सातारा : पाच राज्य आपल्या हातून जाण्याच्या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेच्या निवडणुका मुदतीपूर्वीच घेतील, असा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. जनतेने दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी सज्ज रहावे, असे वक्तव्य देखील चव्हाण यांनी केले. चव्हाण म्हणाले की, देशात लोकशाही राहते की नाही याची शंका वाटते. तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी पंतप्रधान मोदी हे इतर हुकूमशाही देशांचे अनुकरण करून ‘एक देश, एक निवडणूक’ ही पद्धत आणतील, असे चव्हाण म्हणाले.
चव्हाण म्हणाले, काँग्रेसने प्रत्येकाला माणूस म्हणून वागणूक दिली. गुलामगिरीतून हा देश बाहेर काढून महासत्ता करण्याची शक्ती देशाच्या राज्यघटनेत आहे. समता, मानवता तोडण्याचा या मूठभर लोकांचा डाव आहे. त्यांचा ‘मोदी’ हा चेहरा पुढे असला, तरी त्यांचा बोलवता धनी ‘आरएसएस’ आहे. त्यांच्यामागे आपली माणसे धावत आहेत, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.














