हेमंत सोरेन यांना 5 दिवसांची ईडी कोठडी

0

5 days ED custody to Hemant Soren

रांची, 02 फेब्रुवारी  : झारखंडच्या पीएमएलए कोर्टाने माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना 5 दिवसांची ईडी कोठडी ठोठावली आहे. सोरेन यांना 10 दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी ईडीने केली होती. परंतु, कोर्टाने त्यांची 5 दिवसांच्या कोठडीत रवानगी केलीय. विशेष म्हणजे ईडी कारवाईला आव्हान देणाऱ्या सोरेन यांच्या याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय.

हेमंत सोरेन यांना ईडीने जमीन व्यवहारातील मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केल्यानंतर या अटकेच्या विरोधात सोरेन यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. सोरेन यांनी थेट सुप्रीम कोर्टात येण्यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका का दाखल केली नाही ? असा सवालही न्यायालयाने विचारला. झारखंडमध्ये आज, शुक्रवारी नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केल्यानंतर झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ सुरु झाली होती. राज्यपालांनी नवीन सरकार बनविण्याचा प्रस्ताव काही झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला दिला नव्हता. अखेर पुन्हा भेट घेतल्यानंतर चंपई सोरेन यांना राज्यपालांनी सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर आज, शुक्रवारी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी झामुमोचे नेते चंपई सोरेन यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. या सरकारला येत्या दहा दिवसांत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. दरम्यान घोडेबाजार सुरु होण्याच्या भीतीने झामुमो आणि काँग्रेसने त्यांच्या आमदारांना हैदराबादला पाठवले आहे.