नागपूर (Nagpur), दि. 18 मे 2025: – राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध दहा विविध विषयांवर शंभर दिवसांचा राज्यस्तरीय कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम घोषित केला होता. शनिवारी यात महसूल विभागनिहाय कोणती कार्यालये सरस ठरली, त्याचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये नागपूर विभागातून महावितरणच्या आर्वी उपविभागाने प्रथम, मुल उपविभागाने व्दितीय तर भंडारा (शहर) उपविभागाने तृतिय क्रमांक पटकाविला. तर, अमरावती विभागात महावितरणच्या चांदूर बाजार उपविभागाने प्रथम, शेगाव उपविभागाने व्दितीय तर मुर्तीजापूर उपविभागाने तृतिय क्रमांक पटकाविला.
मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम सुरू केला होता. हा उपक्रम राज्यातील सर्व 358 तालुक्यातील 10 हजार शासकीय कार्यालयांमध्ये राबविण्यात आला. सर्व शासकीय विभागांच्या प्रत्येक महसुली विभागातील उत्कृष्ट तीन तालुका कार्यालयांची शनिवारी घोषणा करण्यात आली यात नागपूर सोबतच अमरावती विभागात महावितरणच्या चांदूर बाजार उपविभागाने प्रथम, शेगाव उपविभागाने व्दितीय तर मुर्तीजापूर उपविभागाने तृतिय क्रमांक पटकाविला.
कार्यालयांसाठी निकष
या स्पर्धेसाठी वेबसाइट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर आदी निकष होते. गेले 100 दिवस तालुकास्तरीय कार्यालयांनी या निकषांवर किती काम केले, त्यावरून निकाल घोषित करण्यात आला आहे. यात महावितरणच्या बहुतांश उपविभागांनी साजेशी कामगिरी करीत या स्पर्धेत सर्वच निकषांवर आघाडी घेतल्याने आता ही कार्यालये आणि तेथील अधिकाऱ्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे.
महावितरणचे प्रादेशिक संचालक परेश भागवत, गोंदीया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता हरिश गजबे, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक आणि अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी या नेत्रदीपक कामगिरी बद्दल महावितरणच्या या सर्व कार्यालयांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर