

याच मुक्कामात श्री. प्रभुदत्त ब्रह्मचारी यांनी त्यांना भागवत कथाही ऐकवली. एक दिवस गुरुजी मला म्हणाले की, ‘इथून लवकर जायला हवे. नाही तर हिमालयाची शांती आणि भागवत कथा मला कायमचं इथेच ठेवून घेतील.’

नंतरच्या काळात संघाचे सरकार्यवाह राहिलेले श्री. हो. वे. शेषाद्री यांनी जान्हवी या कन्नड नियतकालिकात १९७३ च्या स्मृती अंकात ‘तो प्रकाश’ अशा शीर्षकाने एक भावपूर्ण लेख लिहून गुरुजींच्या व्यक्तित्वाचा वेध घेतला होता. ६ जून १९७३ रोजी सूर्यास्ताच्या नंतर गुरुजींना अग्नी देण्यात आला होता. त्याच्या प्रकाशाचे वर्णन करून लेखाच्या सुरुवातीला शेषाद्री यांनी एक प्रश्न केला होता – ‘तो कोणता प्रकाश होता?’ आणि पुढे संपूर्ण लेखात या प्रश्नाचं उत्तर देत देत हा कोणता प्रकाश होता हे विशद केलं होतं. हे उत्तर शोधत शोधत त्यांनी गुरुजींच्या ३३ वर्षांच्या कार्यकाळाचा धावता आढावा घेतला होता आणि गुरुजींची महानता अधोरेखित केली होती. आपणच उपस्थित केलेल्या प्रश्नाची त्यांनी दिलेली उत्तरे होती –

– डॉ. हेडगेवार यांनी सोपवलेल्या कार्याच्या सिद्धिसाठी पेटवलेल्या जीवनयज्ञाच्या ज्वालेचा तो प्रकाश होता.
– ६७ वर्षांच्या अखंड तपश्चर्येचा तो प्रकाश होता.
– ६ जून च्या रात्री रेशिमबागेत पसरलेला प्रकाश हा भारताचा आत्मप्रकाश होता.
– हा प्रकाश हिंदूंच्या ऐक्य जीवनाच्या उष:कालाचा प्रकाश होता.
– समर्पणाच्या हृदयस्पर्शी भावनांचा तो प्रकाश होता.

असं अतिशय काव्यात्म वर्णन करणाऱ्या या लेखात श्री. शेषाद्री यांच्या गुरुजींच्या संबंधीच्या भावना तर व्यक्त झाल्या आहेतच. सोबतच गुरुजींच्या कार्याचे मूल्यांकनही झालेले आहे.

संघाचे पाचवे सरसंघचालक श्री. सुदर्शन यांनीही गुरुजींना श्रद्धांजली वाहिली असून त्यात त्यांच्या आध्यात्मिक पैलूची चर्चा केली आहे. गुरुजींच्या निधनानंतर श्री. गुरुजी समग्र दर्शन नावाने जी ग्रंथमालिका प्रकाशित झाली त्याचा एक समारंभ इंदोर येथेही झाला होता. त्या कार्यक्रमात गुरुजींचे गुरुबंधू अमिताभ महाराज हेही आले होते. कार्यक्रमानंतर श्री. सुदर्शन यांनी अमिताभ महाराजांना गुरुजींच्या आध्यात्मिक स्थितीबद्दल विचारले. तेव्हा महाराजांनी प्रथम नकार दिला पण नंतर आग्रह केल्यावर त्यांनी सांगितले की, शरीराच्या एखाद्या भागापासून आपला आत्मा वेगळा करण्याची क्षमता गुरुजींना प्राप्त होती. हा प्रसंग वर्णन केल्यानंतर श्री. सुदर्शन यांनी गुरुजींच्या आयुष्यातील कर्करोग झाल्यानंतरचे काही प्रसंग सांगितले आहेत, ज्या प्रसंगातून अमिताभ महाराजांनी सांगितलेल्या सिद्धीचा प्रत्यय आला होता.

श्री. सुदर्शन यांनी कोल्हापूरचे प्रसिद्ध तत्वज्ञ दत्ता बाळ यांचीही आठवण लेखात उद्धृत केली आहे. गुरुजींच्या एका श्रद्धांजली सभेत दत्ता बाळ उपस्थित होते. तिथे बोलताना त्यांनी गुरुजींशी असलेल्या संबंधांवर प्रकाश टाकला होता. नागपूरला झालेल्या आपल्या व्याख्यानाला गुरुजी आले होते. परंतु आपण त्यांना ओळखत नव्हतो. मात्र त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्याबद्दल एक आकर्षण उत्पन्न झाले. ते कोण आहेत याची आपण चौकशी केली आणि त्यांना भेटायला हेडगेवार भवनात गेलो होतो. तिथे एकांतात आपण त्यांच्याशी चर्चा केली. योगासंबंधी काही प्रश्न आपण त्यांना विचारले. प्रत्येक प्रश्नाचे त्यांचे उत्तर एक पाऊल पुढचे राहत असे. याप्रमाणे आम्ही एकेक पायरी वर चढत होतो. शेवटी त्यांना एक प्रश्न विचारला – ‘आपणाला ईश्वराचे दर्शन झाले आहे का?’ त्यावर थोडा वेळ माझ्याकडे पाहून ते म्हणाले – ‘कोणाला न सांगण्याच्या अटीवर उत्तर देईन.’ मी त्यांना आश्वस्त केल्यावर म्हणाले – हो. संघावरील बंदीच्या काळात शिवनी कारागृहात असताना चिंतित होऊन बसलो होतो. त्यावेळी माझ्या खांद्यावर कोणीतरी दाबत आहे असे वाटले. वळून पाहिले तर प्रत्यक्ष जगदंबा. तिने आश्वस्त केले आणि म्हणाली, सगळे ठीक होईल. त्याच आधारावर पुढील संकटांचा मुकाबला करता आला. हा अनुभव सांगून श्री. दत्ता बाळ म्हणाले, आता ते आपल्यात नसल्याने त्यांना दिलेल्या वाचनातून मी मुक्त झालो आहे आणि तुम्हाला हे सांगतो आहे.

– श्रीपाद कोठे
नागपूर 

7588043403