पूर्व विदर्भात सरासरी 54 टक्के मतदान !

0

 

नागपूर(Nagpur)– पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर,गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, रामटेक या पाचही लोकसभा मतदारसंघात सरासरी 54-55 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याने मतदानाचा टक्का 75% वर पोहोचवण्याचे राजकीय पक्ष व प्रशासनाचे प्रयत्न फेल ठरले. नागपुरात अतिशय कमी तर दुर्गम गडचिरोलीत सर्वाधिक मतदान झाले. दिव्यांग व वरिष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी विशेष व्यवस्था होती.
विभागातील पाचही लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 44.12 टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदानासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडल्यामुळे मतदानाला वेग आला. महिला,युवकांमध्ये उत्साह होता. नागपूर लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठ परिसरातील महानगरपालिकेच्या हिंदी उच्च प्रथमिक शाळेतील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासमवेत आई सरिता फडणवीस व पत्नी अमृता फडणवीस यांनीही मतदान केले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी महाल संघ मुख्यालया मागील आदितवार दरवाजा येथे तर तर भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी महाल टाऊन हॉल येथे सहकुटुंब मतदान केले काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे रामटेक चे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांनी उमरेड येथे मतदान केले
विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी रविनगर येथील मनपाच्या दादाजी धुनीवाले उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. अतिरिक्त आयुक्त माधवी खोडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. रविनगर परिसरातील मनपाच्या सी.पी. ॲन्ड बेरार शाळेतील मतदान केंद्रावर पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी तसेच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पत्नी शिवानी इटनकर यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सकाळीच मतदान केले.
नागपूर लोकसभा मतदार संघातील पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघात दाभा मराठी उच्च प्राथमिक शाळेत हजारी पहाड व दाभा परिसरातील मतदारांनी सकाळी सात वाजतापासूनच मतदानासाठी लांब रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. शंकरनगर परिसरातील सरस्वती विद्यालयात शिवाजीनगर परिसरातील मतदारांसाठी मतदान केंद्र क्र.314,315 आणि 316 उभारण्यात आले होते. विशेषत: 40 टक्के पेक्षा कमी दिव्यांगता असणारे दिव्यांग व्यक्ती आणि 85 वर्षापेक्षा कमी वयाच्या जेष्ठ नागरिकांची गर्दी दिसून आली. रविनगर परिसरातील मनपाच्या सी.पी. ॲन्ड बेरार शाळेतील आणि दादाजी धुनीवाले उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रांवरही मतदारांची गर्दी दिसून आली.
असे झाले मतदान विभागातील गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम तसेच संवेदनशील अहेरी, आमगाव, आरमोरी, गडचिरोली या विधानसभा मतदारसंघामध्ये तसेच भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील अर्जुनीमोरगाव विधानसभा मतदार संघात सकाळी 7ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित असल्याने झपाट्याने मतदान झाले.
रामटेक (अ.जा.) लोकसभा मतदार संघात दुपारी 3 वाजेपर्यंत 40.10 टक्के, नागपूरमध्ये 38.43 टक्के, भंडारा-गोंदियामध्ये 45.88 टक्के, गडचिरोली-चिमूरमध्ये (अ.ज.) 55.79 टक्के तर चंद्रपूर लोकसभा मतदार संघात 43.48 टक्के मतदानाची नोंद झाली. यानंतर
सायंकाळी ५ वाजेपर्यंत
भंडारा गोंदियात ५६.८७ टक्के
चंद्रपूरला ५५.११ टक्के
गडचिरोली-चिमुर मतदारसंघात ६४.९५ टक्के,नागपूर : ४७.९१ टक्के
रामटेक : ५२.३८ टक्के मतदान झाले. शेवटच्या तासातील मतदान मिळू शकले नाही.