बल्लारपूर वनपरिक्षेत्रात ५ मोर मृतावस्थेत आढळले
वन विभागात खळबळ

0

चंद्रपूर. बल्लारपूर वन परिक्षेत्रातील कारवा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५०० मध्ये ५ मोर मृतावस्थेत आढळून आल्याने वन विभागात एकच खळबळ माजली आहे. वर्षभरापूर्वी या जंगलात सफारी सुरू करण्यात आली आहे. वन्यप्राण्यांचे दर्शन होत असल्याने पर्यटक या सफारीकरीता येत आहेत. त्याच वनपरिक्षेत्रात आता मोर मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. बल्लारपूर वन विभागात घनदाट जंगल आहे. या वन परिक्षेत्रातील कारवा गाव जंगलाने वेढले आहे. यामुळे या परिसरात वन्य प्राणी व पशु-पक्षी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. नागरिकांना भूरळ घालणारे वन्यप्राणी व विविध प्रकारचे पक्षी यामुळे बल्लारपूर वन विभागाने कारवा जंगल सफारी सुरु केली आहे. या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढली आहे. पर्यटकांना भूरळ घालणारे मोर याच परिसरात मृतावस्थेत आढळून आले आहेत. मोरांचा मृत्यू कशामुळे झाला असावा या विचारात वन विभागातील अधिकारी व कर्मचारी पडले आहेत. ही घटना १३ डिसेंबर रोजी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी गस्त करीत असताना उघडकीस आली आहे.
बल्लारपूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाचही मोर ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी वन्य जीव उपचार केंद्रात पाठविले आहेत. मोरांच्या उत्तरीय तपासणीचा रासायनिक विश्लेषक जिल्हा न्याय सहायक, वैद्यकीय प्रयोगशाळा, नागपूर येथून अहवाल प्राप्त झाल्यानंतर मोरांच्या मृत्यूंचे नेमके कारण समोर येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एकाच वेळी चंद्रपूर जिल्ह्यातील कारवा जंगलात पाच मोर मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभाग चिंतेत सापडले आहे. एकाच वेळी मोरांचा मृत्यू झाल्याने विषप्रयोगाची शक्यताही व्यक्त केली जात आहे. मोरांच्या मृत्यूचे अधिक तपासाच्या दृष्टीने कारवा जंगलातील जलाशयाच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले आहे. हे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानतर अनेक बाबी स्पष्ट होतील असा अधिकाऱ्यांचा विश्वास आहे. या प्रकरणी वन विभागाने अज्ञातांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती बल्लारपूर वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा