अनिल जयसिंघानी याला अखेर गुजरातमध्ये अटक

0

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात अनिल जयसिंघानी याला गुजरातमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याला मुंबईत आणले जाणार असून मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनिक्षा जयसिंघानी हिला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली ((Anil Jaisinghani arrested from Gujarat in Amruta Fadnavis Case) आहे. अनिक्षा ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. फॅशन डिझायनर असल्याचे सांगत अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याशी जवळीक साधली व नंतर वडिलांना गुन्ह्यातून सोडविण्यासाठी त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून डिझायनर अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी यांच्यासंदर्भात अनेक धक्कादायक माहिती समोर आल्या आहेत. अनिक्षाने आपल्या वडिलांची एका गुन्हेगारी प्रकरणातून सुटका करण्यासाठी अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांची लाच ऑफर केल्याचा आरोप आहे. अनिल जयसिंघानी याचे देशभरातील राजकीय नेते आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी संबंध असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. अनिल जयसिंघानी यांच्यावर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि गोवा या सहा राज्यांमध्ये एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये पोलीस अनिल जयसिंघानी यांचा शोध सुरु होता. मे २०१९ मध्ये त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. क्रिकेट बेटिंगप्रकरणात अनिल जयसिंघानी यांना अनेकदा अटक करण्यात आलेली आहे. जयसिंघानी याचे शिरडीमध्ये एक हॉटेल आहे. त्याने आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या तिकीटावर चारवेळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लढवल्याची माहिती आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा