Afzal Khan tombअफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्याची सुरुवात

0

सातारा : शिवप्रताप दिनाचा मुहुर्त साधून आज प्रतापगडाच्या पायथ्याला (Satara Pratapgad ) असलेल्या अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे (Unauthorised Construction Near Afzal Khan tomb ). महसूल आणि वनविभागाकडून संयुक्तपणे या पाडकामाला सुरूवात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकामवरून अनेकदा वाद झाले आहेत. अफजल खानाच्या कबरीसमोरील अनाधिकृत बांधकाम पाडावे अशी शिवप्रेमींची मागणी सुरु होती. 2006 सालापासून हा परिसर सील करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानेच पहाटे पाच वाजल्यापासून अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली असून या कारवाईसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाद न्यायालयात होता. न्यायालयाकडून अनाधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश बऱ्याच वर्षांपूर्वी देण्यात आले होते. मात्र सरकारकडून या संदर्भात कोणतीही अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. मात्र आज अखेर पोलीस, महसूल विभाग आणि वनविभागाकडून बांधकाम पाडण्यास सुरूवात करण्यात आली आहे. 10 नोव्हेंबर म्हणजे आजच्या दिवशीच प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. हा दिवस शिवप्रताप दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कबरीसमोरील परिसर सील असल्याने कबरीबाबतचा खोटा इतिहास लोकांसमोर येत होता. आजच्या कारवाईनंतर हा इतिहास शिवप्रेमींसमोर येईल, अशी भावना शिवप्रेमी व्यक्त करीत आहेत. शिव प्रताप दिन हा दिवस मोठ्या उत्साहात म्हणून साजरा केला जातो. शिवप्रताप दिनादिवशी शिवभक्त मोठ्या प्रमाणात प्रतापगडावर वंदन करण्यासाठी येतात.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा