नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने

0

प्रसिद्ध मंदिरांमध्ये गर्दी; पंढरी, शेगाव, साईनगरी गजबजली


नागपूर. नवी स्वप्ने आणि आशा-आकांक्षांसह नववर्षाचा सूर्योदय झाला आहे. जगभरात नववर्षाचे (New Year) जल्लोषात स्वागत करण्यात आले. भाविकांनी नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने (Devdarshan) केली असून, राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांनी आज सकाळपासूनच मंदिरांमध्ये गर्दी (Crowds in temples) केली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांनी शिर्डीत मोठी गर्दी केली होती. साईमंदिरासमोर भाविकांनी आज मोठ्या प्रमाणात गर्दी केली. नववर्षानिमित्ताने साईमंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. साईमंदिर परिसरात प्रवेश बंदी असताना रस्त्यांवर भाविकांची गर्दी झाली. पंढरपूर, शेगाव, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, मुंबईतील सिद्धीविनायक, नागपुरातील टेकडी गणेश मंदिर, साईमंदिर, ताजबाग आदी ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे. नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यावर अनेकांचा भर असल्याचे दिसते. त्यात वर्षाचा पहिलाच दिवस सुटीचा आल्याने भाविकांच्या उत्साहाला अधिकच उघाण आले आहे. काही मंदिरांसमोर पहाटेपासूनच रांगा लागल्याचे दिसले.
पंढरपुरातील विठ्ठलमंदिर सजले
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर सजवण्यात आले. विठोबाच्या मंदिरात फळे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असताना, पुण्यातील प्रदीप ठाकूर पाटील या भाविकाने त्यांचे स्वागत अनोख्या पद्धतीने केले. या सजावटीसाठी 1500 किलो देशी-विदेशी फुले आणि 700 किलो फळांचा वापर करण्यात आला.
संत गजानन महाराजांच्या आरतीने नववर्षाची सुरुवात
गजानन महाराजांच्या आरतीने नववर्षाची सुरुवात करण्यासाठी शेगावमधील मंदिरात आज पहाटे भाविकांनी गर्दी केली. गजानन महाराजांच्या दर्शनासठी हजारो भाविक शेगावात दाखल झाले.

अंबाबाईच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी
करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन वर्षाची सुरुवात करण्याचा मानस अनेक भाविकांचा असतो. त्यानुसार आज देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली. कोल्हापूरसह पुणे, मुंबई येथून मोठ्या सं‘येने भाविक कोल्हापुरात दाखल झाले. ‘कोरोनाचे संकट लवकर दूर होऊन सर्वजण आनंदात राहू दे,’ असे साकडे भाविकांनी देवीला घातले.

सिद्धिविनायक मंदिरात मोठी गर्दी
नवीन वर्षाच्या New Year सुरुवातीला सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सिद्धिविनायकाचे आज जवळपास 15 हजार भाविकांनी दर्शन घेतले.

रेणुका माता माहूर मंदिरात भाविकांची मांदियाळी
श्री क्षेत्र रेणुका मातामंदिर माहूरगड येथे भाविकांची मांदियाळी जमली. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटकातील भाविकांनी साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या रेणुकादेवीचे दर्शन घेतले. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा