भंडारा शहरातील एका डॉक्टरने त्याच्या हळदीच्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली.

0

भंडारा : लग्नाची हळद लागून दुसऱ्या दिवशी लग्न होणार असतानाच एका डॉक्टरने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारा शहरात उघडकीस आली. भंडाऱ्यातील स्नेहनगरात ही घटना उघडकीस आली असून डॉ. कुणाल भाऊराव चव्हाण (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. डॉ. कुणाल नागपुरात मेयो रुग्णालयात कार्यरत होता. त्याचे चंद्रपूर जिल्ह्यातील डॉक्टर तरुणीशी लग्न ठरले होते. २ एप्रिलला मेहंदीच्या कार्यक्रमानंतर सोमवारी हळद आणि मंगळवारी विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र सोमवारी हळदीच्या दिवशी कुणालने गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉक्टरने असे टोकाचे पाऊल काल उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भंडारा पोलिस सर्वच बाजुंनी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हळदीच्या दिवशी कुणाल सोमवारी सकाळी झोपून उठला. चहा घेतल्यावर तो पुन्हा आपल्या खोलीत परतला. मात्र, बराच वेळ होऊनही तो परत आला नाही. यामुळे त्याच्या वडीलांनी खोलीत जाऊन पाहिले असता तो पंख्याला दोरी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. घरातील लोकांनी दोरी कापून त्याला खाली उतरविले. घटनेची माहिती भंडारा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी घरातील लोकांची चौकशी केली. मात्र, आत्महत्येचे कुठलेच कारण पुढे आलेले नाही. आता पोलीसांनी डॉ. कुणाल याच्या मित्रमंडळींची चौकशी सुरु केली आहे. नागपुरातील काही लोकांची यासंदर्भात चौकशी सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.