एमपीएससी परीक्षेचा नवा पॅटर्न २०२५ पासून लागू होणार, राज्य सरकारचा निर्णय

0

पुणे : एमपीएससीच्या परीक्षेचा नवा पॅटर्न २०२५ पासून लागून करण्याची (New MPSC Exam Pattern from 2025) उमेदवारांची मागणी अखेर राज्य सरकारने मान्य केली आहे. राज्य मंत्रिमंडळात या मुद्यावर चर्चा होऊन राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारने दिलेला शब्द पाळल्याबद्धल आंदोलनकर्त्या उमेदवारांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. मंगळवारी सकाळी भाजपच्या शिष्टमंडळाने आंदोलनकर्त्या उमेदवारांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. या मागण्यांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. ते राज्य सरकारने पूर्ण केले आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी पुण्यात गेल्या दोन महिन्यांत हजारो विद्यार्थ्यांनी एकत्रित येत आंदोलन केले. मंगळवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि अभिमन्यू पवार यांनी उमेदवार आंदोलकांची मंगळवारी भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्याशी आम्ही सहमत आहोत, असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे फोनवरून मांडण्यात आल्या. फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवल्या जातील आणि सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, दुपारी दोनच्या सुमारास यावर निर्णय होऊन त्याची माहिती आंदोलनकर्त्या उमेदवारांना देण्यात आली. त्यानंतर आंदोलनकर्त्या उमेदवारांनी जल्लोष साजरा केला. आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांसोबत असलेले आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा