अपघात की घातपात? कदमांनीच उपस्थित केली शंका

0


मुंबई. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम (Shinde group MLA Yogesh Kadam ) यांच्या कारला कशेडी घाटात अपघात (Car accident at Kashedi Ghat ) झाला होता. या अपघात प्रकरणात आता मोठा ट्विस्ट (twist in the accident case) आला आहे. आमदार योगेश कदम यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा असताना त्यांच्या ताफ्यात डंपर शिरला कसा? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. आमदार योगेश कदम यांनीच शंका उपस्थित करीत अपघाताची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे या अपघात प्रकरणाला नवे वळण आले आहे. आमदार योगेश कदम म्हणाले की, रात्री ९ च्या सुमारास खेडवरून निघालो. कशेडी घाट उतरल्यानंतर माझ्यापुढे रायगड पोलिसांची गाडी होती. त्यानंतर माझी गाडी आणि माझ्या मागे रत्नागिरी पोलिसांची गाडी होती. डंपर प्रचंड वेगाने आला. रस्ता मोठा होता. माझ्या कारला त्या डंपरने धडक दिली त्यात माझी कार ३६० डिग्री फिरली. त्यानंतर तो डंपर पुढे पळून गेला. त्यानंतर दीड किलोमीटर अंतरावर डंपर रस्त्याखाली दिसला आणि डंपरचालक फरार झाला होता. सुदैव आणि आई जगदंबेच्या आशीर्वादाने आम्ही वाचलो. माझ्या वाहन चालकाला किरकोळ दुखापत झाली असे त्यांनी सांगितले.
त्याचसोबत या अपघातानंतर अनेक गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. मी सीटबेल्ट लावला होता म्हणून मला काहीच झालं नाही. पोलादपूरच्या त्याच दुर्घटनास्थळी महिनाभरापूर्वी अपघात झाला होता त्यात संपूर्ण कुटुंब मयत झाले होते. मुंबई-गोवा हायवेवरील अपघात होतात. हा प्रश्न वारंवार मांडला जातोय. कदाचित योगेश कदम आज नसता तर यावर तातडीने काही पाऊले उचलली असती. रस्ते अपघात कधी थांबणार हा प्रश्न आम्हाला पडलाय असं आमदार योगेश कदम म्हणाले.
तसेच अपघात झाला तो सामान्य अपघातासारखा वाटत नाही. पोलीस यंत्रणेला मी तक्रार दिली आहे. संबंधित पोलिस अधिकारी तपास करतील. ज्या शंका मला वाटतात त्या पोलिसांना सांगितल्या आहेत. माझ्या मागे आणि पुढे पोलिसांची गाडी असताना डंपर माझ्या कारला धडकला. १०० च्या वर त्या डंपरचे स्पीड होते. माझ्या कारचा मागचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. हा घातपात आहे की नाही याची खात्री करणं गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशी करण्याची मागणी करणार आहे असे आमदार योगेश कदम यांनी म्हटले आहे.