Afzal Khan अफजल खानाच्या कबरीजवळ ऐतिहासिक नोंद नसलेल्या आणखी तीन कबरी सापडल्या!

0

सातारा: प्रतापगडाच्या (Pratapgarh Fort) पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळ (Afzal Khan Tomb) आणखी तीन कबरी आढळून आल्या आहेत. या तीन कबरी नेमक्या कोणाच्या याचा शोध लावण्याचे काम आता प्रशासनाकडून (Three New Tomb found Near Afzal Khan Tomb) सुरु आहे. पूर्वी या परिसरात एकच कबर असल्याचे दाखले इतिहासाच्या कागदपत्रात मिळतात. मग या तीन कबरी कोणाच्या याची चर्चा सुरु झाली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी परिसरात तीन कबरी आढळून आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दोनच दिवसांपूर्वी प्रशासनाने अफजल खानाच्या कबरीसमोरील अतिक्रमण हटविले आहे. आता हे अतिक्रमण हटविल्यावर तेथे तीन कबरी आढळून आल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीसमोरील अतिक्रमण हटविले. हे अतिक्रमण हटविल्यावर तेथे आणखी तीन कबरी असल्याचे आढळून आले. या कबरींची ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये कुठेही नोंद नाही. इतिहासाचे अभ्यासक द. बा. पारसनीस यांच्या 1916 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातील फोटोमध्ये एकच कबर असल्याचा फोटो आहे. त्यामुळे या कबरी निश्चितपणे त्यानंतरच्या कालावधीतील असल्याचे स्पष्ट होत आहे. आता प्रशासन या कबरी नेमक्या कोणाच्या याची माहिती घेत आहे. कबरींची उभारणी करणाऱ्या लोकांची यासाठी चौकशी केली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 2006 सालापासून हा परिसर सील करण्यात आला होता. त्या परिसरात कोणाला जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.
अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकामवरून अनेकदा वाद झाले आहेत. हिंदूत्ववादी संघटना आणि शिवप्रेमींकडून हे वाद समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अफजल खानाच्या कबरीसमोरील अनाधिकृत बांधकाम पाडावं अशी मागणी वारंवार शिवप्रेमींकडून केली जात होती. त्याचबरोबर इतिहास चुकीच्या पद्धतीनं सांगण्यात येत असल्याचा दावा करतही यावरुन अनेकदा वाद झाले होते. याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून हा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला होता.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा