जीम लावण्यापूर्वी हृदयाची तपासणी आवश्यक

0

नववर्षाच्या संकल्पापूर्वी घ्या काळजी ः क्षमतेपेक्षा अधिक व्यायामाने हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता
नागपूर. वर्षाचा पहिला दिवस (First day of the year ) नव्या संकल्पाचा दिवसही मानला जातो. वेगवेगळे संकल्प घेतले जात असले तरी आरोग्याची काळजी म्हणून सकाळी उठून व्यायाम (Exercise) करण्याचा संकल्प करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. पण, व्यायाम किंवा जीम लावण्याचा संकल्प करण्याच्या विचारत असाल तर जरा सांभाळून. अलिकडल्या काळात सिनेकलाकारांना जीममध्ये व्यायाम करताना मृत्यु आला. अनेक तरुण आणि जिम ट्रेनरच्या अचानक मृत्यूचे व्हीडिओसुद्धा समोर आहे. या घटनांचे कारण हृदयविकाराचा झटका (heart attack) हेच होते. मात्र, त्यामुळे जीममुळे मृत्यु होतो, असा समज अनेकांनी करून घेतला. त्यामुळे जीम लावताना लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात हे मृत्यू जीममुळे नाही तर क्षमतेपेक्षा अधिक व्यायाम केल्याने हृदयविकाराचा झटका येऊन झाले आहेत. यामुळे जीम लावण्यापूर्वी हृदयाची तपासणी करून घेणे आवश्यक ठरले आहे.
हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी आर्टरीज या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला की, ह्रदयविकाराचा झटका येतो. जर या रक्तवाहिन्यांवरील रक्तदाब वाढला, तर हे अडथळे तुटून अचानक रक्तवाहिनी बंद होऊ शकते. यास ‘अक्युट कोरोनरी सिन्ड्रॉम’ म्हणतात. कुठल्याही कारणाने रक्तदाब वाढला तर हा विकार जडून हार्ट अटॅक येऊ शकतो. स्वतःच्या क्षमतेपेक्षा अधिक व्यायाम केल्यास हृदयावर ताण पडून हा विकार जडू शकतो. त्यामुळे जीम लावताना स्वतःच्या क्षमतेपेक्षा अधिक व्यायाम करू नये, असा हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला आहे.

जीममध्ये गेल्यावर व्यायाम करताना आपले सहकारी अधिक व्यायाम करतात, अधिक वजन उचलतात; तर मी देखील वजन उचलावे, असा विचार अनेकांच्या मनात येतो. याशिवाय कुणी जीम प्रशिक्षक जर क्षमतेपेक्षा अधिक व्यायाम करण्यास जबरदस्ती करीत असेल, तरी देखील लोकं त्या ताणात येऊन क्षमतेपेक्षा अधिक व्यायाम करतात. अशा वेळी हृदयात अगदी दहा टक्केही ब्लॉकेज असेल आणि ते या ताणामुळे तुटले तर तेथे रक्त गोठून गाठी होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे हृदयाकडे जाणार्यार रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

हृदयामध्ये अडथळे निर्माण होण्याची प्रक्रिया कमी वयापासूनच सुरू झाली असते. असंतुलित जीवनशैली, ताणतणावयुक्त आयुष्य, असंतुलित व अधिक फॅट असलेले पदार्थांचे सेवन हे अगदी तरुण वयापासूनच वाढले आहे. त्याचा परिणाम आता तरुण वयातच दिसून येत आहे. त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
याशिवाय पुरेशी झोप न होणे, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, दीर्घकाळापासून अनियंत्रित रक्तशर्करा (डायबिटिस) आणि ताणतणाव हे प्रमुख कारणे याशिवाय हृदयविकाराचा धोका वाढवितात.

ही काळजी गरजेची
व्यायाम करताना आपली क्षमता ओळखा. आपल्या क्षमतेहून अधिक व्यायाम टाळला पाहिजे. जेवढा व्यायाम आपण सहजतेने करू शकतो, ती आपली क्षमता असते. आपली व्यायाम करण्याची क्षमता केवळ आपणच ठरवू शकतो. कुणाच्या दबावात येऊन अधिक व्यायाम करू नये. एकाच दिवशी वा पहिल्याच दिवशी फार व्यायाम करू नये; हळूहळू आपली क्षमता वाढवत न्यावी. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होऊन ब्लॉकेजेस निर्माण होण्याची प्रक्रिया कमी वयापासूनच हळू-हळू सुरू होते. जर जीवनशैलीत बदल केले नाही, तर कालांतराने ब्लॉकेजेस वाढतात. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना व्यायाम आणि आहाराच महत्त्व सांगितले पाहिजे, जेणेकरून आपण त्यांना भविष्यातील विकारांपासून वाचवू शकतो.

कोट्…
हृदयविकाराची जोखिम असेल, प्रौढ वयात जीम सुरू करत असाल तर, व्यायाम सुरू करण्यापूर्वी हृदयाचे मुल्यांकन हृदयविकार तज्ज्ञांकडून करवून घ्यावे. जेणेकरून व्यायाम सुरू केल्यावर गुंतागूंत टाळता येईल. याशिवाय
डॉ. अमेय बीडकर, हृदयरोगतज्ज्ञ, नागपूर