अमरावती – लवकरच पावसाळ्याला सुरुवात होत असून सर्वत्र शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून बियाणे, खते घेण्यासाठी धावपळ सुरु केली आहे. अमरावती जिल्ह्यात मागील वर्षी बोगस बियाणांचा सुळसुळाट होता. त्यामुळे अमरावती कृषी विभागाने यावेळी खबरदारी घेतलेली आहे. बोगस बियाणे, खते व कीटकनाशके योग्य गुणवत्तेच्या मिळेल यादृष्टीने काळजी घेतली जात आहे. बोगस बियाण्यांसाठी प्रत्येक तालुका स्तरावर व एकूण 15 भरारी पथके गुणवत्ता तपासणीसाठी तयार करण्यात आली आहेत.
काही परवाना धारक औषध, बियाणे विक्रेता हे मनमानी भाव व ज्या बियाणांची मागणी असेल ते न देता ज्या बियाणे, खते व औषधांवर जास्त फायदा मिळेल तेच शेतकऱ्यांना देतात. अशा लोकांवर पोलिसांमार्फत कडक कारवाई करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे मिळणारे परमिटवर बियाणे, खते व औषधे याची माहिती तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहचेल याची काळजी अमरावती जिल्हा कृषी विभाग घेत असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली आहे.