गुंतवणूकदारांना शिक्षित करणारा मध्य भारतातीतील एकमेव उपक्रम

0

 

 

नागपूर, ता. १६: भविष्याच्या दृष्टीने भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करण्याची गरज आहे. यासाठी मनी बी तर्फे मागील आठ वर्षांपासून “अमृतकाळ – व्हिज्युअलाइजिंग इंडिया@१००” हा उपक्रम भारतातील गुंतवणूकदारांना आर्थिक दृष्ट्या सुशिक्षित करण्यासाठी राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे देशातील अनेक गुंतवणूकदारांना लाभ होत आहे असे मत मनी बी इन्स्टिट्यूट प्रा. ली. च्या शिवानी दाणी वखरे यांनी व्यक्त केले. मंगळवारी (ता. १६) रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी मनी बी चे शैलेश सांडेल, रितेश रहाटे, प्रसाद मुजुमदार उपस्थित होते.

मनी बी इन्स्टिट्यूट आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज तर्फे मध्य भारतातील सर्वात मोठा गुंतवणूकदार शिक्षण उपक्रम “अमृतकाळ – व्हिज्युअलाइजिंग इंडिया@१००” २० जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता प्रतिष्ठित सेंटर पॉइंट हॉटेल येथे आयोजित करण्यात आलेला आहे. संमेलनाचे उद्घाटन राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून आदरणीय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीनजी गडकरी मुख्य संबोधनात आर्थिक दृष्टिकोनावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करतील. संमेलनात गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्यासाठी स्टॉक मार्केट विशेषज्ञ एस. पी. तुल्सियन आणि गुंतवणूकदार/प्रेरक वक्ते विजय केडिया यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती यावेळी शिवानी दाणी वखरे यांनी दिली.

या एकदिवसीय संमेलनात भारतीय अर्थशास्त्र आणि शेअर बाजार व त्यातील गुंतवणूक, अर्थकारण या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सध्या युवा पिढीमध्ये आर्थिक साक्षरता आणणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितच गुंतवणूकदार आर्थिक साक्षर होऊन त्यांना नक्कीच लाभ होईल असे मत यावेळी शिवानी दाणी वखरे यांनी व्यक्त केले.

पुढे त्या म्हणाल्या, ‘आर्थिक गुन्हे अनेक ठिकाणी होत आहेत त्यामुळे या साक्षरतेचे सार्वत्रीकरण होणे गरजेचे आहे. मनी बी इन्स्टिट्यूट ही एक आघाडीची आर्थिक शिक्षण संस्था आहे जी व्यक्तींना आर्थिक बाजारपेठा आणि गुंतवणूक धोरणांबद्दलचे ज्ञान देऊन सक्षम करण्यासाठी समर्पित आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) हे भारतातील अग्रगण्य स्टॉक एक्सचेंज आहे, जे विविध आर्थिक साधनांमध्ये व्यापार करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. आतापर्यंत मनी बी तर्फे अशा प्रकारचे ७००-८०० कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत. या माध्यमातून अनेक युवक, ज्येष्ठ तसेच अन्य गुंतवणूकदार आर्थिक साक्षर झालेले आहेत. त्यामुळे सर्वांनी २० जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन शिवानी दाणी वखरे यांनी केले.