नागपूर – नागपूर -शिर्डी महामार्गासोबतच नागपूर आता देशाच्या विविध शहरांशी द्रुतगती मार्गाने जोडले जाणार आहे. नागपूर- पुणे अंतर हे सहा तासात पूर्ण करता येणार आहे. याशिवाय सहा एक्सप्रेस हायवे महाराष्ट्रातून जाणार असल्याची गोड बातमी आज केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समृद्धी महामार्गासह विविध योजनांचा शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते.या सहा नव्या हायवेत सुरत -चेन्नई हा महामार्ग नाशिक, नगर, सोलापूर, बंगलोर मार्गे पुढे जाणार आहे. याशिवाय इंदूर- हैदराबाद, नागपूर -विजयवाडा, पुणे -बेंगलोर असे सुमारे 75 हजार कोटींचे हे प्रकल्प येत्या काही वर्षात पूर्ण होणार आहेत. एम्स आणि आयआयएम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरला दिलेली मोठी भेट असल्याचे यावेळी गडकरी यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले. अजनी रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास मेट्रोच्या फेज 2 ला मंजुरी, नाग नदी पुनरुज्जीवन विकास प्रकल्प आदी विविध प्रकल्पांसाठी गडकरी यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. समृद्धी महामार्गासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा केली.
नागपूरची मेट्रो ही फास्टेस्ट असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये 3.14 किलोमीटरच्या व्हायडकटची नोंद झाली असल्यावर भर दिला. वंदे भारत एक्सप्रेस ही आणखी एक मोठी उपलब्धी नागपूरकरांसाठी मिळाली आहे. लवकरच मेट्रोपेक्षा कमी खर्चाच्या ब्रॉडगेज मेट्रोच्या माध्यमातून अमरावती, छिंदवाडा, बैतूल, रामटेक ही शहरे जोडली जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.