मुंबई: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने 10 हजारांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी केलीय. राज्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने त्यांना मदत करण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले.
23 जुलै रोजी राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. यवतमाळ, बुलढाणा, वाशीम येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मंत्र्यांनीही भेटी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी पूरपरिस्थितीमुळे मृत्यू झाले आहेत, त्या ठिकाणी मृताच्या नातेवाईकांना चार लाख रुपये तातडीने द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. ज्यांच्या घरात पाणी शिरले होते त्यांनाही 10 हजार रुपये मदत करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. राज्य सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठीशी असून ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, त्या ठिकाणी स्वस्त धान्याच्या दुकानातून आजच धान्य पुरवठा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
















