भाजपचा अयोध्या दर्शनाचा कार्यक्रम ठरला!

0

मुंबई MUMBAI  : अयोध्येतील  Ayodhya नवनिर्मित राम मंदिरात रामलला विराजमान झाल्यावर आता भाजपने अयोध्या दर्शनाचा कार्यक्रम निश्चित केल्याची माहिती आहे. भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री मंत्रिमंडळासह रामललाच्या दरबारात हजेरी लावणार आहेत. सर्व राज्यांना एक निश्चित तारीख कळविण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळ ५ फेब्रुवारीला अयोध्यावारीला जाणार असल्याची माहिती आहे.

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सर्व मंत्रिमंडळासह ५ फेब्रुवारीला अयोध्येला जाऊन रामललाचे दर्शन घेणार आहेत. भाजपची सरकारे असलेल्या इतरही राज्यांच्या तारखा ठरल्या असल्याची माहिती आहे. त्यानुसार ३१ जानेवारीला त्रिपुरा तर १ फेब्रुवारीला स्वतः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आपल्या मंत्रिमंडळासह रामललाच्या दर्शनाला जाणार आहेत. २ फेब्रुवारीला उत्तराखंड तर ५ फेब्रुवारीला महाराष्ट्र मंत्रिमंडळ अयोध्येला जाणार आहे. ६ फेब्रुवारीला अरुणाचल प्रदेश तर ९ फेब्रुवारीला हरियाणा, १२ फेब्रुवारीला राजस्थान, १५ फेब्रुवारीला गोवा, २२ फेब्रुवारीला आसाम, २२ ला गुजरात, ४ मार्चला मध्य प्रदेशचे मंत्रिमंडळ अयोध्येला जाणार असल्याची माहिती आहे.

भाविकांची विक्रमी गर्दी

अयोध्येतील रामललाचे मंदिर सर्वसामान्य जनतेच्या दर्शनासाठी दुसऱ्याच दिवशी खुले झाले आहे. पहिल्या दिवशी पाच लाख भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. भाविकांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनाही कसरत करावी लागली. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर परिसरात सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. आठ हजार अतिरिक्त पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आलाय. तर लखनौमधून अयोध्येला येणाऱ्या बसही थांबवण्यात आल्यात. आता एका तासात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता येत आहे. मंदिरात मोबाईलला परवानगी देण्यात आल्याने भाविक फोटो आणि सेल्फी काढत आहेत