नागपूर: नागपूर विमानतळावर पुन्हा एकदा (Nagpur Airport) सोन्याच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. कस्टम विभागाने कतारवरून आलेल्या दोघा जणांना नागपूर विमानतळावर अटक करुन त्यांच्याकडून ८७ लाखांचे सोने जप्त केले आहे. मोहम्मद शाहिद आणि पीरबाबा सौदागर अशी अटक केलेल्या तस्करांची नाव असून ते मुळचे कर्नाटकमधील असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांनी दिली.
या संदर्भात अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारावर ही कारवाई कण्यात आली. मंगळवारी पहाटे कतारमधून आलेल्या विमानातून हे दोघे नागपुरात उतरले. दोघांची तपासणी करण्यात आली असता त्यांनी शरीरावर घातलेल्या कपड्यांमध्ये सुमारे पावणे दोन किलो सोनं पेस्ट स्वरूपामध्ये लपवून ठेवल्याचं आढळून आलं. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे. कस्टम्स विभागाचे अधिकारी दोघांच्या सीडीआरची तपासणी करत असून त्याद्वारे पुढचे दुवे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अलिकडेच पुणे विमानतळावर देखील एका महिलेकडून सोन्याची पेस्ट असलेल्या कॅप्सूल जप्त करण्यात आल्या होत्या.














