
१० मुलांसह चालक जखमी ; स्थानिकांची मदतीसाठी धाव
अकोला. जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील दिग्रस ते तुंलगा रस्त्यावर (Digras to Tulgaa road in Patur taluk ) शुक्रवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान माऊली वाटिका जवळ सांगोळा येथून विद्यार्थ्यांना वाडेगाव (Vadegaon) येथे शाळेत घेऊ जात असलेला भरधाव ऑटो रस्त्याच्या कडेला उलटला (speeding auto overturned on the side of the road). यात १० ते १२ विद्यार्थी जखमी झाले. घटनेनंतर ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने खासगी रुग्णालयात पोहोचवून देण्यात आले. घटनेची माहिती पंचक्रोशित वाऱ्याच्या वेगाने पसरली. यामुळे अनेक पालकांनी शाळेत धाव घेत. आपले पाल्य सखरूप असल्याची खात्री करून घेतली. विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचविण्यासाठी ऑटोचालक नेहमीच वेगात ऑटो दामटतात. पण, हाच वेग जीवावर बेतनारा ठरतो. यापूर्वीही वेगातील ऑटो उलटल्याच्या किंवा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामुळेच मुले शाळेत जाणला निघाल्यापासून ते सुरक्षित घरी येईपर्यंत पालकांच्या जीवाला घोर लागलेला असतो.
मिळालेल्या माहिती नुसार, संबंधित ऑटोचालक एकाचवेळी 10 ते 12 मुलांना ऑटोत कोंबून भरधाव चालला होता. एकतर ऑटोत दाटीवाटीने सारे बसले होते. त्यात लवकर पोहोचण्यासाठी ऑटोचा वेगही अधिक होता. अनियंत्रित झालेला ऑटो अचानक रस्त्याच्या कडेलाजाऊन उलटला. यामुळे विद्यार्थी जखमी झाले. सुदैवाने पोलिस भरतीची तयारी करणारे उमेदवार याच ठिकाणी धावण्याचा सराव करीत होते. मुलांच्या किंचाळ्या ऐकून ते मदतीला धावले. प्रतिक गवई, सम्राट गवई, मेजर विशाल लहाने, अतुल गवई, राज चिकटे, अभि चिकटे, प्रदीप टिकार, गौरव दाबेराव, हृतिक गवई, अजय गवई, कपिल गवई, शुभम ताले, आदींनी धावाधाव करून जखमी असलेल्या विद्यार्थ्यांना उचलून तत्काळ त्यांना नजीकच्या वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविण्यात आले. त्यानंतर वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी श्वेता गायगोळ यांनी प्राथमिक उपचार करून काहींना घरी पाठविले तर चालक व २ विद्यार्थी यांना अकोला येथे पाठविण्यात आले आहे.