मुंबई:महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नावर (Maharashtra Karnataka Border Dispute) आज दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील राहणार असून या बैठकांमध्ये होणाऱ्या चर्चेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. मागील दोन आठवड्यांपासून दोन्ही राज्यांमध्ये राजकीय पातळीवर मोठा तणाव आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार या वादात दोन्ही राज्यांना काय सूचना देते, याकडे लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या मुद्यावरुन महाविकास आघाडीच्या खासदारांनी 9 डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या खासदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची अमित शाह यांच्याकडे तक्रार केली होती.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर परस्पर समन्वयाने तोडगा काढू, असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. मात्र, तरीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने वक्तव्य केली जात असल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. अशातच महाराष्ट्रीतील दोन मंत्र्यांनी कर्नाटकचा दौरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय नंतर रद्द करण्यात आला. अशात महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करण्याच्या घटना कर्नाटकात घडल्याने या तणावात आणखीनच भर पडली.
शहांच्या सासुरवाडीला चटके
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे सर्वात जास्त चटके गृहमंत्री अमित शहा यांची सासूरवाडी कोल्हापूरला बसत असल्याने गृहमंत्र्यांनी या प्रश्नावर मध्यस्ती करून सकारात्मक मार्ग काढावा, अशी अपेक्षा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी व्यक्त केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आज होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार राऊत यांनी ही भूमिका मांडली आहे.