नागपूर : उपराजधानी नागपुरात पाच वर्षांपूर्वीी खळबळ माजवून देणाऱ्या पवनकर कुटुंबीयांच्या हत्याकांड प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. पावसकर यांनी या हत्याकांडाचा आरोपी विवेक गुलाबराव पालटकर याला फाशीची शिक्षा ठोठावली. (Death Sentence to Vivek Palatkar) सरकारपक्षाने हे प्रकरण दुर्मिळात दुर्मिळ असून विवेकला फाशीच का दिली जावी हे पटवून देण्यासाठी युक्तिवाद केला. तर बचावपक्षाने या प्रकरणात फाशीची शिक्षा योग्य का नाही, हे मांडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शिक्षा ठोठावण्यापूर्वी आरोपी विवेक पालटकर याला त्याचे मत मांडण्याची संधी न्यायालयाने दिली असता त्याने ‘मला त्वरित संपवा, मला फाशी द्या, मला आता जगण्याची इच्छा नाही’ असे न्यायालयापुढे सांगितले.
नागपुरात १० जून २०१८ रोजी खरबी रोड येथील आराधनानगर येथे ही घटना घडली होती. या घटनेतील मृतांपैकी कमलाकर पवनकर हाआरोपी विवेक पालटकरचा मेहुणा होता. पालटकरची उच्च न्यायालयाने त्याच्या पत्नीच्या हत्येतील प्रकरणातून सुटका केली होती. पालटकर याने आठ वर्षांपूर्वी पत्नी सविता (वय 26) हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन गळा आवळून तिचा खून केला होता. उच्च न्यायालयातून विवेक सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटला होता. घटनेच्या दोन महिन्यांपूर्वीच तो कारागृहाबाहेर आला. या सर्व कायदेशीर प्रक्रियेसाठीचा आर्थिक खर्च पवनकर यांनी केला होता. पुढे कमलाकर आणि विवेक यांच्यात पैसा आणि हिस्स्यावरून वाद झाले होते. त्यातूनच ही घटना घडली. यात त्याने आपल्या मुलाला देखील संपविले. या घटनेत विवेक पालटकरने मलाकर मोतीराम पवनकर (५३), अर्चना कमलाकर पवनकर (४५), वेदांती कमलाकर पवनकर (१२), मीराबाई मोतीराम पवनकर (७५) आणि कृष्णा विवेक पालटकर (५) अशा पाच जणांची निर्घृण हत्या केली. कमलाकर पवनकर हे भाजपाचे कार्यकर्ते होते. हत्येनंतर आरोपी विवेक पालटकर पसार झाला होता. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला पंजाबमधील लुधियाना येथे अटक करून नागपुरात आले.