शेतकरी म्हणतो सोलर पॉवर तर उच्चदाव वीजप्रवाहाचा वनविभागाचा दावा
माजरी (majri) भद्रावती तालुक्यातील माजरी (Majri in Bhadravati taluk ) येथील शेतशिवारात रविवारी एका वाघिणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू (Tigress dies due to electric shock ) झाल्याची घटना उघडकीस आली होती. शेतपिकाचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहात ही वाघीण अडकली होती. विजेच्या धक्क्याने वाघिणीचा मृत्यू झाल्यावर सारेच ठाम आहेत. पण, तरिही वीजप्रवाहावरून दावे प्रतिदावे केले जात आहेत. कुंपनात सौर ऊर्जा प्रवाहित केल्याचा शेतकऱ्याचा दावा आहे. तर उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहामुळेच सदर वाघिणीचा मृत्यू झाल्याचे वनविभागाचे (Forest Department ) म्हणणे आहे. याप्रकरणी शेतमालकाचा मुलगा पुनेश देवराव पाटेकर (३५), रा. माजरी वस्ती याला तीन दिवस वनकोठडीत पाठविण्यात आले. यामुळे वीजप्रवाहन नेमका कोणता हे तपासातूनच स्पष्ट होऊ शकणार आहे.
शेतसंरक्षणासाठी सोलर पॅनेलच्या कमी दाबाच्या विद्युत प्रवाहाचा वापर करीत आहे, असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. परंतु, वनविभागाच्या दाव्यानुसार विद्युत प्रवाह सोलर पॅनेलचा नसून ११ केव्हीचा आहे. शक्यतोवर सोलर पॅनेलच्या विद्युत प्रवाहाने कोणत्याही श्वापदाचा मृत्यू होत नाही. या वाघिणीचा मृत्यू उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहामुळे झालेला दिसून येत असल्याचेही वनविभागाचे म्हणणे आहे.
१५ जानेवारीला चंद्रपूर वनविभाग उपक्षेत्र भद्रावती येथील सर्व्हे नंबर ३१३ मौजा माजरी येथील शेतमालक पंढरी महादेव पाटेकर यांच्या शेताअंतर्गत वाघीण मरण पावल्याने माजरी परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, या सविस्तर घटनेत शेतमालकाने स्वमर्जीने आपल्या शेतात उच्च दाबाचा विद्युत पुरवठा केला होता, अशी कबुली दिली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी वाघिणीची नखे, मिशा व इतर अवयव शाबूत असल्याची पुष्टी केली आहे. पुढील तपास विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, सहायक वनरक्षक जे. चौरे, निकीता आदी करीत आहेत.
शेतमालकाचा मुलगा पुनेश देवराव पाटेकर याला तीन दिवस वनकोठडीत पाठविण्यात आले आहे. तपासांतर्गत शेतसंरक्षणासाठी सोलर पॅनेलच्या कमी दाबाच्या विद्युत प्रवाहाचा वापर करण्याऐवजी मुख्य प्रवाहाचा वापर केल्याने ही घटना घडल्याचे आमच्या निदर्शनात आले आहे. उर्वरित माहिती न्यायालयीन कारवाईनंतर आपणास कळविण्यात येईल, असे वनविभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.