मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला-चंद्रशेखर बावनकुळे

0

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी खासदार संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. बावनकुळे म्हणाले, फोटोवरून आपल्याला आणि आपल्या परिवाराला व्यक्तिगत जीवनामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. साडेतीन कोटी रुपये परदेशात नेता येत नाहीत. एक लाख रुपये नेले तरीही तीन तीन वेळा चेकिंग केले जाते. माझे कुणीही मित्र नाहीत किंवा हाँगकाँगमध्ये माझा पैसाही नाही. त्यामुळे इतके पैसे मी खर्च करण्याचा प्रश्नच येत नाही. ज्यांना पैशाच्या या पळवाटा माहिती आहेत, त्यांनीच हे आरोप केले आहेत, असे बावनकुळे म्हणाले. (Chandrashekhar Bawankule)
बावनकुळे म्हणाले की, आपण हाँगकाँगला परिवारासोबत गेलो होतो. पण त्या ठिकाणी प्रत्येक हॉटेलमध्ये कसिनो असतो. त्याला क्रॉस करून जाताना कुणीतरी तो फोटो काढला असावा. अशा फोटोच्या आधारे कोणाची प्रतिमा खराब करता येत नाही. मोठा संघर्ष करुन मी इथपर्यंत पोहोचलो आहे. जास्तीत जास्त वेळ मला घराबाहेरच रहावे लागत असल्याने माझ्या कुटुंबाने मला तीन दिवसांचा वेळ मागितला होता, असेही ते म्हणाले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मकाऊमध्ये कसिनो खेळत असल्याचे सांगत एक फोटो शेअर केला होता. बावनकुळे यांनी कसिनोमध्ये तीन तासात तीन कोटी उधळल्याचा आरोपही त्यांनी केला होता.