पंतप्रधानांच्या भेटीसाठी वेळ मागणाऱ्या पूजा तडस नजरकैदेत!

0

पंतप्रधानांच्या भेटीसाठी वेळ मागणाऱ्या पूजा तडस नजरकैदेत!

 

वर्धा  : आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण लोकशाही मार्गाने या निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याचे सांगत, वर्धा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्या पूजा तडस यांनी आता न्यायासाठी थेट पंतप्रधानांना सादर घातली आहे.

दरम्यान, आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी पंतप्रधानपदाची भेट घेण्याचा इरादा जाहीर करताच, पोलिसांनी त्यांच्या घरासमोर पहारा लावून, त्यांना घराबाहेर पडता येणार नाही, याची तजवीज केल्याचा आरोप होतो आहे.

वर्धा लोकसभा मतदारसंघाचे गत दोन टर्म खासदार आणि यंदाच्या निवडणुकीत भाजपातर्फे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात असलेले रामदास तडस यांच्या स्नुषा असलेल्या पूजा तडस यांच्या उमेदवारीची सर्वदूर चर्चा आहे. रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर काहीच दिवसात त्यांच्यावर वेगळे राहण्याची वेळ आली. यातून आपल्यावर आणि आपल्या मुलावरही अन्याय होत असल्याचे सांगत, कुठेही न्याय मिळत नसल्याने आता लोकशाही मार्गाने न्याय मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, मध्यंतरीच्या काळात पंकज तडस यांनीही एक पत्रकार परिषद घेऊन, पूजा यांच्यावरच आरोप करत, त्याचा दावा खोटा असल्याचे सांगितले होते.

तर आता पूजा तडस यांनीही एक पत्रकार परिषद घेऊन, आता थेट पंतप्रधानांनीच आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. त्यांच्या पक्षातील एका खासदाराच्या घरातील महिलेवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध कुटुंबातील एक सदस्य म्हणून त्यांनी निवाडा करावा असेही पूजा तडस यांनी म्हटले आहे. दरम्यान, मोदींनी त्यांच्या वर्धा जिल्हा भेटीत आपल्याला भेटण्यासाठी वेळ द्यावा असेही त्यांनी म्हटले होते. मात्र, पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणावरून पूजा तडस यांना त्यांच्या घरातूनच बाहेर पडू न देण्यासाठी तगडा पहारा पोलिसांनी लावला होता.