या क्षणी औरंगजेबाचा मुद्दा असंयुक्तिक… हिंसाचाराचे समर्थन तर अजिबात नाही!

0

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका

नागपूर (Nagpur):
औरंगजेबाचा मुद्दा सध्याच्या स्थितीत असंयुक्तिक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केली आहे.
औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपुरातील महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटामध्ये तणाव निर्माण झाला.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला. दरम्यान, काही समाजकंटकांनी महाल व परिसरातील विविध भागात घरं, वाहनं, अन्य साहित्याची जाळपोळ करत पोलिसांवर दगडफेक केली. या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रू धुराच्या शंभरपेक्षा अधिक कांड्या फोडाव्या लागल्या आणि सौम्य लाठीमारही करावा लागला. या दगडफेकीत काही पोलिस जखमी झालेत. नागपुरातील काही भागात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली.
औरंगजेबाचा मुद्दा हा सध्या संयुक्तिक नसून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही, असे सुनील आंबेकर म्हणाले. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेला औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा आणि नागपूरमध्ये घडलेल्या हिंचारावर त्यांच्या संघाची भूमिका स्पष्ट केली.

नागपूरात झालेल्या हिंसाचारानंतर आता स्थानिक नागरिकांनी नेमका काय प्रकार घडला ते सांगितले आहे. चार पिढ्यांपासून एकाच ठिकाणी गुण्यागोविंदाने राहणाऱ्या महाल परिसरात सोमवारी झालेल्या दंगलीनंतर दोन समाजातील मने दुभंगली आहेत. दंगलखोरांनी जुने हिस्लॉप कॉलेज परिसरात नागरिकांची घरे, गाड्यांवर दगडफेक केली. यात अनेक गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले. पेशने यांच्या घरातील चारचाकी जाळली गेली. दंगलखोरांनी घराच्या दारावरील, वाहनांवरील छायाचित्र पाहून तोडफोड केली, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.