हे चाललेय तरी काय?…यवतमाळमध्ये रक्तरंजित संघर्ष

0
crime

१६ दिवसांत तब्बल १० खुनाच्या घटना

यवतमाळ (yawatmal) : जिल्ह्यासाठी (Yavatmal district) नववर्ष रक्तरंजित ठरते आहे. गेल्या १६ दिवसांत जिल्ह्यांत खुनांच्या १० घटना घडल्या आहेत (10 cases of murders in 16 days). एकप्रकारे गुन्हेगारांनी पोलिस प्रशासनाला दिलेले हे आव्हान आहे. ‘क्राईम रेट’ (Crime rate ) कमी करण्याचे पोलिस दलाकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात असली तरी रक्तरंजित संघर्ष थांबताना दिसत नाही. दर दिवसाआड एक खून होत आहे. कळंब आणि राळेगाव तालुक्यात सोमवारी एकाच दिवशी दोघांचा खून करण्यात आल्याने जिल्ह्यात कायदा व सुरक्षा व्यवस्था आहे की नाही, असा प्रश्न निर्माण केला जात आहे. गेल्यावर्षी खुनांची शंभरी जिल्ह्यात गाठली होती. सुरू असलेले हत्यासत्र लक्षात घेतल्यास गेल्यावर्षीचा रेकॉर्ड यावर्षी मोडला जाईल, अशी चर्चा आहे. वाढत्या गुन्हेगारीने नागरिक मात्र दहशतीत वावरत आहेत.

राळेगाव तालुक्यातील कळमनेर येथे शेतात जागलीला गेलेल्या शेतकऱ्याचा अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात दगडी वरवंटा घालून खून केला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली, तर कळंब तालुक्यातही सोमवारी रात्री ८.३० वाजता इंदिरा चौकात युवकाची हत्या करण्यात आली. अशोक धनंजय अक्कलवार (६५, रा. शांतीनगर, ता. राळेगाव ) असे मृताचे नाव आहे. अक्कलवार कळमनेर शिवारातील शेतात रविवारी रात्री जागलीसाठी गेले होते. सोमवारी सकाळी ८ वाजता त्यांचा मुलगा समीर शेतात दूध आणण्यासाठी गेला असता त्याला वडील रक्ताच्या थारोळ्यात खाटेवर पडलेले आढळले. अज्ञात मारेकऱ्यांनी दगडी वरवंटा डोक्यात घातल्याने अशोक यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने पिकांच्या संरक्षणासाठी रात्रीच्या वेळी जागलीकरीता शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुसऱ्या घटनेत कळंब येथे सोमवारी रात्री इंदिरा चौकात दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अश्विन राऊत उर्फ अब्दुल (२४, रा. हलबीपुरा) याच्यावर रॉडने हल्ला करून नंतर चाकूने वार केले. यात अश्वीन गंभीर जखमी झाला. त्याला ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. हल्ल्यानंतर दुचाकीस्वार तरूण पसार झालेत. दुर्दैवी बाब म्हणजे, आज मंगळवारी अश्विनचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच त्याची हत्या झाल्याने त्याचे कुटुंबीय हादरून गेल आहेत.

यावर्षी नववर्षाची सुरूवातच रक्तरंजित झाली आहे. सर्वाधिक खून यवतमाळ शहरात झाले आहेत. यवतमाळनजीक वाघापूर येथे पतीने दारूच्या नशेत पत्नीचा खून केला. यवतमाळात जागेच्या वादातून पुतण्याने काका व चुलत भावाची हत्या केली. गुन्हेगारी वर्तुळातील वर्चस्वाच्या वादातून गेल्या आठवड्यात मांसविक्रेत्या तरूणाचा खून करण्यात आला. कळंब तालुक्यात जागलीसाठी गेलेल्या दाम्पत्यात वाद होऊन पतीने पत्नीचा खून करून मृतदेह पेटत्या शेकोटीत फेकला होता. लाडखेड पोलीस ठाण्यांतर्गत पतीने पत्नीचा खून केला. बाभूळगाव तालुक्यातील दाभा येथे सावत्र वडिलाने आठ वर्षांचा मुलास ठार मारले. सोमवारी दोन खून झाले. संशय, वर्चस्व, कौटुंबिक वाद, आदी कारणांतून खुनांच्या घटना वाढल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे

Shankhnaad News |राजस्थानी घेवर आणि मक्के की ढोकळी 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा