मुंबई- ३० सप्टेंबर नंतर २ हजाराच्या नोटा व्यवहारातून बाद होतील, अशी घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आली आहे. यामुळे खडबडून जागे झालेल्या नागरिकांनी या नोटांद्वारे डिझेल-पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गर्दी केली. बँकेत रांगेमध्ये थांबण्यापेक्षा पेट्रोल-डिझेल भरून नागरिक दोन हजाराच्या नोटा आपल्या व्यवहारातून खर्च करतांना दिसत आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ ही वाचत असून कामे देखील होतात. जेव्हां पासून दोन हजाराच्या नोटा बंद होणार या घोषणेनंतर पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात दोन हजाराच्या नोटा जमा झाल्या असल्याचे पेट्रोल पंपावरील कामगार सांगत आहेत. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने २ हजाराच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बदलून घेण्याचे आवाहन नागरिकांना केले असून पुढील चार महिने नोटा बदलण्यासाठी मुदत दिली असताना नागरिक बँकेत आणि पेट्रोल पंपावर गर्दी करताना दिसून येत आहेत.