नवी दिल्ली, 12 मे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या परीक्षेत एकूण 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पुन्हा एकदा मुलींनी आघाडी घेतली आहे. त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वाधिक 99.91 टक्के लागला आहे. पुणे विभागाचा निकाल 87.28 टक्के लागला आहे.
यंदा सीबीएसई बारावीच्या परीक्षसेसाठी 16,96,770 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यावर्षी 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल 2023 या कालावधीत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी मुलींनी 90.68 टक्के यश मिळवले, तर 84.67 टक्के मुले पास झाली आहेत. विद्यार्थ्यांना डिजिलॉकरवरूनही आपला निकाल पाहता येणार आहे. सहा अंकी सिक्युरिटी पिनद्वारे डिजीलॉकरवरून त्यांचे मार्कशीट तथा प्रमाणपत्र आणि डोमिसाइल सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतात. त्यासाठी सहा अंकी सुरक्षा पिन त्यांच्या शाळेतून मिळेल. या पिनच्या मदतीने विद्यार्थी डिजीलॉकर खात्यावर जाऊन त्यांच्या डिजिटल मार्कशीट आणि प्रमाणपत्रांसह विविध शैक्षणिक कागदपत्रे डाउनलोड करू शकतील. सीबीएसईने नोटीस जारी करून ही माहिती दिली.