अल्पावधीतच पितळ पडले उघड : वाचा वर्धा जिल्ह्यात नेमके काय घडले
वर्धा. ठगबाजांकडून फसवणुकीसाठी वेगवेगळ्या क्लुप्ती वापरल्या जातात. कोणते कारण सांगून, कशापद्धतीने फसवणूक केली जाईल, त्याचा भरवसाच राहिला नाही. यामुळे सावध रहा, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका, हेच फसवणूक टाळण्याचे प्रभावी माध्यम आहे. याबाबत साऱ्यांनाच कल्पनाही आहे. पण, प्रलोभनाला बळी पडून सर्वस्व गमावल्याच्या घटना सातत्याने समोर येतच आहेत. वर्धा जिल्ह्यातील आर्वी पोलिस ठाण्यांतर्गत वाढोणा गावातूनही (Vadhona village under Arvi police station in Wardha district ) अशीच घटना समोर आली आहे. ठगबाजांनी (swindler ) तुमच्या घरात सोन्याचा हंडा आहे, तो काढण्यासाठी पैसे लागतील. सोन्याचा हिरा देखील आहे, असे आमिष महिलेला दाखवले. घरातून सोन्याचा हंडादेखील काढला. यामुळे सारेच आनंदले. मात्र, महिलेने हंड्याची पाहणी केली असता त्यातून सोन्याचे पॉलिश केलेले दगड आढळून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने परिसरातील नागरिकांच्या मदतीने दोन्ही ठगबाजांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले (Both thugs were caught and handed over to the police). पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून आसाराम नंदू वाघ, रोशन पिसाराम गुजर रा. परसोळी ता. कळमेश्वर जि. नागपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार मात्र घटनास्थळावरून पसार झाले.
आर्वी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाढोणा येथील इंदिरा गुलाब राऊत या आपल्या घरी असताना मोरपीस असलेला झाडू घेऊन दोन व्यक्ती त्यांच्याकडे आले. त्यातील एकाने दहा रुपये मागितले. इंदिरा यांनी पैसे दिले. डोक्यावर झाडू मारुन तुमच्या घरात सोन्याचा हांडा आहे तो काढण्यासाठी ६ हजार रुपये लागतील असे सांगितले. इंदिराने सहा हजार रुपये उसने घेऊन त्या व्यक्तीस दिले. दोघांनीही पैसे घेतले आणि तेथून चालले गेले. दोन दिवसांनी पुन्हा परतले. घरातील पोर्चजवळ खड्डा करुन जमिनीतून हांडा काढला. हांड्यात सोनेरी रंगाचे मूर्ती आणि सोन्याचे दगड होते. ठगबाजांनी तो हंडा तसाच ठेवण्यास सांगितला.
अतिमोह नडला
मागणीप्रमाणे पैसे मिळत असल्याने ठगबाजांचा मोह अनावर झाला. घरातून सोन्याचा हंडा काढल्यानंतर दोघांनी पुन्हा महिलेकडून १३ हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी तुमच्या घरात यापेक्षाही एक मोठा हिरा आहे तो नंतर काढून देतो, असे म्हणत पैसे घेऊन दोघेही निघून गेले. दुसऱ्यादिवशी फोन करुन माझ्या मित्राला २१ हजार रुपये देऊन त्याच्याकडून औषध घेऊन या असे भामट्याने सांगितले. महिलेच्या मुलासोबत जाऊ २१ हजार रुपयांमध्ये ठगबाजांनी सांगितलेल्या व्यक्तीकडून औषध आणले. दोन्ही आरोपी पुन्हा घरी आले मुलाने औषध त्यांना दिले त्यांनी ते औषध हांडा काढला त्या खड्ड्यात टाकले आणि या खड्ड्यात मोठा हिरा आहे असे म्हणत तो खड्डा बुजवून १० हजार रुपये घेतले. त्यानंतर महिलेच्या मुलाने ठगबाजाला फोन केला असता हिरा काढण्यासाठी ९ लाख १० हजार रुपये द्यावे लागेल असे सांगितले. महिलेला संशय आल्याने तिने हांडा उघडून पाहिला असता सोन्याचे पॉलिश केलेले दगड आणि मूर्ती असल्याचे लक्षात आले. तिने पैसे देण्याची तयारी दाखवित आरोपींना बोलावून घेतले. ते येताच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.