भारतीय सागरी विद्यापीठाद्वारे विदर्भातील विद्यार्थ्यांना करियरच्या संधी- कमोडोर किशोर जोशी

0

 

नागपूर : समुद्री क्षेत्रात येत्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या संधीचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी समुद्र व त्याच्याशी निगडीत जहाज बांधणी, प्रशिक्षण, व्यवस्थापन असे विविध अभ्यासक्रम उपलब्ध करुन देणाऱ्या भारतीय सागरी विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक सत्रासाठी विदर्भातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन भारतीय सागरी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक कमोडोर (निवृत्त) किशोर जोशी यांनी केले आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज आयोजित पत्रकार परिषदेत क.जोशी यांनी भारतीय सागरी विद्यापीठातर्फे नवीन शैक्षणिक सत्रातील अभ्यासक्रम व या क्षेत्रातील संधीबाबत माहिती दिली. विद्यापीठाचे कोची, मुंबई, नवी मुंबई, कोलकत्ता, चेन्नई, विशाखापट्टनम येथे कॅम्पस आहेत. तसेच महाराष्ट्रातील ७ महाविद्यालयांसह देशातील एकूण १७ खाजगी महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत. विदर्भातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेवून करियरसाठी नवा पर्याय निवडावा, असे जोशी यांनी सांगितले.

समुद्री आणि जहाज बांधणी क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्र शासन विविध उपाययोजना राबवित आहे. भारतात समुद्री मार्गाने मोठ्या प्रमाणात आयात होते. रस्ते आणि हवाई मार्गापेक्षा समुद्री मार्गाने वाहतूक तुलनेने स्वस्त आहे. केंद्र शासनाने समुद्री वाहतूक ,जहाज बांधणी व तत्सम क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाच्या योजना व कार्यक्रम हाती घेतले आहेत.‘सागरमाला, ‘मॅरिटाईम इंडिया व्हिजन’ या केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांद्वारे येत्या पाच वर्षात समुद्री क्षेत्रात प्रत्येकी ४० लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. या क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी केंद्र शासनाच्या बंदरे, जहाज बांधणी मंत्रालयाअंतर्गत चैन्नई स्थित भारतीय सागरी विद्यापीठ गेल्या १५ वर्षापासून कार्यरत असल्याचे जोशी यांनी सांगितले.

नवीन शैक्षणिक सत्रासाठी १८ मे पर्यंत अर्ज करता येणार

विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक सत्रासाठी १४ एप्रिल पासून अर्ज मागविण्यात आले होते. १८ मे पर्यंत अर्ज करता येणार असून १० जून ला सामायिक प्रवेश परीक्षा(सिईटी) होणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून नवीन सत्रास प्रारंभ होणार. तांत्रिक व अतांत्रिक पध्दतीचे अभ्यासक्रम या विद्यापीठाद्वारे चालविण्यात येतात. तांत्रिक अभ्यासक्रमात समुद्री अभियांत्रिकी, नेव्हल आर्किटेक्चर क्षेत्रात बि.टेक आणि एम.टेक चा समावेश आहे.
नॉटिकल सायन्स आणि व्यवस्थापन या अतांत्रिक अभ्यासक्रमासाठी, बी.बी.ए., बी.एस.सी., एम.बी.ए, अभ्यासक्रम चालविण्यात येतात. विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी मागविण्यात आलेल्या अर्जांबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या www.imu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे, कमोडोर किशोर जोशी यांनी सांगितले.