जोधपूर: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या राजस्थानमध्ये सुरु असून या यात्रेत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे (Raghuram Rajan) सहभागी झाले होते. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सवाई माधोपुर येथील भदौती येथे रघुराम राजन हे राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाले होते. युपीएच्या काळात रघुराम राजन हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. राजन यांनी सातत्याने मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली आहे. राजन यांच्या भारत जोडो मधील सहभागाचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात असून ते राजकारणात येणार की काय, अशीही चर्चा सुरु आहे.
माजी गव्हर्नर रघुराम राजन हे राहुल गांधी यांच्याबरोबर यात्रेत सहभागी झाल्याचा फोटो काँग्रेसने सोशल मीडीयावर टाकला आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, द्वेषाच्या विरोधात देशाला एकत्र आणण्यासाठी लोकांची संख्या वाढत आहे. ही वाढती संख्या आम्ही यशस्वी होऊ, हेच दाखवित असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. सध्या राहुल गांधा यांची भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये प्रवास करीत आहे. राजस्थानमधील भदौती इथे रघुराम राजन आज राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाले होते. काही दिवसांपूर्वीच रघुराम राजन यांनी केंद्र सरकारच्या अनेक धोरणांवर टीका केली होती. सध्या अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली नसली तरीही सरकार सत्य स्विकारण्यास तयार नसून या प्रश्नाचे गांभीर्य सातत्याने कमी करत असल्याचा आरोप राजन यांनी केला होता. आर्थिक मंदीच्या समस्येवर मात करण्यासाठी मोदी सरकारला ही समस्या मान्य करावी लागेल. कारण ती लपवून ठेवल्याने परिस्थिती सुधारणार नाही, असेही ते म्हणाले होते. जगात भारताची प्रतिमा ‘अल्पसंख्यांक विरोधी’ बनली तर भारतीय कंपन्यांचे नुकसान होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला होता.