मुंबई : आधार कार्ड पॅन कार्डला जोडण्यासाठी केंद्र सरकारने मुदतवाढ जाहीर केली आहे. मात्र, त्यासाठी आकारण्यात येणारा एक हजार रुपयांच्या दंडावरून नाराजी व्यक्त होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी (Former MP Raju Shetty) हा जनतेच्या पैशावर दरोडा असल्याची टीका केलीय. आयकर विभागाने देशातील 44 कोटींहून अधिक पॅनकार्ड ग्राहकांना आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय घेत असताना केंद्र सरकारने प्रत्येक पॅनकार्ड धारकांकडून आधार लिंक करण्यापोटी 1 हजार रूपयाचा जिजीया कर आकारला आहे. यामुळे देशातील जनतेवर 44 हजार कोटींचा दरोडा पडणार असल्याची टीकाही राजू शेट्टी यांनी केली.
सरकारच्या या निर्णयावर कठोर टिका करताना राजू शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जनतेकडून मोठ्या प्रमाणात कराची आकारणी करून वाढलेल्या महागाईच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडत आहे. केंद्र सरकारच्या या तुघलकी धोरणाविरोधात आवाज उठविण्यासाठी रविवारी 9 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सोशल मिडियावर मोहिम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. #स्टॅापरॅाबरी #stoprobbary हा संदेश ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले. आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या [email protected] या मेलवर या धोरणाच्या विरोधात आपल्या प्रतिक्रिया नोंदविण्यात याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
केंद्र सरकारने आधार व पॅन लिंक करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढविली असली तरी दंड मात्र कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ज्या लोकांनी त्यांचे आधार-पॅन अद्याप लिंक केलेले नाही, त्यांना 1000 रुपये भरून ते लिंक करता येणार असल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे.