बावनकुळे म्हणाले, प्रत्येक खाते महत्त्वाचे – चंद्रशेखर बावनकुळे

0

 

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलेले खातेवाटप समन्वयानेच केले आहे. शेवटी तिन्ही पक्षात समन्वय करूनच हा निर्णय झाला आहे.कुठलंही खातं महत्त्वाचे किंवा कमी महत्त्वाचे नसते. जनतेच्या विकासासाठी प्रत्येक खाते महत्त्वाचे आहे. भाजप शिवसेना किंवा राष्ट्रवादीकडे जे -जे खाते आहेत, त्याच्यातून जनतेला दिलासा देण्याचे काम त्या विभागाचे मंत्री करतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
भाजप बैठकीनंतर नागपुरात आले असता ते माध्यमांशी बोलत होते. निवडणुकीसाठी स्ट्राईक रेट 90% करण्याचा प्रयत्न आहे. निवडणुकीत 51% मतदान मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. आमचे सरकार रॉकेट सरकार आहे. जे मतदार संघ आमच्याकडे येतील त्या मतदारसंघात आम्ही आमचा स्ट्राईक रेट 90% ठेवणार आहोत. वरिष्ठ नेतृत्व आणि तिन्ही पक्ष मिळून निर्णय करू. आमच्या मतदारसंघासाठी जेवढी ताकद आम्ही लावू तेवढीच ताकद शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी लावणार आहोत.अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे खाते वाटपा आधीही ते कुठल्याही विभागाची बैठक घेऊ शकतात असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. उद्धव ठाकरे कोणत्या मानसिकतेने बोलत आहेत, हे सर्वांना माहित आहे. फडणवीस यांनी काल पौराणिक ग्रंथाचे दाखले दिले. जो आपल्याशी दगाबाजी करतो त्याला जागा दाखवावी लागते. काल फडणवीस यांनी केलेले वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यात सत्यता आहे.
भाजपची भावनिक युती शिवसेनेसोबत आहे आणि राष्ट्रवादीसोबत आमची राजकीय युती आहे. उद्धव ठाकरे यांना ज्यांनी सोडलं, ते आमच्याकडे आले हे बेरजेचे राजकारण आहे. मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे मिळून अर्थसंकल्प तयार करतील. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बद्दल मी बोलणं योग्य नाही. त्यांच्या पक्षाने कुणाशी युती करावं, कसं राजकारण करावे तो त्यांचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद फडणवीस यांच्यामुळे गेले असं वाटत आहे. मात्र, आता उद्धव ठाकरे यांनी त्या स्वप्नातून बाहेर निघावे. ते आता मुख्यमंत्री नाहीत आणि भविष्यात होतील का हेही माहित नाही. ज्याला घर सांभाळता येत नाही ते कधीच मोठे होऊ शकत नाहीत. त्यांचे पद गेल्यामुळे ते निराश झाले आहेत. नाना पटोले यांना माहित आहे की, त्यांचा पक्ष अनेक वर्ष सत्तेत येऊ शकत नाही. त्यामुळे आपले कार्यकर्ते आपले आमदार सांभाळण्यासाठी नाना पटोले असे वक्तव्य करत आहेत. भविष्यात अनेक पक्षप्रवेश भाजपमध्ये होऊ शकतात. जो भाजपच्या विचारांशी सहमत होऊन आमच्याकडे येईल त्याच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे रात्रीही उघडे राहतील.