उपचाराचा खर्च करतोय कोण? : अद्यापही अटक होत नसल्याने संशयकल्लोळ
नागपूर. फसवणुकीचे प्रकरण नोंदविण्यात आल्यानंतरही अद्याप स्वयंघोषित सोशल मीडिया तज्ज्ञ अजित गुणवंत पारसेला (Ajit Parse) अटक होऊ शकली नाही. प्रकृती बरी नसल्याने तो खासगी रुग्णालयात उपचार घेत असून याच कारणाने पोलिसांकडून अटक टाळली जात आहे. पोलिसांनुसार, अजितकडे कोणतीही रक्कम सापडली नाही (Amount not found). त्याची आर्थिक स्थितीही बेताचीच (financial situation is also desperate) आहे. अशात खासगी रुग्णालयाचा खर्च भागतोय कसा (How are the expenses of the hospital being paid?), त्याच्यावर होणारा खर्च करतोय कोण?, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सर्वप्रथम पारसे विरुद्ध डॉ. राजेश मुरकुटे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. पारसेने मुरकुटे यांची साडेचार कोटींनी फसवणूक केली. त्यांच्या व्यतिरिक्तही इतर अनेकांना त्याने ब्लॅकमेल करून पैसे उकळले आहेत. अनेकांना चुना लावला आहे.
फसवणूक प्रकरणात सुरुवातीला ड्रायव्हींग स्कूलचे संचालक मनीष वझलवारही संशयाच्या घेऱ्यात होते, मात्र नंतर तेच पीडित निघाले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पारसेवर 18 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविला. अनेक लोकांची नावे समोर आली आहेत, मात्र बदनामीच्या भीतीने ते तक्रार करायचे टाळत आहेत.
धरमपेठमध्ये रुग्णालय चालविणाऱ्या एका डॉक्टरला ही पारसेने ब्लॅकमेल केले. मोठी रक्कमही उकळली मात्र, त्यांनी पोलिसात तक्रार केली नाही. पारसेचा लॅपटॉप तपासला असता तो 6-7 महिलांच्या संपर्कात असल्याचे पुढे आले. त्यांच्याशी पारसेने अश्लील चॅटिंगही केली होती. त्या महिलांनाही पारसेने जाळ्यात अडकविल्याचा अंदाज आहे. आता प्रश्न हा निर्माण होतो की, पारसेने लोकांची फसवणूक करून गोळा केलेले पैसे अखेर गेले कुठे? खासगी रुग्णालयात त्याच्यावर मोफत उपचार तर होत नाही आहेत. अशात त्याच्या उपचारावर होणारा खर्च अखेर कोण करत आहे? पारसेच्या लॅपटॉपवर बनावट धनादेश, सीबीआयचे समन्स, सीएसआर निधी जारी झाल्याचे कागदपत्र मिळाले आहेत. तो नेत्यांच्या खूपच जवळ होता. त्याला अटक होऊ न शकण्याचे कारण समजण्यापलिकडे आहे.